Friday, August 16, 2024

वाचनसंस्कृती जिवंत ठेवण्यासाठी ग्रंथालयांना सक्षम करणे गरजेचे - कुलगुरु डॉ. मिलिंद बारहाते

 




वाचनसंस्कृती जिवंत ठेवण्यासाठी ग्रंथालयांना सक्षम करणे गरजेचे

-  कुलगुरु डॉ. मिलिंद बारहाते

 

 अमरावती दि. 16(जिमाका):- समाजाच्या ज्ञानात्मक व सांस्कृतिक जडणघडणीमध्ये ग्रंथालयाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून सार्वजनिक ग्रंथालये  ही आपल्या भारतीय परंपरेला समृद्ध करणारे महत्त्वाचे ज्ञान केंद्र आहेत. त्यासाठी आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात वाचन संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांना सक्षम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी केले.

 

          जनता शिक्षण संस्था द्वारा संचालित डॉ. श्यामाप्रसाद  मुखर्जी कला महाविद्यालयाच्या  ग्रंथालयाच्यावतीने आयोजित भारत सरकारच्या राजाराम मोहनराय ग्रंथालय पुरस्कृत 'एम्पावरिंग पब्लिक लायब्ररीज कनेक्टिंग विथ कम्युनिटीज' या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनपर कार्यक्रमात ते  बोलत होते. राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जगदीश काळे, उद्घाटक म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे  कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, चर्चासत्राचे बीजभाषक म्हणून महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, अखिल भारतीय ग्रंथालय संघटनेचे डॉ. मोहन खेरडे, कलकत्ता येथील राष्ट्रीय ग्रंथालय मिशनचे प्रकल्प अधिकारी दीपांजन चॅटर्जी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ग्रंथपाल डॉ.शालिनी लिहितकर, जनता शिक्षण संस्थेचे सचिव मोहन गणोरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रा.ना. फुलारी, चर्चासत्राचे समन्वयक ग्रंथपाल डॉ.राजेश बोबडे विचारपीठावर उपस्थित होते.

 

            महाविद्यालयाच्या वतीने  कुलगुरु व चर्चासत्रातील मान्यवर अतिथी यांचा शाल, पुष्पगुच्छ व ग्रंथ भेट देऊन सत्कार यावेळी करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते चर्चासत्रातील शोधनिबंधाच्या ग्रंथाचे विमोचन याप्रसंगी करण्यात आले. चर्चासत्राचे समन्वयक डॉ. राजेश बोबडे यांनी प्रास्ताविक करून चर्चासत्राच्या आयोजनामागील महत्त्वपूर्ण भूमिका याप्रसंगी विशद केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रा.ना.फुलारी यांनी स्वागतपर भाषणातून  मान्यवर अतिथींचा परिचय करून देत आजच्या विज्ञान- तंत्रज्ञानाच्या युगात सदर चर्चासत्राच्या आयोजनाची गरज यावेळी कथन केली. चर्चासत्राचे बीजभाषण महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी करून  सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठी शासनस्तरावर सुरू असलेल्या विविध कृतिशील उपक्रमांची माहिती यावेळी त्यांनी दिली. चर्चासत्राच्या उद्घाटनाचे अध्यक्ष जगदीश काळे यांनी  मोबाईलच्या  आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात  ग्रंथालयांना सर्व दृष्टीने सक्षम व समृद्ध करण्यामध्ये सदर चर्चासत्र निश्चितच दिशादर्शक ठरेल ,अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

         चर्चासत्राच्या उद्घाटनाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या डॉ. कु. लुंबिनी गणवीर यांनी केले. या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे कर्मचारी व पदाधिकारी, परिसरातील महाविद्यालयाचे प्राचार्य, जनता शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, आजीवन सभासद, पत्रकार मंडळी, गावातील व परिसरातील  निमंत्रित मंडळी, महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

 

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...