जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जैविक शेतीची गरज - कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे

 कृषी मंत्र्यांचा श्रीलंकेतील शेतक-यांशी संवाद
                   




अमरावती, दि. 31 :  रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापराने जमिनीचा पोत घसरून उत्पादनक्षमता कमी होत आहे. त्यामुळे जैविक शेतीचा अवलंब होण्याची गरज आहे, असे पालकमंत्री तथा कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी हातुर्णा येथे सांगितले.
  महर्षी अरविंद फौंडेशन व इथिक सायन्स फौंडेशनतर्फे हातुर्णा येथे श्रीलंकेतील 27 शेतकरी बांधवांसाठी पारंपरिक व जैविक शेतीपद्धती कार्यशाळा आयोजिण्यात आली होती. त्याला उपस्थित राहून कृषी मंत्र्यांनी श्रीलंकेतील शेतक-यांशी संवाद साधला. श्रीलंकेतील कृषी विद्यापीठातील प्राध्यापक श्रीमती सुजीवा, फौंडेशनचे अध्यक्ष गज अरविंदजी, श्रीमती वसुधाताई बोंडे, उपविभागीय कृषी अधिकारी राहूल सातपुते यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, अधिक उत्पादन मिळविण्यासाठी रासायनिक कीटकनाशके, बियाण्याचा मोठा वापर झाला. त्याची परिणती जमिनीचा पोत घसरण्यात झाली. त्यामुळे उत्पादनक्षमताही कमी झाली. ही स्थिती सुधारण्यासाठी जैविक शेती हा पर्याय आहे. पारंपरिक शेतीपद्धतीत पीक काढल्यानंतर घरी बियाणे काढून ठेवले जायचे. भारतासारख्या कृषी प्रधान देशातही अनेक ठिकाणी अजूनही घरी उत्पादित  बियाणे वापरले जाते. जमिनीची उत्पादनक्षमता वाढवणे व निसर्गाला अनुकूल पीकपद्धतीसाठी जैविक शेतीचा अवलंब व्हावा.
प्रा. सुजीवा म्हणाल्या की, भारत व श्रीलंकेतील सौहार्दपूर्ण संबंध प्राचीन आहेत. दोन्ही संस्कृतींत मोठे साम्य आहे. हे संबंध दृढ करण्याठी दोन्ही देशांनी जैविक शेतीसाठी संयुक्त शेतीविषयक कार्यशाळा घ्यावी. पृथ्वीतलावरील समस्त सजीवांसाठी जैविक शेतीचा अवलंब आवश्यक आहे.
यावेळी परिसरातूनही अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती