स्वीप मोहिमे अंतर्गत अमरावती विद्यापीठात मतदान जनजागृती नवमतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करुन लोकशाही बळकट करा स्वीपच्या सदिच्छा दूत बबीता ताडे यांचे आवाहन

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019

     





अमरावती, दि. 16 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्ह्यात स्वीप (Systematic Voters Education and Electoral Participation) मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. भारत देश हा तरुणांचा देश असून तरुणांनी आपल्या मतदानाचा अधिकार वापरुन लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करावे, असे आवाहन स्वीप मोहिमेच्या सदिच्छा दूत बबीता ताडे यांनी विद्यापीठात आयोजित मतदान जनजागृती कार्यक्रमात केले.
स्वीप मोहिमे अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व विद्यापीठ प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आयोजित मतदान जनजागृती कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. विद्यापीठाचे कुलगुरु मुरलीधर चांदेकर, राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालक डॉ. राजेश बुरंगे, स्वीपचे अधिकारी समीर चौधरी, प्रमोद ताडे यांचेसह विद्यापीठाचे अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थींनी यावेळी उपस्थित होते.
स्वीप मोहिमेअंतर्गत मतदान जनजागृती करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था, शासकीय कार्यालय यांच्या सहभाग घेऊन गावोगावी जागर सुरु करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांना स्वीप मोहिमच्या नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याव्दारे जिल्हाभर मतदान जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. 
येत्या 21 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान दिवशी सर्वांनी मतदान करावे. असे आवाहन प्रशासनाकडून होत असतांनाच उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘कौन बनेगा करोडपती’च्या सदिच्छा दूत बबीता ताडे यांच्यातर्फे सुध्दा मतदान जनजागृती करण्यात येत आहे. जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही असलेल्या आपल्या देशातील नागरिकांना मिळालेला मतदानाचा अधिकाराचा वापर करुन लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी निर्भिडपणे मतदान करावे, असे आवाहन श्रीमती ताडे यांनी यावेळी केले.
चांदुर बाजार, मोर्शी नगर परिषद व भानखेड येथे मतदान जनजागृती
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूकीत जिल्ह्यातील सर्व मतदारांनी सहभाग घ्यावा, यासाठी मतदार जनजागृतीचे विविध उपक्रम व मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी जिल्ह्यातील चांदुरबाजार, मोर्शी व भानखेड येथे स्वीप मोहिमे अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आले.
राज्यात सर्वत्र 21 ऑक्टोंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार असून मतमोजणी 24 ऑक्टोंबरला होणार आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील उपलब्ध सुविधा, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर आदी सुविधांबाबत स्वीप उपक्रमातून माहिती देण्यात येत आहे. सदर गावांमध्ये नागरिकांना इव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक सुध्दा दाखविण्यात आले. यावेळी उपस्थितांनी ‘Go Vote’ चे फलक घेऊन महिला, दिव्यांग मतदारांनी व नागरिकांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजाविणार असल्याची शपथ घेतली. यावेळी सदर गावांतून मतदान जनजागृतीची प्रभात फेरी सुध्दा काढण्यात आली.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती