विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रँडमायझेशनची प्रक्रिया
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनचे सरमिसळीकरण पूर्ण  
*अद्ययावत प्रणालीत माहिती सुरक्षित
* संपूर्ण पारदर्शक ऑनलाईन प्रक्रिया
अमरावती, दि. 1 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅटच्या सरमिसळीकरणाची (रँडमायझेशन) प्रक्रिया जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात झालेल्या या प्रक्रियेला उमेदवार किंवा त्यांच्या वतीने प्रतिनिधीही उपस्थित होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, इटीपीबीएस व मतपत्रिका नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अजय लहाने, संगणीकीकरण प्रशिक्षण नोडल अधिकारी तथा जिल्हा सूचना अधिकारी अरुण रणवीर, अतिरिक्त सूचना अधिकारी मनीष फुलझेले यावेळी उपस्थित होते.
  जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील 2 हजार 628 मतदान केंद्रासाठी 3 हजार 156 बॅलेट युनिट, 3 हजार 174 कंट्रोल युनिट व 3 हजार 622 व्हीव्हीपॅट मशीनचे स्कॅनिंग व सरमिसळीकरण झाले. तसेच आठही विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राकरीता लागणाऱ्या मनुष्यबळाची सुध्दा सरमिसळीकरणाची प्रक्रिया आज झाली. जिल्हास्तरावरील सरमिसळीकरणाची संगणकीकृत प्रक्रिया ऑनलाईन व प्रतिनिधींच्या उपस्थितीत अमरावती विधानसभा मतदारसंघासाठी पूर्ण झाली आहे. सरमिसळीकरणानंतर प्रक्रिया झालेली माहिती आता  ‘लॉक’ व सुरक्षित झाली आहे. त्यात कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही. यानंतर दुसऱ्या स्तरावरील इव्हीएमचे सरमिसळीकरण त्या त्या विधानसभा मतदासंघात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पातळीवर होणार आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र सादर करण्याची अंतिम दि. 4 ऑक्टोबर आहे. नामनिर्देशनपत्राची छाननी दि. 5 ऑक्टोबरला होईल. उमेदवारी मागे घेण्याची तारीख दि. 7 ऑक्टोबर आहे व त्यानंतर चिन्ह वाटपाची प्रक्रिया होणार आहे. मतदानाचा दिनांक 21 ऑक्टोबर तर मतमोजणीचा दिनांक 24 ऑक्टोबर आहे. दि. 27 ऑक्टोबरला निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईल.
ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या तपासणीच्या व प्रत्यक्ष वापराच्या प्रत्येक टप्प्यात मॉकपोलव्दारे उमेदवारांना व मतदारांना प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. ही संपूर्ण पारदर्शक ऑनलाईन प्रक्रिया असून, अद्ययावत प्रणालीत माहिती सुरक्षित असेल, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी यावेळी सांगितले.
दि. 31 ऑगस्टच्या अंतिम मतदार यादीनुसार 24 लाख 45 हजार 766 मतदार असून त्यात पुरुष 12 लाख 58 हजार 99 व स्त्री मतदार 11 लाख 87 हजार 625 आहेत. इतर मतदार 42 आहेत. मतदान केंद्रे 2 हजार 628 असून त्यातील मुख्य 2 हजार 607 व 21 सहाय्यकारी मतदान केंद्रे आहेत.    

00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती