Thursday, August 29, 2019

ट्रक टर्मिनस, सभागृह व व्यापारी संकुलाचे उद्घाटन शहर विकासासाठी नव्या उद्योगांना चालना - कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे





अमरावती, दि. 29 : महापालिकेच्या ट्रक टर्मिनस, सभागृह व व्यापारी संकुलाचे काम अत्यंत दर्जेदार झाले असून, अमरावती शहराच्या विकासासाठी  नव्या उद्योगांना चालना देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. बोंडे यांनी आज येथे सांगितले.

महापालिकेच्या तारखेडा येथील ट्रक टर्मिनस, सभागृह व व्यापारी संकुलाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, खासदार नवनीत राणा, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्याताई टिकले, स्थायी समिती सभापती बाळासाहेब भुयारपक्षनेता सुनील काळे, गोपाळ धर्माळे, प्रमिलाताई जाधव, आयुक्त संजय निपाणे आदी उपस्थित होते.

            पालकमंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, ट्रक टर्मिनेस व व्यापारी संकुल शहराच्या विकासात योगदान देणारे ठरेल. शहरात टेक्सटाईल पार्कसाठी नव्याने चारशे हेक्टर जागा मिळविण्यात येत असून, नव्या उद्योगांना चालना देण्यात येईल. शहरातील स्वच्छता व आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा. नागरी आरोग्य सेवेत प्रत्येक झोनमध्ये चांगली रुग्णालये हवीत. शहरात प्रधानमंत्री आवास योजना अत्यंत चांगली राबवली जात आहे. डॉ. देशमुख यांच्या प्रयत्नामुळे अकोली बायपासचे काम होत आहे.  
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे विदर्भात मोठा निधी मिळाला आहे, असेही ते म्हणाले.

राज्यमंत्री श्री. सागर म्हणाले की, ट्रक टर्मिनसचे काम अभिनव व अत्यंत सुंदर झाले आहे. विकासाच्या प्रक्रियेत, अनेक सेवांमध्ये ट्रक चालकांच मोठे योगदान असते. या घटकाची जाणीव ठेवून हे काम केले, याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. या प्रकारचा ट्रक टर्मिनस इतरत्र मी पाहिलेला नाही. त्यामुळे मुंबई महापालिका व इतरही ठिकाणच्या अधिकाऱ्यांना इथे पाहणी करण्यासाठी आणण्यात येईल. इतर शहरातही असे टर्मिनस उभारण्यास निश्चित मदत करू, असेही ते म्हणाले.
डॉ. देशमुख म्हणाले की, एकेकाळी याठिकाणी डम्पिंग ग्राउंड व मोठे अतिक्रमण होते. शहरात ट्रकचे अनधिकृत पार्किंग होत होते. ट्रक चोरीचे प्रकार घडत होते. आज ट्रक टर्मिनस व व्यापारी संकुल उभे राहिल्यामुळे चांगली सुविधा निर्माण झाली आहे. विदर्भातील पहिले ट्रक टर्मिनस अमरावतीत आकारास आले आहे.
जिल्ह्यातील इतर शहरातही या प्रमाणे टर्मिनस व  अद्ययावत कचरा निर्मूलन प्रकल्प व्हावेत,अशी अपेक्षा खासदार श्रीमती राणा यांनी व्यक्त केली.
संकुलात 192 गाळे आहेत. वाहनतळासह चालकांसाठी उपाहारगृह, प्रसाधनगृह आदी सुविधा आहेत, असे आयुक्त श्री. निपाणे यांनी प्रास्ताविकात सांगितले. उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
          000. 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...