Tuesday, July 16, 2024

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्या;जिल्हाधिकारी यांचे आवाहन

 


मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्या;जिल्हाधिकारी यांचे आवाहन

शैक्षणिक पात्रतेनुसार 6 हजार, 8 हजार आणि 10 हजार प्रतिमाह विद्यावेतन

 

          अमरावती, दि. 16 (जिमाका): राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन नोकरी मिळण्याची त्यांची क्षमता वाढविण्यासाठी 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय/निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. यासाठी 12 वी पास प्रशिक्षणार्थींना 6 हजार, आयटीआय/पदविका 8 हजार आणि पदवीधर/पदव्युत्तर प्रशिक्षणार्थ्यांना 10 हजार प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे. या योजनेचा युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योजकाकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10 टक्के  व सेवा क्षेत्रासाठी 20 टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणसाठी घेता येतील. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापना, उद्योग, महामंडळ या मध्ये मंजूर पदाच्या 5 टक्के इतके उमेदवार कार्यप्रशिक्षणासाठी घेता येतील. आस्थापना किंवा उद्योग यांनी त्यांच्याकडील कार्यरत मनुष्यबळाची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर अचूक दर्शविणे आवश्यक राहील. या योजनेकरिता उमेदवारांची नोंदणी, आस्थापनांची नोंदणी, कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, उपस्थिती नोंदविणे, विद्यावेतन अदा करणे, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इ. बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. तसेच बारावी, आय. टी. आय.. पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवांनी ऑनलाईन नोंदणी वेबपोर्टलवर करावी.

 

            लघु आणि मध्यम व मोठे उद्योग, स्टार्टअप्स, सहकारी संस्था, शासकीय, निमशासकीय आस्थापना, महामंडळ, सामाजिक संस्था आणि विविध आस्थापना इ. यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवावे. किमान २० रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्यप्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील. या कार्यप्रशिक्षण (Internship) योजनेतर्गत प्रशिक्षणार्थीना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाईल. प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थीची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना किंवा उद्योग यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात(DBT) ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल.

              या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलला भेट देवून सदर योजनेमध्ये सहभागी व्हावे. तसेच आपल्या कडील मंजूर मनुष्यबळाच्या संख्येच्या तुलनेत जिल्ह्यातील उमेदवारांना कार्य प्रशिक्षणाची (Internship) संधी देवून त्यांना रोजगारक्षम होण्यास सहकार्य करावे. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्र, शासकिय तांत्रिक विदयालय परिसर, उस्मानिया मस्जिद जवळ, बस स्टॅण्ड रोड, अमरावती येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा. या योजनेचा जास्तीत-जास्त लाभ उमेदवारांनी, उदयोजकांनी, विविध आस्थापनांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

                                  00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...