विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019
‘पपेट शो’च्या माध्यमातून मतदार जागृती
अमरावती, दि. 9 : ‘मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो !’ असे म्हणत दिलखुलास संवादाच्या माध्यमातून मतदारांना मतदानाचे महत्व पटवून देणारी ‘चिंगी’ ही बोलकी बाहुली जिल्ह्यातील महिला व नवमतदारांमध्ये लोकप्रिय होत आहे.
शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेत विषय सहायक म्हणून कार्यरत असलेल्या दीपाली बाभुळकर या मतदान जागृतीसाठी ठिकठिकाणी बोलक्या बाहुल्यांचे खेळ सादर करत असून, त्यांची ‘चिंगी’ ही बोलकी बाहुली नागरिकांचे मन जिंकून घेत आहे. गर्दीच्या ठिकाणी, शाळा- महाविद्यालये, वेगवेगळ्या वसाहती अशा विविध ठिकाणी श्रीमती बाभुळकर या बोलक्या बाहुल्यांचे खेळ सादर करत आहेत. त्याला नागरिकांच मोठा प्रतिसाद मिळत आहे.
श्रीमती बाभुळकर या काही वर्षांपासून ‘दुनिया बोलक्या बाहुल्यांची’ या कार्यक्रमातून, समाजजागृतीचे विधायक कार्य करत आहेत. विधानसभेची निवडणूक जाहीर होताच त्यांनी स्वीप मोहिमेअंतर्गत ठिकठिकाणी ‘पपेट शो’ सादर करायला सुरुवात केली.
नागरिकांना आकर्षित करण्यासाठी लोकप्रिय असलेल्या पात्रांच्या प्रतिकृतींचा समावेश असलेले एक स्टेज त्यांनी तयार केले आहे. हे स्टेज गर्दीच्या ठिकाणी उभारले जाते. त्याकडे आकर्षित होऊन नागरिक गोळा होतात व लगेच खेळाला सुरुवात होते. सुमारे अर्धा तास चालणा-या या खेळात श्रीमती बाभुळकर या कळसूत्री बाहुली, ग्लव्ह पपेटस् व बोलक्या बाहुलीसह संवाद सादर करतात. विविध प्रकारचे आवाज, सहज व मजेदार संवाद, रंगीबेरंगी पोशाखातील बाहुल्या यामुळे हे खेळ गर्दी खेचत आहेत. श्रीमती बाभुळकर यांची निर्मिती असलेली ‘चिंगी’ ही बोलकी बाहुली महिला व नवमतदारांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली आहे.
लोकशाही शासन, निवडणूक प्रक्रियेतील मतदानाचे महत्व, मतदारांचे अधिकार व कर्तव्य आदींबाबत लोकशिक्षणच या खेळांच्या माध्यमातून मिळत आहे. या कार्यक्रमाबद्दल जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल, नोडल अधिकारी तथा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी श्रीमती बाभुळकर यांचे कौतुक केले आहे.







No comments:
Post a Comment