Tuesday, September 16, 2025

DIO NEWS AMRAVATI 16-09-2025

 


ॲड. हेलोंडे पाटील यांची आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट


अमरावती, दि. 16 : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष  ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी आज दि. 16 सप्टेंबर रोजी शिवणी रसुलापूर, ता. नांदगाव खंडेश्वर येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब सुफला योगेश नेरकर यांच्या घरी भेट दिली.

यावेळी त्यांनी कौटुंबिक माहिती घेऊन शासकीय योजनेचा लाभ घेतला असल्याबाबत माहिती घेतली. नेरकर कुटुंबाला उर्वरित योजनाचा लाभ देण्याबाबत विभाग प्रमुखांना सूचना दिल्या. तसेच शिवनी, रसूलापूर येथील सोयाबीन पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

भेटी दरम्यान तहसीलदार अश्विनी जाधव, गट विकास अधिकारी डॉ. श्रीमती. स्नेहल शेलार, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, महिला व बालविकास अधिकारी श्री. गलफड, ग्राम महसूल अधिकारी अश्विनी उईके, वैभव लाड, कृषी सहायक पुरुषोत्तम वंजारी, सरपंच शशिकला खडसे, चंद्रशेखर गावंडे, गजानन देशमुख, पोलीस पाटील प्रवीण इरतकर, चंद्रशेखर गावंडे  उपस्थित होते.

0000


"स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान" अंतर्गत महिलांसाठी आरोग्य सेवा शिबिरांना आजपासून सुरुवात

 

अमरावती,दि. 16 (जिमाका) : जिल्ह्यामध्ये दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत  स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानराबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, क्षयरोग रुग्णालय, तसेच विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती येथे आरोग्य स्टॉल आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानाचा उद्देश महिलांना त्यांच्या घराजवळच आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, तसेच त्यांना अधिक निरोगी, सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणे हा आहे.

 

उपलब्ध सेवा आणि सुविधा:

 

असंसर्गजन्य रोगांसाठी तपासणी: उच्च रक्तदाब आणि मधुमेहासाठी स्क्रीनिंग, तसेच मुख, स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगासाठी तपासणी आणि निदान.

टीबी तपासणी: सहायक महिलांसाठी क्षयरोगाची तपासणी केली जाईल.

अ‍ॅनिमिया आणि सिकलसेल तपासणी: किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी अ‍ॅनिमियाची तपासणी आणि सल्लागार सेवा उपलब्ध असेल. आदिवासी भागातील महिलांसाठी सिकलसेल रोगाची तपासणी, आनुवंशिक सल्ला आणि कार्डचे वितरण केले जाईल.

गर्भवती महिलांसाठी सेवा: हिमोग्लोबिन तपासणी, पोषण आणि देखरेखीबद्दल सल्ला, तसेच मातृ व बाल संरक्षण (MCP) कार्डचे वितरण केले जाईल.

लसीकरण: मुली आणि गर्भवती महिलांसाठी वेळेनुसार लसीकरण सेवा उपलब्ध असेल.

जागरूकता सत्रे: किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल आणि पोषणावर जागरूकता सत्रांचे आयोजन केले जाईल.

मानसिक आरोग्य समुपदेशन: मानसिक आरोग्याच्या समस्यांवर जागरूकता आणि समुपदेशन केले जाईल.

इतर सेवा: स्वयंसेवी गटांच्या महिला प्रतिनिधींमार्फत तेल आणि साखरेचा वापर कमी करण्यासाठी मोहीम राबविली जाईल. तसेच, पोषण आहारासाठी आहार समुपदेशन देखील केले जाईल.

याव्यतिरिक्त, रक्तदान शिबिरे, PM-JAY आणि ABHA कार्ड नोंदणी, तसेच क्षयरोग रुग्णांसाठी स्वयंसेवकांची नोंदणी यासारख्या सेवा देखील उपलब्ध असतील. या अभियानातून जास्तीत -जास्त महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी केले आहे.

00000

 

देशी दारूची एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री,

सात दुकानांवर कारवाई

 

अमरावती, दि. १६ (जिमाका): किरकोळ किंमतीपेक्षा जास्त दराने देशी दारूची विक्री करणाऱ्या सात दुकानांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. विभागाने बनावट ग्राहक पाठवून केलेल्या तपासणीत ही बाब निदर्शनास आली आहे.

 

या प्रकरणी, विजय बी. जयस्वाल (अनुज्ञप्ती क्र. 160, बडनेरा रोड), मे. एस. पी. लिकर्स (अनुज्ञप्ती क्र. 116, मालखेड रेल्वे), श्रीमती शोभा नरेश जयस्वाल (अनुज्ञप्ती क्र. 74, अचलपूर), श्रीमती सलीमाबी अब्दुल खलीद (अनुज्ञप्ती क्र. 56, अंजनगाव सुर्जी), श्रीवास्तव वाईन्स (अनुज्ञप्ती क्र. 71, अंजनगाव सुर्जी), श्री. व्ही. बी. भगत (अनुज्ञप्ती क्र. 78, नांदगावपेठ), आणि श्री महाराष्ट्र वाईन्स (परतवाडा) या अनुज्ञप्तीधारकांवर कारवाई करण्यात आली आहे.

 

या दुकानांमध्ये कमाल किरकोळ किंमतीपेक्षा 10 रुपये जास्त दराने देशी दारू विकली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भात, जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा दंड भरण्याची प्रकरणे सादर करण्यात आली आहेत. तसेच, सातही अनुज्ञप्तीधारकांना एकूण तीन लाख पन्नास हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

 

ही रक्कम 15 दिवसांत शासनाकडे जमा न केल्यास व्याजासह दंडाची रक्कम वसूल केली जाईल आणि अनुज्ञप्ती निलंबित केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. ग्राहकांना जास्त दराने देशी दारू विकली जात असल्यास त्यांनी टोल फ्री क्र. 18008333333 किंवा व्हॉटसॲप क्र. 8422001133 वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.

00000

 

मध्यप्रदेशमधून बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर जिल्हाधिकाऱ्यांची  कारवाई

अमरावती, 16 (जिमाका) : अमरावतीतील रीच गार्डन हॉटेलमध्ये मध्यप्रदेश राज्यात विक्रीस असलेली परराज्यातील दारू बेकायदेशीरपणे विक्रीस ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई करण्यात आली.

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या तपासणीत मध्यप्रदेशातील विविध ब्रँडची 292 बॉटल्स सापडल्या. यामध्ये 1 हजार मिली, 750 मिली, 375 मिली व 180 मिली क्षमतेच्या बॉटल्सचा समावेश आहे. सदर दारूची एकूण किंमत सुमारे 1 लाख 17 हजार इतकी आहे.

अनुज्ञप्तीधारक राज सुनील शाहू तसेच हॉटेलचे व्यवस्थापक निखिल अनिल शाहू  यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर हॉटेलमध्ये परराज्यातून आणलेली दारू बेकायदेशीररित्या विक्रीस ठेवण्यात आली होती. ही दारू ग्राहकांना विक्री करण्यासाठी सज्ज स्थितीत होती. यामुळे संबंधित अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यात आली .

 

        तसेच अमरावती येथील हॉटेल आर. के. रेस्टॉरेंट अ‍ॅण्ड बार, बायपास बडनेरा रोड येथेही कारवाई करण्यात आली.  येथील मद्य भेसळयुक्त तसेच कमी तीव्रतेचे असल्याचे नमुन्याच्या तपासणीअंती आढळून आले. अनुज्ञप्तीधारक राजकुमार छतुमल रतणानी  यांची जिल्हाधिकारी यांच्या समक्ष सुनावणी घेण्यात आली.

 

जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले की, शासन महसुलाचे नुकसान होते तसेच जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे निरीक्षण नोंदवून सदर अनुज्ञप्ती एक महिन्यासाठी रद्द करण्यात आली. परराज्यातील दारूची विक्री राज्यात परवानगीशिवाय करणे गंभीर गुन्हा आहे. यापुढील काळातही अशा बेकायदेशीर कारवायांवर कठोर पावले उचलली जातील, असा इशाराही जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी यावेळी दिला.

00000

 

मोर्शी येथील खुल्या कारागृहात सिताफळ आणि संत्र्यांच्या झाडांच्या फळांचा लिलाव

 

अमरावती, दि. १६ (जिमाका) : जिल्ह्यातील मोर्शी येथील खुल्या कारागृहाच्या जागेवर असलेल्या ४०० सिताफळ आणि ३०० संत्र्यांच्या झाडांवरील फळांचा लिलाव करण्यात येणार आहे. या संदर्भात, अधीक्षकांनी जाहीर सूचना काढून इच्छुक व्यक्तींकडून मोहोरबंद निविदा  मागविल्या आहेत.

 

निविदा सादर करण्याचा कालावधी १८ सप्टेंबर  ते २२ सप्टेंबर २०२५ या दरम्यान, सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत असणार आहे. या निविदा २३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता अधीक्षक, मोर्शी खुले कारागृह यांच्या कार्यालयात उघडल्या जातील.

 

या लिलावात सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींनी निविदा फॉर्म, लिलावाच्या अटी व शर्ती, तसेच झाडांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी कार्यालयाच्या वेळेत (सुटीचे दिवस वगळून) संपर्क साधावा, असे आवाहन मोर्शी खुले कारागृहाचे अधीक्षक  एस. एस. हिरेकर यांनी केले आहे. या लिलावामुळे शासनाला महसूल मिळण्यास मदत होणार आहे.

      00000

 

कडधान्य आणि तेलबियांची आधारभूत किमतीने खरेदी सुरू;

'ई-पीक पाहणी' आवश्यक

 

अमरावती , दि. १६ (जिमाका) : खरीप हंगाम २०२५-२६ साठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किंमतीनुसार, राज्यात नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कडधान्य आणि तेलबियांची (मूग, उडीद, सोयाबीन, तूर) खरेदी सुरू होणार आहे. ही खरेदी पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने होईल. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘ई-पीक पाहणी केलेली असावी आणि त्या पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा सोबत असणे आवश्यक आहे. पणन महासंघाने सर्व शेतकऱ्यांना ‘ई-पीक पाहणीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

00000

 

आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन 29 सप्टेंबर रोजी साजरा करावा

जिल्हा प्रशासनाची माहिती

 

अमरावती, दि. 16 (जिमाका) : माहितीचा अधिकार अधिनियम 2005 लागू होऊन अल्पावधीतच लोकाभिमुख ठरला असून या कायद्याच्या व्यापक प्रसार व प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने विशेष उपक्रम आखले आहेत. शासनाच्या निर्णयानुसार दरवर्षी 28 सप्टेंबर हा दिवस राज्यात माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो.

 

 

यावर्षी 28 सप्टेंबर हा दिवस रविवार असल्याने हा दिवस 29 सप्टेंबर 2025 रोजी साजरा करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. या दिवशी शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत सर्व शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रश्नमंजूषा, चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, व्याख्यानमाला आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वराज्य संस्था व विविध समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने भित्तीपत्रक स्पर्धा, निबंध व वक्तृत्व स्पर्धा तसेच चर्चासत्रांचे आयोजन होणार आहे.

 

 

या उपक्रमांसाठी आवश्यक पारितोषिकांची व्यवस्था लायन्स क्लब, रोटरी क्लब यांसारख्या संस्थांच्या मदतीने केली जाणार आहे. समाजात माहितीच्या अधिकाराबाबत व्यापक जनजागृती व्हावी आणि कायद्याची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावी, हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधितांना 29 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या कार्यक्रमांचा अहवाल सादर करण्याचे आवाहन केले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...