Friday, February 8, 2019

अमरावती- अकोला जिल्ह्यात कर्करुग्णांचे चिंताजनक प्रमाण गुटखा विक्रीविरुद्ध धडक मोहिम राबवा - आमदार डॉ. सुनील देशमुख





अमरावती, दि. 8 : अमरावती व अकोला या दोन जिल्ह्यांतून कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण येत असल्याचा नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा अहवाल असून, गुटखा व खर्रा याबाबतची व्यसनाधीनता हेच त्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे अवैध गुटख्याविरुद्ध पोलीस व एफडीए यांनी धडक मोहिम राबवावी, असे निर्देश आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी आज येथे दिले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, अति. पो. अधिक्षक जयंत मीना, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, अन्न व औषध विभागाचे अधिकारी एस. डी. केदारे, बी. के. चव्हाण आदी उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले की, अमरावती व अकोला जिल्ह्यातून अचानक कर्करुग्ण वाढल्याबाबत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या अधिका-यांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यात घस्याचा व अन्ननलिकेचा कर्करोग असलेल्या रुग्णांचा समावेश असून, अवैध गुटखा व ओला खर्रा याबाबतची व्यसनाधीनता हेच कारण आहे. अनेक तरुण या व्यसनाच्या जाळ्यात असून, एक पिढी या व्यसनातून बरबाद होत आहे. त्यामुळे पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने विविध विभागांचे सहकार्य मिळवत धडक मोहिम राबवावी.
   सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता गुटखा विक्रेत्याविरुद्ध भारतीय दंडसंहितेतील कलम 328 नुसार अजामीनपात्र गुन्हा दाखल होतो. त्याचा काहीसा धाक निर्माण झाल्याचे श्री. केदारे म्हणाले. त्याबाबत डॉ. देशमुख म्हणाले की, गुटखाबंदीच्या कारवाईत केवळ गोदाम रखवालदारांना पकडून उपयोग नाही. गुटखा रॅकेट कोण चालवते, ते तपासून त्याच्या मुळापर्यंत गेले पाहिजे. धाड टाकल्यावर आरोपीला सुटण्याची संधी मिळता कामा नये. गुन्हे दाखल झाल्यावर गुन्हे सिद्ध होण्याचेही प्रमाण वाढले पाहिजे.


डुप्लिकेट गुटख्याच्या निर्मितीला प्रतिबंध घाला
शहरात डुप्लिकेट गुटख्याची निर्मिती होत असल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणावर येत आहेत. सडक्या सुपारीला केमिकल लावून असा गुटखा इंदूरहून पाऊच मागवून पॅक होतो. त्यासाठीचे मशिन एक ते दीड लाख रुपयांत मिळत असल्याने अनेक ठिकाणी तो तयार होतो व सर्रास विकला जातो, अशी तक्रार आहे.  हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. तो वेळीच रोखला पाहिजे, असे डॉ. देशमुख म्हणाले.
जिल्ह्यात 16 तंबाखू नियंत्रण कक्ष असून, गत वर्षात 17 हजार 348 तंबाखू खाणा-या नागरिकांनी कक्षाला भेट दिली.  त्यातील 1 हजार 632 नागरिकांनी तंबाखूचे व्यसन सोडले, अशी माहिती डॉ. निकम यांनी दिली. त्याबाबत डॉ. देशमुख म्हणाले की, व्यसनमुक्तीसाठीच्या उपक्रमांचे यशापयश तपासण्यासाठी वर्षनिहाय तपशीलवार आकडेवारी, व्यसनमुक्त व्यक्तींच्या याद्या आदी माहिती सादर करणे आवश्यक आहे.
                    हा अत्यंत गंभीर प्रकार असून, येत्या 15 दिवसांत धडक मोहिमेतून गुटखा निर्मिती व विक्रीच्या प्रकाराला आळा घालावा, असे जिल्हाधिकारी श्री. देशमुख यांनी सांगितले. त्यासाठी एफडीए व पोलीस विभागाला जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, असेही ते म्हणाले.
          गुटखाविक्री व निर्मितीचे गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण वाढण्यासाठी कारवाई करताना शासकीय अधिकारी- कर्मचा-यांना पंच करावे, असे श्री. बाविस्कर म्हणाले.
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...