Monday, February 4, 2019

छोट्या व्यावसायिकांच्या गरजा व व्यवसायवाढीच्या शक्यता लक्षात घेऊन काम करावे
मुद्रा बँक कर्ज वितरणाबाबत 3 दिवसांत तपशील सादर करा
-         पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांचे बँकांना निर्देश

अमरावती, दि. 4 :  मुद्रा बँक योजनेत कर्ज वितरणाबाबत केवळ आकडेवारी न सांगता कर्जदाराची नावे, व्यवसाय आदी सविस्तर तपशील याद्यांसह येत्या 3 दिवसांत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले. छोट्या व्यावसायिकांच्या गरजा व व्यवसायवाढीच्या शक्यता लक्षात घेऊन अधिक प्रभावीपणे व लोकाभिमुख काम करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
  मुद्रा बँक समन्वय समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्यासह राज्यस्तरीय समितीचे सदस्य किरण पातुरकर, निवेदिता चौधरी दिधडे, जिल्हास्तरीय समितीचे सदस्य विनोद कलंत्री, गिरीश शेरेकर, बादल कुलकर्णी, हरिष साऊरकर, विलास राठोड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अनंत भंडारी, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी श्री. देशमुख, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, एमसीईडीचे सदानंद डबीर, जिल्हा रोजगार अधिकारी प्रफुल्ल शेळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
योजनेत जिल्ह्यात 57 हजार 353 व्यक्तींना 227 कोटींचे कर्जवितरण झाले, अशी माहिती अग्रणी बँकेचे श्री. देशमुख यांनी दिली. त्याबाबत श्री. पोटे पाटील म्हणाले की, या योजनेत कोणत्या व्यवसायासाठी कर्जवितरण करण्यात आले, याबाबत बँकनिहाय व शाखानिहाय आकडेवारी जिल्हा अग्रणी बँकेने सादर करावी. उद्योग विभाग, ग्रामोद्योग आदी विविध व्यवसायांकडून प्रस्ताव जातात; पण बँकांकडून कार्यवाही होत नाही, असेही निदर्शनास आले आहे. छोट्या व्यवसायांच्या वाढीच्या शक्यता लक्षात घेऊन मुद्रांतर्गत कर्जवितरण वाढले पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, विद्यमान काळात उपलब्ध तंत्रज्ञान, यंत्रे मिळवून अनेक छोटे छोटे व्यवसाय निर्माण करता येणे शक्य आहे. शासनाकडून अशा गोष्टींसाठी नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे.  त्यांना अशा व्यवसायाबाबत मार्गदर्शन मिळून ही त्यासाठी मुद्रा बँक योजनेतून लाभ देता येता येणे शक्य आहे. त्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. यासंबंधी आयोजित मेळाव्यातून प्रेरणादायी यशोगाथा व व्यवसायाबाबत माहिती- मार्गदर्शनाचाही समावेश असावा.  रेशीम विकास, मोबाईल रिपेरिंग, मधनिर्मिती, हातकागद निर्मिती, खाद्यपदार्थ निर्मिती, हस्तकला अशा अनेक व्यवसायांबाबत मार्गदर्शन व्हावे जेणेकरुन योजनेची परिणामकारता वाढेल.  
बँकेत कर्ज मागण्यासाठी येणा-या व्यक्तींना संपूर्ण माहिती दिली पाहिजे. बँकेत फॉर्म उपलब्ध नाहीत , अशी माहिती देऊन परत पाठविण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. तसे घडता कामा नये. याबाबत नागरिकांना संपूर्ण सहकार्य करावे, असे श्रीमती दिधडे यांनी सांगितले. बँकांनी नागरिकांना योजनेबाबत परिपूर्ण माहिती देऊन कर्ज वितरणाबाबत सकारात्मक दृष्टीने काम करावे, असे श्री. पातुरकर म्हणाले.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...