जीवनात यशस्वितेसाठी खिलाडू वृत्ती आवश्यक - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

राज्यस्तरीय शालेय खो- खो क्रीडा स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ
                







·       राष्ट्रीय स्पर्धेचा बहुमानही अमरावतीलाच  
अमरावती, दि. 28 – जीवनात यशस्वितेसाठी खिलाडू वृत्ती, साहस, चिकाटी व उमदेपण या गुणांची गरज असते. खेळांतून हे गुण विकसित होतात. त्यामुळे सर्वांनीच खेळासाठी वेळ दिला पाहिजे, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे सांगितले.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात क्रीडा विभागातर्फे चौदा वर्षांखालील मुला-मुलींसाठी राज्यस्तरीय शालेय खो- खो क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ आज श्री. नवाल यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.  विभागीय क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख अध्यक्षस्थानी होत्या. मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव डॉ. माधुरी चेंडके, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. देवनाथ, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू डॉ. नितीन चव्हाळे उपस्थित होते.
या स्पर्धेत राज्यातील आठ विभागांतून 16 संघाचे 192 विद्यार्थी व विद्यार्थिनी खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यातून निवड झालेल्या संघांना राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग मिळणार असून, राष्ट्रीय स्पर्धेचा बहुमानही अमरावतीलाच मिळाला आहे. ही स्पर्धा जानेवारीत होईल.
खेळाडूंना खेळताना प्रतिस्पर्ध्यांचा खेळ पाहून तातडीने निर्णय घेणे व वेगवान हालचाली कराव्या लागतात. त्यामुळे खेळणा-या मुलांमध्ये शारीरिक बळाबरोबर निर्णयक्षमता, बुद्धिमत्ता विकासही होतो, असे श्रीमती देशमुख यांनी यावेळी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथसंचलन व मल्लखांब प्रात्यक्षिकाच्या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.
श्री. जाधव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विजय पांडे यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी आभार मानले. निवड समितीचे सदस्य प्रशांत पवार, गुरुदत्त चव्हाण, योगेश शिर्के, प्रा. विलास दलाल, संजय कथलकर, भास्कर घटाळे, अनिल बोरवार, संतोष विघ्ने, उमेश बडवे, संदेश गिरी, नितीन चवाळे, महेश अलोणे आदी उपस्थित होते.
                            000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती