मेळघाटात भक्कम संपर्कयंत्रणेसाठी ‘स्पेशल कनेक्टिव्हिटी प्लॅन’

  दोन आठवड्यात कामाला गती देण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश  

अमरावती, दि. 31 : दुर्गम मेळघाटात रस्ते, वीज व नेटवर्क कनेक्टिव्हिटीचे भक्कम जाळे निर्माण करण्यासाठी ‘मेळघाट स्पेशल कनेक्टिव्हिटी प्लॅन’ जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे. भक्कम संपर्कयंत्रणेसाठी आवश्यक परवानग्या व इतर कार्यवाही दोन आठवड्यांत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश आज येथे दिले.
बांधकाम विभाग, महावितरण व विविध नेटवर्क कंपन्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. महावितरणचे अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे, रिलायन्सचे योगेश ठाकरे, समीर केणे यांच्यासह विविध विभागांचे व कंपन्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
 जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, मेळघाटात भक्कम संपर्कयंत्रणा उभारण्यासाठी वीज, रस्ते व नेटवर्क कनेक्टिव्हिटी या सेवांची सुरळीत उपलब्धता असणे आवश्यक आहे.  त्यामुळे स्पेशल कनेक्टिव्हिटी प्लॅननुसारनुसार समन्वयाने व गतीने काम करण्यात येईल. सर्व आवश्यक सेवांच्या एकसंध परिणामातूनच दुर्गम परिसरातही भक्कम संपर्क निर्माण होईल व विकासाला चालना मिळेल. धारणी तालुक्यातील 8 व चिखलदरा तालुक्यातील 16 गावांत वीज पोहोचविण्यासाठी 36 कोटी 92 लक्ष रुपये निधीचा महावितरणचा प्रस्ताव आहे. त्यापैकी 12 गावांबाबतचा प्रस्ताव वनविभागाच्या परवानग्यांसाठी पाठविण्यात आला. उर्वरित गावांचा प्रस्ताव तत्काळ पाठविण्यात यावा.
‘बीएसएनएल’कडून काही ठिकाणी टॉवर सुरु आहेत. मात्र, नियोजनानुसार सर्व टॉवर कार्यान्वित झाले नाहीत. ते काम दोन आठवड्यात पूर्ण करावे. ‘रिलायन्स जिओ’कडून 12 टॉवर उभारण्यात आले व 36 टॉवर निर्माण होत आहेत. वनविभागाकडून आवश्यक परवानग्या लवकरात लवकर मिळवण्यात याव्यात. गावांना जोडणा-या रस्त्यांची भक्कम बांधणी व वेळोवेळी दुरुस्ती करावी. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव आदी कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.  
एकताई, भांडुम, सलिता, लाखेवाडी या गावांत विद्युतीकरणाची कार्यवाही होत आहे, असे श्री. खानंदे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती