अतिवृष्टी नुकसानाच्या पंचनामा प्रक्रियेला वेग पालकमंत्र्यांच्या निर्देशाने कार्यवाहीला गती



अतिवृष्टी नुकसानाच्या पंचनामा प्रक्रियेला वेग

पालकमंत्र्यांच्या निर्देशाने कार्यवाहीला गती


अमरावती, दि. 20 : जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त परिसरातील घऱांचे पंचनामे करण्यात आले आहेत. शेतीचे पंचनामेही तत्काळ पूर्ण करून भरपाईसाठी आवश्यक प्रस्ताव जिल्हापातळीवर पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. त्यानुसार काही ठिकाणी घरांचे पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित ठिकाणी कार्यवाही होत आहे. शेतीनुकसानीच्या पंचनाम्यांनाही सुरुवात झाली आहे. 

भातकुली तालुक्यात साऊर, रामा येथील घराच्या पडझडीबाबत पंचनामे पूर्ण करण्यात आले. याठिकाणी साधारणत: पावणेदोनशे घरांत पाणी शिरून नुकसान झाले. पंचनाम्यानुसार ग्रामपंचायत स्तरावर यादी तयार करण्यात आली आहे. साऊर, रामाबरोबरच पूर्णानगर, खोलापूर, आसरा व आष्टी सर्कलमधील काही गावात अतिवृष्टी झाली. शेतीचे पंचनामेही सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार नीता लबडे यांनी दिली. अमरावती तालुक्यातही ब्राम्हणवाडा भगत, देवरा पुनर्वसन, शिराळा यासह वलगावचा काही भाग, नवे अकोला आदी ठिकाणी पंचनाम्यांद्वारे नुकसानीच्या नोंदी घेण्यात येत आहेत. घरांच्या पंचनाम्याची प्रक्रियाही होत आहे, अशी माहिती तहसीलदार संतोष काकडे यांनी दिली.

                        ग्रामस्तरीय अधिका-यांकडून संयुक्त पंचनामे

शेतीचे पंचनामे ग्रामस्तरीय अधिका-यांकडून संयुक्तपणे होत आहेत. ग्रामस्तरावर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्याकडून पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे. शेतीतील नुकसानीची तपशीलवार नोंद घेण्याबाबत कृषी सहायकांना सूचना देण्यात आल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी सांगितले.  

            शेतकरी बांधवांशी संवाद साधून प्रत्येक नुकसानीची अचूक दखल घ्यावी. एकही पात्र व्यक्ती भरपाईपासून वंचित राहू नये. यासाठी पंचनाम्यातील नोंदी अचूक असाव्यात. पंचनाम्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर दिले आहेत.  

000  

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती