Wednesday, November 27, 2019

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दर्जेदार पांदण रस्त्यांची निर्मिती करा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल


जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याव्दारे पांदन रस्त्यांची पाहणी






अमरावती, दि. 27 : शेतकऱ्यांना शेतमाल, निविष्ठा, बीबियाणे शेतात ने-आण करणे सोईचे व्हावे, यासाठी मोठ्या संख्येने गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पांदण रस्त्यांची निर्मिती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संबंधित विभागाला दिले. शेतकऱ्यांना पांदण रस्त्याबाबत काही अडचण असल्यास त्यांनी सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाशी संपर्क साधावा. त्यांच्या अडचणींचे व प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मोर्शी तालुक्यातील विविध गावांच्या पांदण रस्त्यांची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी आज केली, त्यावेळी ते बोलत होते. मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार डोंगरे, तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. दळवी यांच्यासह संबंधित गावांचे सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आदी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी नेरपिंगळाई येथील पिंगळादेवी देवस्थान व गडाची पाहणी केली. पिंगळादेवी येथील विकासकामांचा आढावा घेतला. मंदिराच्या विश्वस्थांशी चर्चा करुन पुढील विकासकामांच्या नियोजनाबाबत माहिती घेतली. या देवस्थानचा दर्जा ‘क’ वरुन ‘ब’ होण्यासाठीचा प्रस्ताव मंजूरीसाठी प्रयत्न करण्यात येईल. मंदिराच्या खुल्या परिसरात वृक्ष लागवड करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मंदिर परिसरात भक्तनिवास उभारण्यासाठी प्रशासनातर्फे मदत करण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी येरला ग्राम पंचायतीला भेट देऊन तेथील पालकमंत्री पांदन रस्ते योजनेतून निर्माण करण्यात आलेल्या मौजा येरला ते खानापूर रस्त्यांची पाहणी केली. या पांदण रस्त्या संदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मौजे येरला ते लाडकी या पांदण रस्त्याचे काम सुरु करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंतांना केल्या.
पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मौजे वरुड ते भंगारा, चिंचोली गवळी ते रसुलपूर कोपरा या पांदण रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तालुक्यातील सर्व पांदण रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्याच्या सूचना त्यांनी सार्व. बांधकाम विभागाच्या अभियंतांना दिल्या.
यानंतर त्यांनी मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार डोंगरे, तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. दळवी यांच्याकडून पांदण रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. पुढील कामांच्या नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पाहणी दौऱ्यात संबंधित गावांचे सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व शेतकरी बांधव, गावकरी मंडळी उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...