Monday, February 4, 2019

समृद्धी महामार्गाबाबत पालकमंत्र्यांकडून आढावा ‘समृद्धी महामार्गा’च्या कामांना गती द्यावी - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील



समृद्धी महामार्गाबाबत पालकमंत्र्यांकडून आढावा
‘समृद्धी महामार्गा’च्या कामांना गती द्यावी
-          पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

अमरावती, दि. 4 :  समृद्धी महामार्ग हा राज्याच्या संपर्कयंत्रणा व विकासासाठी महत्वपूर्ण असून, त्याच्या कामाला गती देऊन हे काम तत्काळ पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात या विषयावर आयोजित बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, मनपा आयुक्त संजयकुमार निपाणे, उपायुक्त प्रमोद देशमुख यांच्यासह राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंता उपस्थित होते.
अमरावती जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची लांबी सुमारे 73 कि. मी. आहे. रस्त्याची रुंदी 120 मीटर असेल. धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यातील 46 गावांतून हा रस्ता जाईल. धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा गावापासून सुरुवात होऊन नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ येथपर्यंत जिल्ह्यातील रस्ता आहे. जिल्ह्यात महामार्गासाठी 91 टक्के जमिनीचे भूसंपादन झाले आहे.
            श्री. पोटे पाटील म्हणाले की, समृद्धी महामार्गाबाबत प्रलंबित परवानग्यांबाबत तत्काळ कार्यवाही व्हावी जेणेकरून कामाला गती मिळेल. खनिज उत्खननाची मर्यादा वाढविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.  उत्खनन केलेले खनिज वाहून नेताना धूळ आदींमुळे पीकाचे नुकसान होत असल्याच्या गावांतील नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यावर ठोस उपाय अवलंबावा व काम तत्काळ पूर्ण करावे. आवश्यक तिथे छोटे रस्ते करावेत. शेतक-याच्या जमिनी अधिग्रहित करताना तत्काळ मोबदला मिळवून द्यावा.
विभागीय क्रीडा संकुलाच्या कामांचा आढावा
विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या कामांचा आढावाही यावेळी त्यांनी घेतला. क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख यांनी कामांची माहिती दिली. युथ होस्टेल, संकुलांतर्गत रस्ते आदी कामांना गती देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...