Thursday, August 29, 2019

शेतकरी बांधवांनी कीटकनाशक फवारणीबाबत काळजी घ्यावी -जिल्हाधिकारी शैलेश नवाल



अमरावती, दि. 29 : यंदा कपाशीचा पेरा वाढला असून, बोंडअळी नियंत्रणासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.  कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत तालुका कृषी कार्यालयांकडून मार्गदर्शन केले जात असून, शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा, तसेच फवारणी करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल, तसेच कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात कपाशीच्या पे-यात वाढ झाली आहे. जुलै- ऑगस्टमधील पावसाने पिकांची स्थिती चांगली आहे. गतवर्षी गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन शेतकरी बांधवांनी केल्याने या अळीचे नियंत्रण ब-यापैकी यशस्वी झाले आहे. सद्यस्थितीत कपाशी फुलोरा येण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे बोंडअळी नियंत्रण आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनी कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, प्रादेशिक संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनात कार्यवाही करावी. गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी प्रति हेक्टरी पाच फेरोमॅन ट्रॅप, नीम अर्काची फवारणी, डोमकळी नष्ट करणे आदी उपाय योजावेत.
शेतकरी बांधवांनी कीटकनाशकाची खरेदी परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदीच्या पक्क्या बिलासह करावी. फवारणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी हवेच्या दिशेने करावी.  संरक्षण किटचा वापर करावा. उपाशीपोटी फवारणी करू नये. शरीराला जखम असेल किंवा आजारी असल्यास फवारणी करू नये. केवळ फवारणीचे काम करणा-या मजूर बांधवांनी आरोग्य विभागाकडून नियमित तपासणी करावी. विषबाधा झाल्याचे आढळल्यास तातडीने उपचार घ्यावेत. सलग दिवस फवारणी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
                                                000   

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...