निम्नपेढी प्रकल्पातील नागरिकांच्या स्थलांतराला प्राधान्य द्यावे
-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 9 (जिमाका) : भातकुली तालुक्यातील निम्नपेढी प्रकल्प गतीने पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी भूसंपादन झाल्याने स्थलांतरणासाठी आवश्यक ती प्रक्रिया करण्यात आलेली आहे. बाधित गावांमधील कुटुंबांना भेट देऊन नागरिकांनी पुनर्वसित गावात स्थलांतर करावे, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.
निम्नपेढी प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या पाचही गावांचा जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी आज आढावा घेतला. नागरिकांनी पुनर्वसित गावात स्थलांतर करावे, यासाठी त्यांना स्थलांतरणासाठी देण्यात येणारे एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात यावे. तसेच पुनर्वसित गावात पाणीपुरवठ्याची व्यवस्था प्राधान्याने करण्यात यावी. यामुळे नागरिकांचा कल पुनर्वसित गावात जाण्याकडे राहील.
सिंचन प्रकल्पासाठी भूसंपादन झाल्यानंतर या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक सुविधा पुनर्वसित गावात स्थलांतरित करण्यात यावे. प्रामुख्याने रेशन दुकान, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय स्थानांतरित केल्यास नागरिकांचे स्थलांतरण गतीने होण्यास मदत मिळेल. सध्यास्थितीत गावामध्ये राहत असलेल्या नागरिकांनी चर्चा करून त्यांना पुनर्वसित गावात घरकुल उपलब्ध करून देण्याविषयी सकारात्मक पावले उचलण्यात यावीत, असा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिल्या.
00000
डाक विभागाची बचत उत्सव मोहिम
सुकन्या समृध्दी खाते उघडण्याचे आवाहन
अमरावती, दि. 9 (जिमाका) : अमरावती डाक विभागातर्फे बचत उत्सव विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. यात मुलींच्या नावे सुकन्या समृद्धी खाते उघडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डाक विभागात सुकन्या समृध्दी योजना सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत पालक आपल्या 10 वर्ष वयापर्यंतच्या मुलींचे खाते डाकघरात किमान 250 रूपये भरून उघडू शकतात. योजनेचा सध्याचा व्याजदर 8.2 टक्के असून सदर खाते काढण्याकरीता मुलीचा जन्माचा दाखल, आधार कार्ड, तसेच पालकाचे आधारकार्ड, पॅनकार्ड इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
जिल्ह्यातील डाक अधिकारी, कर्मचारी, शाळा, अंगणवाडी तसेच घरोघरी जाऊन मुलीच्या उज्वल भविष्यासाठी जनजागृती करत आहेत. पालकांनी आपल्या मुलीचे सुकन्या समृद्धी खाते उघडावे, तसेच डाक विभागाच्या इतर बचत योजनांचाही लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर यांनी केले आहे.
0000
उर्ध्व वर्धा जलाशयजवळील जमीन भाडेपट्टीसाठी अर्ज आमंत्रित
अमरावती, दि. 9 (जिमाका) : उर्ध्व वर्धा जलाशयाच्या सभोवतालची जमीन भाडेपट्टीवर देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
उर्ध्व वर्धा जलाशयाच्या बुडीत क्षेत्राच्या काठाभोवतालची 342.50 मीटर ते 343 मीटर तलांकातील अमरावती जिल्ह्यातील 298.22 हेक्टर आणि वर्धा जिल्ह्यातील 30.60 हेक्टर गाळपेर जमीन रब्बी हंगाम आणि तलांक 340 मीटर ते 342.50 मीटरमधील अमरावती जिल्ह्यातील 806 हेक्टर आणि वर्धा जिल्ह्यातील 53 हेक्टर जमीन दरवर्षी उन्हाळी हंगामाकरीता उपलब्ध होऊ शकते.
गाळपेर जमीन भाडेपट्टीवर देण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या व्यक्तींच्या जमिनीच नवीन जलाशय, उत्प्लव बांध, धरण इत्यादी बांधण्यासाठी संपादीत केलेली आहे. किंवा कोणत्याही शासकीय प्रकल्पामुळे अथवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाचा प्रकल्पामुळे ज्यांना बाधा पोहचली आहे अशा व्यक्ती, स्थानिक भूमीहिन, मागासवर्गीयांच्या सहकारी संस्था, ज्यामध्ये बहुसंख्य मागासवर्गीय सदस्य आहेत, अशा मागासवर्गीय आणि मागासवर्गीयेतर स्थानिक भूमिहीन व्यक्तीच्या सहकार संस्था, स्थानिक भूमिहीन व्यक्तीच्या सहकार संस्था, स्थानिक भूमिहीन मागासवर्गीय लोक, इतर वर्गातील स्थानिक भूमिहीन लोक, जेथे गाळपेर जमिनी आहेत, त्या गावच्या बाहेरील भूमीहिन लोक, या व्यतिरिक्त लोकांव्यतिरीक्त इतर स्थानिक भूमिधारक परंतू खंड एक मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या व्यक्तींपैकी उपलब्ध होणारी गाळपेर जमिनीची मौजे व शेतसर्वे व मूळ मालकनिहाय यादी आणि 100 रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर करावयाच्या करारनामा आणि अर्जाचे प्रारूप उपविभागीय अभियंता, उर्ध्व वर्धा पाटबंधारे उपविभाग क्रं. 1, मोर्शी येथे दि. 15 सप्टेंबर 2025 पर्यत द्यावे लागणार आहे.
पात्र लाभार्थ्यांना प्रत्येक कुटूंबांला जास्तीत जास्त 1.20 हेक्टर जमीन भाडेपट्टीवर देण्यात येणार आहे. परंतू कुटूंब प्रमुख हा जर सहकारी संस्थेचा सदस्य असल्यास त्यास मुंबई कुळवहीवाट व शेतजमीन अधिनियम 1978 च्या कलम 6 मध्ये ठरवून दिलेल्या निर्वाहक क्षेत्राच्या मर्यादेस अधिन राहून जास्तीत जास्त 1.6 हेक्टर इतकी जमीन देता येईल. भाडेपट्टीचा दर हा जलसंपदा विभागाच्या पत्रानुसार एका वर्षात दोन पिके घेतली गेल्यास प्रति हेक्टरी रूपये 2 हजार रूपये प्रति 11 महिन्यासाठी व एका वर्षात एकच पिक घेतले गेल्यास प्रति हेक्टरी 1 हजार रूपये प्रति 11 महिन्यासाठी भरणे आवश्यक आहे, असे उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.
00000
शिक्षकांनी सर्वोत्तम आदर्श आचरण ठेवावे
-विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल
अमरावती, दि. 9 (जिमाका) : प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षकांमुळे घडतो. शिक्षकांच्या वर्तनाचा विद्यार्थ्यांवर खोलवर परिणाम पडतो. त्यामुळे शिक्षकांनी सर्वोत्तम आदर्श आचरण ठेवावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी केले.
जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मिलींद कुबडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिश मुगल, डायटचे अधिव्याख्याता प्रविण राठोड आदी उपस्थित होते.
डॉ. सिंघल यांनी शिक्षकांना पिढी घडविण्याची संधी दिली आहे. त्यामुळे शिक्षकांनी त्यांच्या कामावर लक्ष्य केंद्रीत करून शिक्षण देण्याचा आनंद घ्यावा. शाळेचा आत्मा हा शिक्षक आहे. नवीन पिढी घडविण्याचे काम शिक्षकामुळे होत आहे. त्यामुळे शिक्षकांना मिळालेल्या या संधीचे सोने करावे. तसेच विद्यार्थ्यांना अभिमान वाटेल, अशी वागणूक ठेवावी. इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी जिल्हा परिषद शाळांची स्पर्धा असल्याने शाळांनी इंग्रजीवर भर द्यावा. यासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबवावे, तसेच डिजीटल शाळांचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन केले.
श्रीमती महापात्र यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले. शिक्षकांनी येत्या काळात चांगले कार्य करून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवाव्यात, असे आवाहन केले. यावेळी डॉ. कुबडे यांनी मार्गदर्शन केले. श्री. मुगल यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कार प्राप्त शिक्षक गजानन काकडे, वनिता बोरोडे, श्री. विरेंद्र यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2, जिल्हास्तरीय पुरस्कार, शिष्यवृत्ती परिक्षा, निपून महाराष्ट्र पुरस्काराचे वितरण करण्यात आले. अंकुश गावंडे आणि विद्यार्थ्यांनी अलेक्साचे प्रात्यक्षिक सादर केले.
00000
No comments:
Post a Comment