दक्षता व आवश्यक उपचारांबाबत वैद्यकीय अधिका-यांनी सजग राहावे - प्र. जिल्हाधिकारी संजय पवार

कीटकनाशक दुष्परिणामांवर योग्य उपचारासाठी वैद्यकीय अधिका-यांची कार्यशाळा






अमरावती, दि. 7 : आपल्या परिसरातील शेतकरी बांधवांकडून होणा-या कीटकनाशकांचा वापर, तसेच त्याचे दुष्परिणाम व आवश्यक उपचार याबाबत वैद्यकीय अधिका-यांनी सजग राहावे जेणेकरून कीटकनाशकांपासून विषबाधेच्या दुर्घटना टळू शकतील, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी संजय पवार यांनी आज येथे दिले.
सार्वजनिक आरोग्य विभाग व क्रॉपलाईफ इंडियातर्फे कीटकनाशकांपासून दुष्परिणाम टाळण्यासाठी दक्षता, उपचार व्यवस्थापन याबाबत जिल्ह्यातील वैद्यकीय अधिका-यांची कार्यशाळा नियोजनभवनात आज झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, कार्यशाळेचे मार्गदर्शक तथा केंद्र शासनाचे माजी आरोग्य अतिरिक्त महासंचालक डॉ. देवव्रत कानुंगो, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रानमळे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, क्रॉप इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तित्व सेन, सुशील देसाई, शिवार फौंडेशनचे विनायक हेगाणा आदी उपस्थित होते.  
प्र. जिल्हाधिकारी श्री. पवार म्हणाले की, शेतीत उत्पादनवाढीसाठी रसायनांचा वापर केला जातो. या रसायनांबाबत व त्यांच्या दुष्परिणाम व उपचारांबाबत वैद्यकीय अधिका-यांना परिपूर्ण माहिती असली पाहिजे. त्यासाठी कार्यशाळेतील सूचना व उपलब्ध साहित्यातील मार्गदर्शन यांचा निश्चित उपयोग होईल.
श्री. ठमके म्हणाले की, अनेकदा शेतकरी बांधवांकडून फवारणीसाठी दोन किंवा त्याहून अधिक रसायने एकत्र केली जातात. त्यातून एक तिसरे रसायन तयार होते. त्याची फवारणी केली जाते. असे रसायन मूळ रसायनांहून अधिक घातक असू शकते. अशा घटनांबाबत आवश्यक दक्षता, उपचारांची माहिती वैद्यकीय अधिका-यांनी ठेवावी. कार्यशाळेतून आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा लाभ शेतकरी बांधवांनाही होणार आहे.
श्री. चवाळे म्हणाले की, जिल्ह्यात दशकापूर्वी कीटकनाशक विक्रीचे प्रमाण कमी होते. नंतर 2012 पासून कीटकनाशकांची विक्री साडेचार लाख लीटरवर गेली. आता ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेकदा कृषी विभागाची शिफारस असो किंवा नसो; शेतकरी बांधवांकडून अनेक उत्पादने एकत्र करुन रसायन तयार होते. अशावेळी दुष्परिणाम घडल्यास कुठला अँटी- डोस द्यायचा याविषयी अद्यायवत माहिती असावी. कृषी व आरोग्य विभागाकडून जनजागृतीसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात, असेही ते म्हणाले.  
कीटकनाशकांमुळे जगात दरवर्षी 2 लाख बळी : डॉ. देवव्रत कानुंगो
कीटकनाशके किंवा तत्सम विविध रसायनांच्या वापरामुळे जगात दरवर्षी 2 लाख मृत्यू होत असल्याची नोंद आहे, असे डॉ. देवव्रत कानुंगो यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, कीडनाशकांची सहज उपलब्धता, दोन रसायनांचे मिश्रण फवारण्याच्या घटना, फवारणीचा लांब कालावधी, संरक्षणसिद्धतेशिवाय फवारणी, सदोष फवारणी यंत्रांचा वापर व योग्य उपचार न मिळणे अशी अनेक कारणे विषबाधेने बळी जाण्यामागे असतात. कीटकनाशक तात्कालिक तसेच दीर्घकालीन दुष्परिणामही होत असतात. त्यामुळे सर्वांनीच पुरेशी काळजी घेतली गेली पाहिजे.
          विषबाधांच्या प्रकरणांत डॉक्टरांनी करावयाचे उपचार, औषधांची उपलब्धता, अद्ययावत उपचार प्रणाली याबाबत डॉ. कानुंगो यांनी वैद्यकीय अधिका-यांचे प्रशिक्षण घेतले. कार्यशाळेला सुमारे जिल्ह्यातील शंभरहून अधिक वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. श्री. सेन यांनी प्रास्ताविक, तर श्री. हेगाणा यांनी आभार मानले.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती