गणपती विसर्जनासाठी शहरात 50 कृत्रिम तलाव



              पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा
-          जिल्हाधिकारी शैलेश नवाल
            अमरावती, दि. 29 : छत्री तलाव, वडाळी तलाव येथे गर्दी टाळण्यासाठी व वाहतूक सुरळीत राहण्यासाठी शहरात प्रमुख चौकांत गणपती विसर्जनासाठी 50 कृत्रिम तलाव तयार करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नुकतेच दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत ते बोलत होते. महापालिकेचे कार्यकारी अभियंता एस. एन. चव्हाण, एस. ए. उमाळे डॉ. अरुण लोहकपुरे, अन्न व औषधे सहायक आयुक्त स. दे. केदारे, पोलीस निरीक्षक निलिमा आरज आदी उपस्थित होते.
गणेशोत्सवात माती, शाडूच्या मूर्तीचा वापर होण्याबाबत महापालिकेने पुढाकार घ्यावा, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिकेकडून नागरिकांना विविध माध्यमांतून आवाहन करावे. यासाठी महापालिकेच्या कचरा संकलन गाड्यांवरील ध्वनीक्षेपकांचा वापर करता येणेही शक्य आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पर्यावरणाचा र्‌हास होतो. त्यामुळे माती व शाडूच्या मूर्ती वापरण्याबाबत जागृती व्हावी. गणेश स्थापना व विसर्जन मिरवणूकांच्या मार्गावरील वीजेच्या तारा लोंबकळत असतील तर तत्काळ दुरुस्ती करावी.  सर्व पथदिवे सुरु राहण्याची दक्षता घ्यावी. वीजपुरवठा सुरळीत ठेवावा. मिरवणुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून अतिक्रमण हटवावे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. कुठेही अस्वच्छता निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी.
ते पुढे म्हणाले की, पावसामुळे रस्त्यांवर निर्माण झालेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करावी. 31 ऑगस्टपूर्वी हे काम झाले पाहिजे.  नादुरुस्त रस्त्यांमुळे मिरवणुकीत अडथळा आल्यास संबंधित यंत्रणा व अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल.
            मद्यप्राशन करुन वाहने चालविणा-यांवर सक्त कार्यवाही करावी. त्यासाठी चौकाचौकात पथक निर्माण करावे. गणेशोत्सवात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी कायदा व सुव्यवस्था काटेकोर ठेवावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
                                                000 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती