व्हीएमव्हीच्या शताब्दीनिमित्त 100 कोटींचा प्रस्ताव

 

















व्हीएमव्हीच्या शताब्दीनिमित्त 100 कोटींचा प्रस्ताव

*10 कोटी तातडीने उपलब्ध करून देणार

*अभियांत्रिकी महाविद्यालय आता स्वायत्त

*उच्च शिक्षण विभाग एक दिवस अमरावतीत

अमरावती, दि. 10 : विदर्भ शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय येत्या 2022-23 मध्ये शंभर वर्षे पुर्ण करीत आहे. शताब्दी वर्षाचे औचित्य साधून महाविद्यालयाने विकासकामांसाठी शंभर कोटी रूपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. राज्य शासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या 10 कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. श्री. सामंत यांनी आज येथील विदर्भ शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेस भेट दिली.

          श्री. सामंत यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच परिसरात वृक्षारोपण केले.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा

अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा देण्यात आलेला आहे. आज या महाविद्यालयाला स्वायत्तता प्रदान करण्यात आली. स्वायतत्ता मिळाल्यामुळे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय स्थानिकस्तरावर निर्णय घेऊन विकासकामे करतील. त्यांना आता मंत्रालयाच्या परवानगीची गरज राहणार नाही. महाविद्यालयाने उपकेंद्राच्या माध्यमातून आपल्या कक्षा वाढवाव्यात. उपकेंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. सामंत यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देऊ       न आढावा घेतला. यावेळी तंत्रशिक्षण सहसंचालक तथा तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. आर. पी. मोगरे, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. बोरकर, शासकीय विदर्भ ज्ञान विद्यान संस्थेचे संचालक डॉ. वसंत हेलावीरेड्डी, औषधनिर्माणचे प्राचार्य डॉ. एस. एस. खडबडी, अधिष्ठाता डॉ. एस. डी. लोंढे आदी उपस्थित होते.

राज्य शासनाने तंत्र विद्यापिठ स्थापन केले आहे. इतर विद्यापिठांशी संलग्न होण्यापेक्षा तंत्र विद्यापिठाशी संलग्नता तसेच इतर बाबींसाठी पाठपुरावा करावा. विभागाने अनुकंपा तत्वावरील भरतीसाठी पाठपुरवा सुरू केला आहे. या नियुक्त्या तातडीने करून यातील प्रतिक्षायादी शुन्यावर आणावी, तसेच तंत्र शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा, यासाठी विद्यार्थी संपर्क अभियान उपयुक्त ठरले. यामुळे तांत्रिक शिक्षणाच्या जागा भरण्यात येत आहे. गेल्या वर्षात 690 कोटी रूपयांची शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली आहे. येत्या काळातही शिष्यवृत्तीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

उच्च शिक्षण विभाग एक दिवस अमरावतीत येणार

येत्या महिन्यात उच्च शिक्षण विभागातर्फे अमरावतीमध्ये ‘उच्च शिक्षण ॲट अमरावती’ हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यात शिक्षक,  पालक, विद्यार्थी तसेच प्रशासन यात सहभागी होतील. अभिनव स्वरूपाचा हा कार्यक्रमात सर्व घटक सहभागी होऊ शकतील. हा कार्यक्रम सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होणार आहे. यात मंत्रालयातील उच्च शिक्षण विभागातील अधिकारी आणि स्थानिक यांच्यात समन्वय साधण्यात येणार आहे. प्रत्येकाची समस्या ऐकून घेऊन त्याचे तिथेच निराकरण करण्यात येणार आहे. कोरोनाचे नियम पाळून 50-50 जणांना मर्यादीत प्रवेश देऊन विविध सत्रात हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. उच्च तंत्र शिक्षण विभागातील शिक्षक भरती प्रक्रिया हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत विभागाने निर्णय घेऊन सामान्य प्रशासन विभाग, नियोजन विभाग, अर्थ विभाग यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. अर्थ विभागाची मान्यता मिळाल्यानंतरच पदभरती सुरू होईल.

रोजगारक्षम शिक्षणासाठी संस्थेनी प्रयत्न करावेत

शिवाजी शिक्षण संस्था आणि श्री शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयाच्या वतीने रोजगार आणि विकासाच्या संधी याबाबत ऑनलाईन चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यावेळी श्री. सावंत यांनी शिवाजी शिक्षण संस्था विकास कार्यक्रमात सहभागी होते. आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल. येत्या काळात नवी शैक्षणिक पद्धती लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी या शैक्षणिक पद्धतीचाही विचार करावा. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी सुरू केलेले संस्था नावलौकिकास आली आहे. शैक्षणिक क्षेत्रासह साहित्य क्षेत्रातही संस्था कार्यरत आहे.

शिक्षण क्षेत्राचा विकास होण्यासाठी प्राध्यापक भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थ विभागाची मान्यता मिळाल्यानंतर ही भरती प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होईल. तसेच प्राचार्यांची पदेही भरण्यासंदर्भात निर्णय होणार आहे. प्राध्यापकांच्या वेतन श्रेणी, वय, तसेच प्राचार्यांच्या कालावधीचाही निर्णय योग्य विचार करूनच होईल, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, सचिव शेषराव खाडे, उपाध्यक्ष गजानन पुंडकर, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, अशोक ठुसे, विजय ठाकरे आदी उपस्थित होते. चर्चासत्रापुर्वी पंचवटी चौकीतील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यालाही श्री. सामंत यांनी पुष्पार्पण करून अभिवादन केले.

श्री. सामंत यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाला सदिच्छा भेट दिली. विद्यापिठ परिसरात वृक्षारोपण करून त्यांनी कोरोना चाचणी प्रयोगशाळेस भेट दिली. विद्यापिठाचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी संपर्क अधिकारी नेमावा. या अधिकाऱ्याकडून मंत्रालय स्तरावर प्रलंबित असलेले प्रश्न सोडवून घ्यावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी कुलगुरू डॉ. व्हीञ एम. भाले उपस्थित होते. विद्यापिठातील संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती