'माविम'मुळे महिलांची अर्थसाक्षरता व सक्षमतेकडे वाटचाल - पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर















 पालकमंत्र्यांच्या हस्ते महिला बचत गटांना ई कार्ट रिक्षा, कृषी अवजारे व कर्ज वितरण

115 गटांना सुमारे 3 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत

'माविम'मुळे महिलांची अर्थसाक्षरता व सक्षमतेकडे वाटचाल

- पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

          अमरावती,दि.23: महिलांच्या सर्वांगीण विकासामध्ये माविमची अत्यंत मोलाची भूमिका आहे. बचत गटाच्या माध्यमातून अर्थार्जन करणाऱ्या असंख्य महिलांना माविम अर्थसाक्षरता व आर्थिक सक्षमता प्रदान करीत आहे. नवतेजस्वीनी योजनेअंतर्गत नावीन्यपूर्ण व अत्याधूनिक व्यवसायांचे प्रशिक्षण माविमच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. आज जिल्हयातील 115 गटांना सुमारे 3 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले गेले, यावरुन महिलांमध्ये असलेली उद्योगप्रियता लक्षात येते. सर्व स्तरातील महिलांचा त्यांच्या बचत गटात सक्रीय  सहभाग असावा. अल्पसंख्यांक महिलांनीदेखील त्यांचा बचतगट तयार करून विकास साधावा. असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर आज यांनी केले.

          महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने श्री. शिवाजी कृषी महाविद्यालयातील कृषक भवन येथे माविमच्या रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत आयोजित विविध उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते महिला स्वयंसहायता बचत गटांना भाजीपाला विक्री ई-कार्ट रिक्षा आणि महिला बचत गटांना कर्ज वितरीत करण्यात आले तसेच माविमने कोरोनाकाळात  महिलांना स्वयंरोजगार प्रदान केला त्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

          कार्यक्रमाला माविमच्या मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, आयसीआयसीआय बँकेचे विभागीय व्यवस्थापक सुहास बोबडे, मानव विकास मिशनचे औरंगाबादचे माजी उपायुक्त रुपचंद राठोड, माविमचे निवृत्त जिल्हा समन्वय अधिकारी खुशाल राठोड, माविमच्या जिल्हा सनियंत्रण अधिकारी मिनाक्षी शेंडे आदी उपस्थित होते.

          श्रीमती ठाकूर म्हणाल्या, महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी  होणे ही काळाची गरज आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येतात त्यात बचत गटांनी सहभागी व्हावे.  माविममुळे महिलांना आपल्या आवडीच्या व  निपूण असलेल्या क्षेत्रात व्यवसाय करण्याची संधी निर्माण होते. माविमच्या मदतीने महिलांनी सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

  

          श्रद्धा जोशी यांनी, महिलांनी पारंपारीक उद्योगाव्यतिरिक्त अत्याधूनिक व्यवसायांची कास धरावी असे सांगितले. माविमच्या माध्यमातुन महिलांना उद्योगासाठी उपलब्ध करुन देण्यात येणारे प्रशिक्षण तसेच अधिक उपयुक्त इतर बाबींचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

               कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना सुनिल सोसे यांनी, माविमच्या मदतीने महिलांना रोजगाराची संधी निर्माण होत असून बचत गटाच्या माध्यमातून सर्व महिलांना विकासाची संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटांना धनादेशचे वाटप

          बचत गटाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या विविध उद्योगांसाठी आज पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्ज वितरीत करण्यात आले. जिल्हयातील 115 गटांना 2 कोटी 91 लक्ष रुपये प्रदान करण्यात आले. तर वैयक्तिकरित्या तीन बचत गटांना म्हणजेच लोणी येथील आम्रपाली स्वयंसहायता बचत गटाला  7 लक्ष पन्नास हजार रुपयांचा, अचलपूर येथील आशिर्वाद तर दर्यापूर येथील दुर्गा स्वयंसहायता बचत गटाला प्रत्येकी  7 लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वाटप श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. हाथिपूरा येथील अल्पसंख्यांक महिलांचा मोहम्मद झियान यांच्या गटाला व करीमपुरा येथील सरोज बचत गटाला प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

पालकमंत्र्यांनी केला आशासेविकांचा सन्मान

          कोरोनाकाळात उत्कृष्ठ सेवा देणाऱ्या आशा सेविकांना श्रीमती ठाकूर यांनी मास्क वाटप करुन सन्मानित केले. सुनिता खराटे, वैशाली गेडाम, रेखा पवार व पूजा ढोके यांना सन्मानित केले.

          कार्यक्रमाचे संचालन अचलपूरच्या सोनाली पुंडकर यांनी केले. आभार माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी ऋषिकेश घयार यांनी केले.

0000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती