युवकांनी कौशल्य मिळवून रुग्णसेवेसाठी योगदान द्यावे -जिल्हाधिकारी शैलेश नवाल






मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

युवकांनी कौशल्य मिळवून रुग्णसेवेसाठी योगदान द्यावे

-जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती, दि. 8 : कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रात कौशल्याधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा तरुणांनी लाभ घेऊन रुग्णसेवेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत निवड झालेल्या 20 युवक-युवती उमेदवारांची जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे भेट घेऊन मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांच्यासह अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

श्री. नवाल म्हणाले की, कोरोना महामारीच्या संकटकाळात वैद्यकीय क्षेत्रात कुशल मनुष्यबळ व तांत्रिक कौशल्यप्राप्त व्यक्तींची आवश्यकता वेळोवेळी भासली व यापुढेही तशी टीम उपलब्ध असणे आवश्यक आहे. सुशिक्षित तरुण-तरुणींनी पारंपारिक अभ्यासक्रमासह कौशल्याधारित ज्ञान आत्मसात करुन तश्या पध्दतीने तंत्रकुशल होणे फार गरजेचे आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी असून त्यादृष्टीने तरुणांनी प्रयत्न करावे. वैद्यकीय क्षेत्रात उभारण्यात येत असलेल्या ऑक्सिजन प्लॉटची देखभाल व दुरुस्ती, उपचार यंत्रणा आदींबाबत शास्त्रीय माहितीसह ज्ञान प्राप्त करावे, असे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय क्षेत्रात काम करताना रुग्णालयात आपत्कालीन किंवा आणीबाणीची परिस्थिती उद्भल्यास प्रसंगावधान राखून परिस्थिती कशी हाताळावी यासंबंधीचे प्रशिक्षण व कौशल्य आत्मसात करावे. रुग्णाचा आजार हा औषधाने पन्नास टक्के बरा होतो तर त्यांचे मानसिक समुपदेशन केल्याने पन्नास टक्के आराम पडतो. म्हणून संयमाने रुग्ण व त्याच्या कुटूंबियांचे समुपदेशन करता आले पाहिजे. कोविडमुळे वैद्यकीय क्षेत्रात अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ऑक्सिजन प्लाँट हॅन्डलींग, फायर मॅनेजमेंट , बायोमेडिकल इंजीनिअरींग, टेक्निशियन आदी क्षेत्राशी निगडीत प्रशिक्षण आत्मसात करुन रोजगार  प्राप्त करावा, असे आवाहन श्री नवाल यांनी प्रशिक्षणार्थींना केले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मार्गदर्शन किटचे वितरण करण्यात आले.

0000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती