Monday, September 29, 2025

DIO NEWS AMRAVATI 29-09-2025

 माजी सैनिकांना फोनद्वारे कौन्सिलिंग करून करिअर प्रशिक्षण देणार;

15 ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 29 (जिमाका): देशाची सेवा करून निवृत्त झालेल्या सर्व माजी सैनिकांना त्यांच्या आवडीच्या आणि इच्छित असलेल्या क्षेत्रात (सेक्टरमध्ये) काम करण्याची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी पुणे येथील कॅरियर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत, इच्छुक माजी सैनिक उमेदवारांना फोनद्वारे समुपदेशन (कौन्सिलिंग) करून त्यांना योग्य ते कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या समुपदेशनामुळे माजी सैनिकांना त्यांच्या क्षमता आणि बाजारपेठेतील मागणीनुसार नवीन करिअर मार्ग निवडण्यास मदत होणार आहे. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सेना मेडल निवृत्त मेजर आनंद पाथरकर यांनी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. इच्छुकांनी आपले नाव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे 15 ऑक्टोबर 2025 या अंतिम मुदतीपूर्वी नोंदवावी, असे त्यांनी कळविले आहे. 

 

000000

संजय गांधी, श्रावणबाळ योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांनी

'यूडीआयडी कार्ड'सह प्रमाणपत्रांची पडताळणी तात्काळ करावी

अमरावती, दि. 29 (जिमाका): अमरावती शहर संजय गांधी कार्यालयाच्या वतीने संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, शासन निर्देशानुसार, ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे मागील महिन्यात तांत्रिक कारणामुळे अनुदान जमा होऊ शकले नाही, अशा लाभार्थ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करणे आवश्यक आहे. ही पडताळणी पूर्ण केल्याशिवाय त्यांना वाढीव अनुदान मिळणार नाही. त्यामुळे, संबंधित लाभार्थ्यांनी त्यांची मूळ कागदपत्रे म्हणजेच आधार कार्ड, अपंगत्वाचे प्रमाणपत्र आणि यूडीआयडी कार्ड घेऊन शहर संजय गांधी कार्यालय, अमरावती येथे तात्काळ संपर्क साधावा. ज्या लाभार्थ्यांनी आपल्या प्रमाणपत्राची पडताळणी करून घेतली नाही, त्यांना पुढील महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान मिळणार नाही आणि अनुदानात खंड पडल्यास त्यासाठी लाभार्थी स्वतः जबाबदार राहतील, याची गंभीर नोंद घ्यावी. लाभार्थ्यांनी त्वरित कार्यवाही करून आपले अनुदान सुनिश्चित करावे, असे आवाहन शहर संजय गांधी कार्यालयाच्या तहसिलदारांनी केले आहे.

0000

 ओबीसी, ईबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती; आज अंतिम मुदत

अमरावती, दि. 29 (जिमाका): ओबीसी, ईबीसी (आर्थिकदृष्ट्या मागास) आणि डीएनटी (विमुक्त जाती, भटक्या जमाती) प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत उत्तम दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी "Top Class Education in School for OBC, EBC & DNT Students Under PM YASASVI" ही योजना सुरू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2025 आहे. या योजनेंतर्गत 9 वी-10 वीच्या विद्यार्थ्याला वार्षिक  75 हजार रुपये तर 11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्याला  1 लाख 25 हजारपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. या मदतीमध्ये वसतिगृह शुल्क, परीक्षा शुल्क, पुस्तके, गणवेश आणि कोचिंग फीचा समावेश आहे. योजनेसाठी विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे. निवड मागील वर्गातील गुणांवर आधारित मेरिट यादीनुसार होणार आहे, ज्यात 30 टक्के जागा मुलींसाठी राखीव आहेत. ही शिष्यवृत्तीची रक्कम डीबीटीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक गजेंद्र मालठाणे यांनी जिल्ह्यातील पात्र विद्यार्थी तसेच टॉप क्लास शाळांच्या मुख्याध्यापकांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) वर विद्यार्थ्यांचे अर्ज तातडीने भरून कार्यवाही पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. आधार-आधारित उपस्थिती आणि नियमित शैक्षणिक प्रगती या अटींचे पालन करणे अनिवार्य आहे.

000000

पेसा क्षेत्रात कंत्राटी शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

अमरावती, दि. 29 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2025 आहे. अनुसूचित माती आणि इतर प्रवर्गातील (D.Ed/B.Ed + TAIT/TET/CTET उत्तीर्ण) पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

रिक्त पदांच्या तुलनेत अनुसूचित जमातीचे उमेदवार उपलब्ध  झाल्यास, इतर प्रवर्गातील उमेदवारांची मानधन तत्त्वावर नियुक्ती होईल. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज उद्यापर्यंत शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. अमरावती यांच्या कार्यालयात सादर करावेत. इतर जिल्ह्यांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. निवड करताना पेसा क्षेत्रातील उमेदवारांना प्राधान् मिळेल. अधिक माहिती www.zpamravati.gov.in वर उपलब्ध आहे.

                                                                                                                                             

00000

स्वाधार अर्जातील त्रुटी पूर्तता करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 29 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या अनुसूचित जाती (SC) व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण विभागाने एक महत्त्वपूर्ण सूचना जारी केली आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या इयत्ता 11 वी, 12 वी तसेच व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन आणि शैक्षणिक खर्चासाठी ही योजना राबविली जाते. सन 2024-25 साठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, मात्र आवश्यक कागदपत्रे किंवा शासन निर्णयातील अटींनुसार त्रुटी पूर्तता न केल्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत, त्यांनी ही बातमी प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत त्रुटींची पूर्तता करावी. विलंब झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थी विद्यार्थ्यांची राहील आणि अनुदानाचा थेट लाभ मिळणार नाही. विद्यार्थ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन सामाजिक न्याय भवन, सहायक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त आर. व्ही. जाधवर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी 07212661261 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

000000

रेल्वे उड्डाणपूलाच्या सुरक्षिततेसाठी

रेल्वेकडून तातडीच्या उपाययोजना

अमरावती, दि. 29 (जिमाका) : राजकमल रेल्वे उड्डाणपूलाच्या सुरक्षिततेबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी  दिलेल्या निर्देशानुसार मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने तातडीने कार्यवाही केली आहे. उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद असला तरी रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार हा पूल वाहनांच्या वाहतुकीकरिता असुरक्षित घोषित करण्यात आला आहे. त्यानंतर 25 ऑगस्ट 2025 पासून या पुलावरील वाहनांची आणि पादचाऱ्यांची वाहतूक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंद करण्यात आली आहे. पुलाखालून दररोज रेल्वे गाड्या धावत असल्याने संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी दि. 18 सप्टेंबर 2025 रोजी रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला संयुक्त पाहणी करून रेल्वे वाहतूक थांबवण्याबाबत किंवा वळवण्याबाबत अहवाल देण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार रेल्वे प्रशासनाने कार्यवाही केली आहे. रेल्वे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग व स्ट्रक्चरल ऑडिट सल्लागार यांच्या संयुक्त पथकाने दि. 18 व 19 सप्टेंबर 2025 रोजी पुलाची पाहणी केली. त्यानुसार राजकमल पुलाखालून रेल्वे वाहतुकीला कोणताही तात्काळ धोका नाही. संयुक्त पाहणी अहवालानुसार, पुलावर वाहनांची वाहतूक पूर्णपणे थांबविल्यामुळे त्यावर कोणतेही 'गतिमान भारण' नाही. सध्या हा पूल फक्त स्वतःचे 'डेड लोड' घेण्यास सक्षम आहे. त्यामुळे पुलाखालून धावणाऱ्या रेल्वे वाहतुकीला कोणताही तात्काळ धोका नाही. परिणामी सध्या रेल्वे वाहतूक थांबवण्याची किंवा वळवण्याची गरज नाही.

पुलामुळे संभाव्य निर्माण होणारा अपघात लक्षात घेता 24 तास निगराणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. याबाबत रेल्वे विभागाने पुलाच्या ठिकाणी संरचनात्मक बिघाडाच्या सर्व चिन्हावर त्वरित लक्ष ठेवण्यासाठी पूर्णवेळ वॉचमन तैनात करण्यात आला आहे.

शहराच्या वाहतुकीतील रेल्वे पुलाचे महत्व लक्षात घेता पुलाच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रेल्वे पुलाचे 'डिसमँटलिंग' म्हणजेच पाडकाम (रेल्वे स्पॅन) करण्याची योजना अंतिम करण्याच्या आणि त्यासाठीचा खर्च अंदाजित करण्याच्या प्रक्रियेत आहे. तसेच पुलावरील वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेता वेळेची मर्यादा पाळण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रेल्वे विभाग पुलाचे पाडकाम अंदाजित चार महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

रेल्वे विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला आयआयटी, व्हीएनआयटीसारख्या संस्थांकडून पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याची आणि 'टिल्ट मीटर्स', 'क्रॅक प्रोपगेशन गेजेस' यांसारख्या तांत्रिक मॉनिटरिंग प्रणाली बसवण्याची सूचना केली आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रतीक गिरी, रेल्वेचे उपविभागीय अभियंता श्रीकृष्ण गोमकाळे, सहाय्यक अभियंता एन प्रकाश रेड्डी स्ट्रक्चरल ऑडिट सल्लागार कन्स्ट्रक्शन मॅजिक यांनी संयुक्तपणे रेल्वे पुलाची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची दोन भागात पाहणी केली. या पाहणीत बेलपुराकडील रेल्वे पुलाला बारीक तडे, तर रायली प्लॉटकडील संपूर्ण पुलाला तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र सद्यस्थितीत पुलावरून कोणतीही वाहतूक होत नसल्याने पुलाखालील वाहतुकीला कोणताही धोका नाही. त्यामुळे ही वाहतूक सुरळीत सुरू राहील. पुलावरील वाहतुकीला प्रतिबंध घालण्यात आल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला भिंत उभारण्यात आली आहे. या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहे. तसेच पुलाजवळ कोणत्याही प्रकारची वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

रेल्वे पुल संरचनेच्या सुरक्षिततेची आणि देखरेखीची काळजी घेण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या सूचना काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. तसेच आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी निर्देश देण्यात आले आहे.

0000000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...