Tuesday, September 2, 2025

DIO NEWS AMRAVATI 02-09-2025

 


जिल्हा प्रशासनातर्फे सोमवारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

अमरावती, दि. 01 : अमरावती जिल्हा प्रशासनातर्फे एमपीएससी आणि यूपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर सोमवार, दि. 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

शिबिरामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयएएस अधिकारी श्रीमती कौशल्या एस. आणि उपजिल्हाधिकारी सोनल सूर्यवंशी उपस्थित राहणार आहेत. दोन्हीही अधिकारी त्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या अनुभवावर आधारीत मार्गदर्शन करणार आहेत.

सदर शिबिर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात होणार असून, प्रवेश निःशुल्क आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000



ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा

अमरावती, दि. 2 (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे बुधवार, दि. 3 सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

दौऱ्यानुसार, बुधवार, दि. 3 सप्टेंबर रोजी 3 वाजता विश्रामगृह, तिवसा येथे तालुक्यातील शेतकरी आत्महत्या व शासकीय जमिनीवर चारा लागवड यासंबंधी चर्चा करतील. दुपारी 3.30 वाजता आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियास भेट देतील. त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता सोईनुसार काटोलकडे प्रयाण करतील.

00000






मेळघाट आरोग्य परिक्रमेतील पहिल्या शिबीरात 207 रूग्णांची तपासणी

* मेळघाटात 56 शिबीरे घेण्यात येणार


अमरावती, दि. 2 : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार मेळघाट आरोग्य परिक्रमा अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत मेळघाटातील गावांमध्ये 56 आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीरात सोनोग्राफी, एक्स-रे सह औषधोपचार मोफत देण्यात येत आहे. या अभियानातील चिखलदरा येथील पहिल्या शिबीरात 207 रूग्णांची तपासणी करण्यात आली.

मेळघाट परिसरात या अभियानांतर्गत 30 मे पासून आरोग्य शिबिर अभियान राबविण्यात येत आहे. यातील चिखलदरा येथे शिबीरात 208 रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात गर्भवती माता, वृद्ध, बालके, महिलांनी आरोग्य चिकित्सेचा लाभ घेतला. शिबीरात स्त्रीरोग विभाग 71, अति जोखमीच्या माता 52, स्तनदा माता 19, बालरोग 49, नेत्ररोग 39, असंसर्गजन्य रोग 48, ईसीजी 19, मोतीबिंदू 9, शस्त्रक्रिया 7, हृदयरोग 2, मधुमेह 2, तसेच जिल्हास्तरावी तातडीची उपाययोजना करणे आवश्यक आहे अशा रूग्णांची तपासणी करण्यात आली. 52 रूग्णांची सोनोग्राफी करण्यात आली. यातील 24 रूग्णांना संदर्भित करण्यात आले आहे.

मेळघाटातील आदिवासींची सर्वकष आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून मेळघाट आरोग्य परिक्रमा अभियान राबविण्यात येत आहे. यात प्रत्येक आठवड्यात एक याप्रमाणे महिन्याला चार आरोग्य तपासणी शिबीरे आयोजित करण्यात येणार आहे. पुढील सात महिने आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. तपासणी करून रूग्णांवर उपचार आणि आवश्यक औषधोपचारही मोफत करण्यात आले.

शिबीरात शल्यचिकित्सक डॉ. संजय पाठक, बालरोग तज्ज्ञ डॉ. विजयसिंग राजपुर, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. आशिष धवळे, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. स्नेहल शेट्टी, डॉ. राठी यांनी सेवा दिली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी संजिता महापात्र यांच्या संकल्पनेतून अभियान राबविण्यात येणार आहे. शिबीरासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तिलोत्तमा वानखेडे, डॉ. वानखडे, डॉ. पिंपरकर आणि डॉ. जाकीर यांच्यासह गोडे वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सहकार्य केले.

00000

जिल्हाधिकारी कार्यालयातील जुन्या खुर्च्या विक्रीसाठी दरपत्रक आमंत्रित

 

अमरावती, दि. 2 : जिल्हाधिकारी कार्यालयातील वापरात नसलेल्या शासकीय लाकडी आणि लोखंडी खुर्च्यांची जाहीर विक्री केली जाणार आहे. यासाठी दरपत्रक आमंत्रित करण्यात आले आहे.

यामध्ये विविध प्रकारच्या २३७ खुर्च्यांचा समावेश आहे. या खुर्च्या 'जशा आहेत त्याच स्थितीत' विकल्या जाणार आहेत, त्यामुळे इच्छुक व्यक्ती आणि संस्थांनी प्रत्यक्ष पाहणी करूनच दि. 10 सप्टेंबरपर्यंत दरपत्रक सादर करावेत. या संदर्भातील सविस्तर अटी व शर्ती amravati.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी कळविले आहे.

00000

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...