पूर संरक्षणासाठी भरीव उपाययोजना आवश्यक - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 










पालकमंत्र्यांकडून अमरावती तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी
पूर संरक्षणासाठी भरीव उपाययोजना आवश्यक

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. २३ : अतिवृष्टीग्रस्त भागात नुकसानग्रस्तांना तत्काळ भरपाई मिळवून देण्याबरोबरच पूर संरक्षणासाठी भरीव उपाययोजना करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

जिल्ह्यात गत आठवड्यात काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. त्याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्र्यांकडून दौरे होत आहेत. पालकमंत्र्यांनी आज अमरावती तालुक्यातील देवरी, देवरा (शहिद), ब्राम्हणवाडा भगत, शिराळा आदी अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला.  यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी प्रत्येक गावात झालेल्या हानीचा प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला व ग्रामस्थांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या.

उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, तहसीलदार संतोष काकडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय रहाटे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती रोडगे आदी उपस्थित होते.घरांच्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या प्रक्रियेनुसार शिराळा येथे २१३ घरांचे नुकसान झाले. तेथील काही नोंदी घेण्याचे राहिल्याचे नागरिकांचे म्हणणे लक्षात घेऊन, तातडीने त्या नोंदी घ्याव्यात. पंचनामे करताना सविस्तर व प्रत्येक नुकसानीची नोंद घ्यावी. एकही नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

फाजलापूर व देवरा येथील शेतात नाल्याचे पाणी घुसून नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक कार्यवाही व्हावी.अतिवृष्टीमुळे होणारी हानी लक्षात घेता बांध, नदी खोलीकरण आदी पूर संरक्षणासाठी भरीव उपायोजना करण्यात याव्यात,  असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

 

अतिवृष्टी उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा

अतिवृष्टी उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक उद्या (२४ जुलै) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती