Monday, September 8, 2025

DIO NEWS AMRAVATI 08-09-2025

                                     










  

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शन शिबिर


       अमरावती, दि. 8 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी आज मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. आयएएस अधिकारी कौशल्या एम. आणि उपजिल्हाधिकारी सोनल सूर्यवंशी यांनी स्पर्धा परीक्षांची माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात हा कार्यक्रम पार पडला. 

       यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खंडारे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी आदी उपस्थित होते.

      श्रीमती कौशल्या यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केल्याने व्यक्तिमत्त्वामध्ये अमुलाग्र बदल होतो. संपूर्ण देशभरातून लाखो विद्यार्थी परीक्षा देत असताना केवळ एक हजार विद्यार्थ्यांची निवड दरवर्षी होत असते. त्यामुळे स्पर्धाही आपल्याला आपल्याशी करावी लागते. केंद्रीय लोकसेवा आयोग दरवेळी परीक्षेची पद्धत बदलत असल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा कस लागत असतो. त्यामुळे कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही.

     स्पर्धा परीक्षेची तयारी करताना प्रामुख्याने इंग्रजी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. तसेच निबंध किंवा इतर विस्तृत प्रश्नांची उत्तरे देताना भाषेची उत्तम जाण असणे आवश्यक आहे. यासोबतच मुख्य परीक्षा लक्षात घेता विषयांची निवडही महत्त्वाची ठरते. यामध्ये विद्यार्थ्यांना ज्या विषयाचे ज्ञान आकलन करणे सोपे आहे, अशा विषयांची निवड करणे फायद्याचे ठरते. स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवणे ही एक लांब प्रक्रिया असून यामध्ये विद्यार्थ्यांचा संयम महत्त्वाचा ठरतो. चाळणी आणि मुख्य परीक्षा, तसेच मुलाखत यातून यशस्वी झालेल्यांनाच शासकीय सेवेची संधी मिळते. यातील एकाही पायरीवर अपयश आल्यास पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांनी सूक्ष्म अभ्यासाचे नियोजन करून ही परीक्षा द्यावी, असे आवाहन केले.

      श्रीमती सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाबत माहिती दिली. यश मिळवण्यासाठी सातत्य आवश्यक असून मेहनत घेण्याची मनाची तयारी असावी लागते. विविध विषयाचा अभ्यास करताना स्वतःचे नोट्स स्वतः काढणे, तसेच व्हिज्युअल तयार करणेही आवश्यक असल्याचे सांगितले. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र या विषयांसोबतच चालू घडामोडी या गोष्टीही महत्त्वाच्या असल्याने यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. परीक्षेतील प्रश्नांचे स्वरूप समजावून घेण्यासाठी गत वर्षातील परीक्षांची प्रश्नपत्रिका समजावून घेणे आवश्यक आहे. प्राथमिक स्तरावर तयारी करण्यासाठी आठवी ते बारावीपर्यंतची पुस्तके बारकाईने वाचून त्यातील नोट्स काढणे महत्त्वाचे आहे. अभ्यासाला पूरक ठरेल यासाठीच समाज माध्यमांचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.

      जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा कल स्पर्धा परीक्षांकडे वाढावा, यासाठी अशा प्रकारचे शिबिरे आयोजित करण्यात येत आहे. याचा युवकांनी लाभ घ्यावा. स्पर्धा परीक्षांमधील प्रक्रियेची माहिती व्हावी, यासाठी अशा प्रकारचे शिबिरे युवकांना मार्गदर्शन ठरतील. स्पर्धा परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्यात यावी. यातून युवकांना फायदाच होणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये विषयांची निवड ही संबंधित विषयाची पुस्तके वाचून त्यातून होणाऱ्या ज्ञानाची आकलन करून निवडावी. विस्तृत उत्तरे लिहिण्याच्या प्रश्नांमध्ये चालू घडामोडींचा उपयोग होत असल्याने तयारी करण्याच्या सुरुवातीच्या काळात वृत्तपत्रे वाचण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
००००

--     

                           रेशिम विभाग आपल्या दारी’ मोहिम

अमरावती, दि. 08 (जिमाका) : रेशिम संचालनालय 1 सप्टेंबर 1997 रोजी स्थापना करण्यात आली. त्यामुळे 1 सप्टेंबर रेशिम दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने रेशीम संचालनालय संचालक विनय मून यांच्या संकल्पनेतून यावर्षी ‘रेशिम विभाग आपल्या दारी’ योजना राबविण्यात येणार आहे.

 शेतकऱ्यांनी मागील दोन वर्षापूर्वी रेशिम योजना राबविण्यासाठी कार्यालयाकडे 500 रूपये प्रती एकर प्रमाणे नोंदणी  केली होती. परंतू काही कारणाने तूती लागवड केली नाही. त्यांना त्यांचे घरी जाऊन रेशीम योजनेचे माहितीपत्रक आणि पुन्हा रेशीम उद्योग सुरू करण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी तुती लागवड त्यावेळी केली नसल्याबाबत अभिप्राय घेण्यात येऊन अडचण दूर करण्याचा प्रयत्न रेशीम संचालनामार्फत करण्यात येणार आहे. दि. 1 ते 15 सप्टेंबरपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे.

 जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत रेशीम विकास योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून राबविण्यात येत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी केले जाणार आहे. एका गावातून कमीत कमी 5 शेतकऱ्यांनी ग्रामसभेच्या संमतीने जिल्हा रेशीम कार्यालयाकडे ग्राम रोजगार सेवकामार्फत अर्ज करावे लागणार आहे. त्यासाठी प्रति एकर 500 रूपये नोंदणी शुल्क रेशीम कार्यालयात जमा कराव लागणार आहे. मनरेगांतर्गत एक एकर वृक्ष जोपासना करण्यासाठी 2 लाख  रूपयांची मंजुरी तीन वर्षात दिली जाणार आहे. रेशीम किटक संगोपनगृह बांधकामासाठी 66 हजार 456 रूपये मजुरी, साहित्यासाठी 1 लाख 53 हजार रूपये जातील, यात 4 लाख 32 हजार रूपये तीन वर्षात दिले जाणार आहे.

 बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र - 2 योजनेत सहभाग घेता येईल. तुती वृक्ष लागवडीसाठी 1 एकरकरीता 45 हजार रूपये, सिंचन व्यवस्थेकरिता 45 हजार रूपये, संगोपनगृह बांधकामकरीता 2 लाख 43 हजार 750 रूपये, संगोपन साहित्याकरीता 37 हजार 500 रूपये आणि निर्जतुकिकरण औषधीसाठी 3 हजार 750 रूपये काम पूर्ण झाल्यावर दिले जातात. या योजनेतून होणारी तूती लागवड मुख्यमंत्री यांनी या पावसाळ्यात 10 कोटी वृक्ष लागवड पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी उदिष्ठ दिले आहे. त्यामध्ये तुती वृक्ष लागवडीची गणना होणार आहे. रेशिम संचालनालयास 4 कोटींचे लक्षांक देण्यात आले आहे. त्यापैकी 24 लाख 400 एकर तुती लागवडीचे उद्दिष्ट जिल्ह्यास देण्यात आले आहे.

 शेतकऱ्यांनी पर्यावरण पूरक व शेतीशी निगडीत रेशीम उद्योग करून रेशीम कोशनिर्मितीपासून उत्‌पन्न वाढवावे, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी यांनी केले आहे.

00000

सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची संधी

 

अमरावती, दि. 08 (जिमाका) : भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी पूर्व प्रशिक्षणाची संधी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 पात्र उमेदवारांना सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे राज्यातील युवक व युवतींसाठी दि. 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर 2025 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र.62 आयोजित करण्यात आले आहे. कोर्स कालाबधीत प्रशिक्षणार्थीना नि:शुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाणार आहे.

 जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या संधीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे दि. 12 सप्टेंबर 2025 रोजी मुलाखतीस हजर राहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी सैनिक कल्याण विभागाच्या वेबसाईटवर सर्च करून त्यामधील एसएसबी 62 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन आणि ते पुर्ण भरून सोबत घेऊन यावे.

 सदर एसएसबी वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे. त्यासंबंधीची पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेऊन यावे. कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन पास झालेली असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसीचे सी सर्टिफीकेट ए किंवा बी ग्रेडमध्ये पास झालेले असावेत. एनसीसी ग्रुप हेडक्वॉर्टर्सने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्यूएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेशप्रणालीसाठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

 याबाबत अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या ई-मेल आयडी training.petenasik@gmail.com व दुरध्वनी क्र 0253 -2451032 किंवा व्हॉटस्अप क्रमांक 9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

00000


No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...