शबरी आदिवासी घरकुल योजनेत 661 घरांचा लक्ष्यांक


 

शबरी आदिवासी घरकुल योजनेत 661 घरांचा लक्ष्यांक

                उद्दिष्टपूर्तीसाठी कामे गतीने पूर्ण करा

-          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 20 : आदिवासी विकास विभागातर्फे शबरी आदिवासी घरकुल योजनेंतर्गत जिल्ह्यात 661 घरांचा लक्ष्यांक निश्चित करण्यात आला आहे. हे उद्दिष्ट  पूर्ण होण्यासाठी गतीने कामे करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.

आदिवासी उपयोजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वत:ची घरे नाहीत अथवा जे नागरिक कुडामातीच्या घरात, झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवा-यात राहतात अशा अनुसूचित जमातीतील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येते. या योजनेत अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांचा समावेश होऊन त्यांना घरकुल मिळावे यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर सातत्याने प्रयत्नशील आहेत.  त्यानुसार 2021-22 या वर्षासाठी  661 घरांचा लक्ष्यांक प्राप्त झाला आहे. त्यानुसार परिपूर्ण नियोजन करून कामांना गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

 विविध आवास योजनांची सांगड घालून महाआवास अभियानातून महाराष्ट्रात तब्बल 3 लाख 22 हजार लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ मिळाला आहे.  गरजू नागरिकांना विविध आवास योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष शिबिरेही घेण्यात आली आहेत. प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देणे हे शासनाचे प्राधान्य आहे. त्यासाठी वेळोवेळी आढावा घेऊन कामे पूर्णत्वास न्यावीत. या कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

शबरी आवास योजनेच्या लक्ष्यांकाबाबत आदिवासी विकास विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.20 लक्ष मर्यादेत आहे. अशा लाभार्थ्यांना योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे. दिव्यांग लाभार्थ्यांना 5 टक्के आरक्षण व दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. घरकुलांचे बांधकाम दर्जेदार व चालू आर्थिक वर्षात पूर्ण होण्यासाठी गतीने काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

                        000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती