वरूडमध्ये 8 ते 11 फेब्रुवारीदरम्यान राष्ट्रीय कृषी विकास परिषद शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - आमदार डॉ. अनिल बोंडे


अमरावती, दि. 2 :  कृषी विभाग व विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने वरूडमध्ये राष्ट्रीय कृषी विकास परिषद दि. 8 ते 11 फेब्रुवारी दरम्यान होणार असून, त्याद्वारे कृषी प्रदर्शनासह कृषी संस्कृती दर्शन व नवतंत्रज्ञानाविषयी माहिती, मार्गदर्शन मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.
          परिषदेचे उद्घाटन दि. 8 रोजी दुपारी 1 वाजता होईल. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, खासदार रामदास तडस, अभिनेते मकरंद अनासपुरे व भारत गणेशपुरे उपस्थित राहतील. यादिवशी सायंकाळी 6 वाजता रामपाल महाराज यांचा ग्राम कृषी सप्तखंजिरी प्रबोधनाचा कार्यक्रम होईल.
  परिषदेत कृषी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते दि. 9 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता महाराजस्व अभियानाचे उद्घाटन होईल. पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यावेळी उपस्थित राहतील. शासकीय योजनांच्या लाभार्थींचा सन्मान सोहळाही यावेळी होईल. यादिवशी सकाळी 11 वाजता शैलेष मधने यांचा चारा, मुक्त संचार गोठा या विषयावर मार्गदर्शन व दु. 4 वाजता दंडार लोककला उत्सव होईल.
रविवार, दि. 10 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता राष्ट्रीय लिंबुवर्गीय संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एम. एस. लधानिया यांचा संत्रा लागवड व आधुनिक तंत्रज्ञान, तर शिरीष टांक यांचे जीवाणूयुक्त बायोकॅप्सुलद्वारे वाढीव उत्पादनाबाबत मार्गदर्शन होईल. दु. 2 वा. महिला उद्योजकता सन्मान, हळदीकुंकू, उखाणे स्पर्धा व सायंकाळी 5 वाजता युवा नृत्य स्पर्धा होईल.
सोमवार, दि. 11 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता रेशम शेती : उत्कृष्ट जोडधंदा व त्यानंतर पावसाच्या पाण्याचे संवर्धन, साठवण व पुनर्भरण आणि त्यानंतर सूक्ष्म सिंचनावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होईल. यादिवशी दु. 2 वाजता अल्पसंख्याक मिलन सोहळा सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे व गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत होईल. दुपारी 3 वाजता समारोपप्रसंगी  बक्षीसवितरण, गौरव समारंभ आदी कार्यक्रम होतील, असेही त्यांनी सांगितले.
  0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती