वरुड नप प्रशासकीय इमारत व जलतरण तलावाचे लोकार्पण जिल्ह्यातील शहरांची आदर्श नगरपालिकेकडे वाटचाल - कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे





अमरावती, दि. २९ : उत्तम पायाभूत सुविधांसाठी मोठा निधी व वेळेत काम पूर्ण करण्यावर शासनाने भर दिल्याने जिल्ह्यातील शहरांची आदर्श नगरपालिकेकडे वाटचाल होत आहे, असे प्रतिपादन 
कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज वरुड येथे केले. 
नगर परिषद वरुड कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचा व जलतरण तलावाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, नगराध्यक्ष स्वाती आंडे, वसुधाताई बोंडे, मुख्याधिकारी रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

         पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, वरुड, मोर्शी व शेंदूरजना घाट या तिन्ही नगरपालिका भविष्यात आदर्श ठराव्यात, अशी आदर्श कामे आकारास येत आहेत.  आदर्श पालिकेचे निकष पूर्ण होत आहेत. प्रशासकीय इमारती, जलतरण तलाव, पाणी पुरवठा आदी कामांसह भूमिगत वीजवाहिनीसारख्या उपक्रमाचे प्रस्ताव आहेत.

शहरात प्लास्टिक मुक्तीसाठी महिला बचत गटांना कापडी पिशव्या व्यवसायांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. परिसरात कृषी विकासासाठी ६०० कोटी रुपयांचा संत्रा प्रकल्प आकारास येत आहे. ठिबक सिंचनासाठी ८० टक्के अनुदान देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्तेविकासासाठी मोठा निधी मिळवून दिला. त्यामुळे जिल्ह्यात अनेक रस्ते तयार होत आहेत. समृद्धी महामार्गामुळे मुंबईचे अंतर कमी होऊन संत्रा, शेतीमाल वाशीसारख्या मोठया बाजारपेठेत पोहचवणे शक्य होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

       श्री. सागर म्हणाले की, इमारत व जलतरण तलावाचे काम तीन वर्षात पूर्ण झाले. कृषी मंत्री डॉ. बोंडे यांनी मोठा निधी मिळवून दिला. त्यामुळे रस्ते, इमारती आदी पायाभूत सुविधांसह विविध क्षेत्रात अनेक कामे होत आहेत. नगरविकास विभागाने १५ कोटी रुपये वरुड शहरासाठी दिले आहेत. रस्त्यांसाठी आणखी निधी उपलब्ध करून देऊ, असे ते म्हणाले.
       वरूडची हद्दवाढ झाल्याने नव्या परिसरात विकासकामांसाठी १२ कोटी रुपये निधीची गरज असल्याचे श्रीमती आंडे यांनी सांगितले.
        इमारतीसाठी ५ कोटी व जलतरण तलावासाठी ३ कोटी रू. निधी मिळाला. दोन्ही प्रकल्प वरुड नगरीच्या वैभवात भर घालणारी आहेत, असे श्री. पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले. प्रधानमंत्री आवास योजनेत लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे, विविध बचत गटांना निधी वाटप यावेळी झाले.
        ०००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती