चंदन व औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा कोट्यावधींच्या प्रलंबीत अनुदानाचा मार्ग मोकळा केला - कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे


केंद्र शासनाकडून चंदन व औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी  मिळणारे कोट्यावधी रूपयांचे अनुदान मागील दोन वर्षांपासून प्रलंबीत राहीले होते. कृषीमंत्रीपदाचा कार्यभार घेतल्यावर या बाबत माहिती मिळताच कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी शेतकऱ्यांना त्वरीत अनुदान वाटपाचे निर्देश दिल्यामुळे हे अनुदान आता लवकरच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे राज्यातील हजारो औषधी वनस्पती उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मंत्रालयात आज अहमदनगर व अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषीमंत्री डॉ. बोंडे यांना चंदनाची रोपे देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी आमदार प्रभुदास भिलावेकर व वरूडचे सामाजिक कार्यकर्ते बाळू मुरूमकर उपस्थित होते. 

यावेळी कृषीमंत्री डॉ. बोंडे म्हणाले, राज्यात पान पिंपरी, शतावरी यांसारख्या औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणात लागवड होते. तसेच राज्यातील काही भागात चंदनाचे देखील उत्पादन घेतले जाते. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.  चंदन व औषधी वनस्पतींच्या शेतीसाठी केंद्र शासनाच्या आयुष अभियानांतर्गत प्रति हेक्टरी 58 हजार रूपयांचे अनुदान दिले जाते.  मात्र दोन वर्षांपासून हे अनुदान प्रलंबित राहीले होते. या शेतकऱ्यांना त्वरीत अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून याचा चंदन व औषधी उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना चंदनाची व औषधी वनस्पतींची उत्कृष्ट दर्जाची रोपे देखील उपलब्ध होतील असा विश्वास ही कृषीमंत्री डॉ. बोंडे यांनी यावेळी व्यक्त केला. 
 
अहमदनगर जिल्ह्यतील चंदन व फळझाडे उत्पादक शेतकरी राजेंद्र गाडेकर, पत्रकार विनायक गोळे,  श्री विष्णू दरेकर, अमरावती जिल्हयातील शेतकरी सुभाष थोरात, विजय लांडोळे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा करून कृषी मंत्री डॉ. बोंडे यांची याबाबत भेट घेतली होती. याबाबत महत्तवपूर्ण निर्णय घेण्यात आल्यामुळे त्यांनी आज कृषीमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती