Sunday, November 3, 2019

शेतपिकांच्या नुकसान भरपाईपोटी सरसकट मदत मिळवून देणार -कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे
















* गुरुवारपर्यंत पंचनामे पूर्ण करा
* नुकसान भरपाई संदर्भात गावागावात जनजागृती करावी
अमरावती, दि. 3 : अवकाळी पावसामुळे राज्यात सगळीकडेच शेतीचे व शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. पश्चिम विदर्भात सुध्दा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक वाया गेले आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण 1 हजार 989 गावांपैकी 1 हजार 606 बाधित गावांची संख्या आहे. शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपदातून सावरण्यासाठी शेतपिकांच्या नुकसान भरपाईपोटी सरसकट मदत मिळवून देणार असल्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज सांगितले. याअनुषंगाने येत्या गुरुवारपर्यंत जिल्ह्यातील बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करुन पंचनामे पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
            श्री. बोंडे यांनी आज अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांच्यासह जिल्ह्यातील मोर्शी, चांदूर बाजार, दर्यापूर व भातकुली तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपिकांची प्रत्यक्ष जावून पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत नुकसानी संदर्भात कृषी मंत्र्यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांचेसह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. बोंडे यांनी मोर्शी तालुक्यातील काटसूर, चांदुरबाजार तालुक्यातील मौजा टाकरखेडा परिसरातील शेती, अचलपूर तालुक्यातील मौजा आसेगाव पूर्णा, दर्यापूर तालुक्यातील मौजा येसुर्णा, चंडीकापूर, खल्लार परिसरातील शेती, भातकुली आदी तालुक्यातील बाधित शेतीला प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानग्रस्त शेतीपिकांची पाहणी केली.
अवकाळी पावसामुळे सोयाबीन, कपाशी, ज्वारी तसेच मुंग व उडीद या खरीप पिकांचे आणि केळी, संत्रा या फळपिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. सोयाबीन पूर्णत: खराब झाले असून त्याला कोंब आलेले दिसले तर कपाशीची बोंड खराब झाल्याचे दिसून आले आहेत. पाहणी दरम्यान सर्वत्र मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून आले. येत्या गुरुवारपर्यंत नुकसानग्रस्त भागांचे तातडीने सर्वेक्षण करुन पंचनामे तयार करण्याचे आदेश कृषीमंत्र्यांनी यावेळी संबंधित यंत्रणांना दिले.
            आढावा घेतांना डॉ. बोंडे म्हणाले की, जिल्ह्यात जवळपास साठ टक्के शेतकऱ्यांनी पिकविमा काढल्याचे दिसून येते. पिकविमा काढलेल्या तसेच न काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची रक्कम किंवा नुकसान भरपाई  मिळवून देण्यासाठी शासनाने समन्वयाची भूमिका घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. कृषी विभागाने सक्रियपणे काम करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून क्लेम फॉर्म भरुन घ्यावे. भरपाईसाठी विम्याची रक्कम भरल्याचा कुठलाही पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. कृषी विभागाने विम्याची रक्कम मिळण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करुन शेतकऱ्यांना सहाय्य करावे. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी शासन सर्वकष मदत करणार.
            ज्या तालुक्यात ऑक्टोबर अखेर सरासरी 120 मि.मिच्यावर पाऊस पडला असेल अशा ठिकाणी किंवा क्षेत्रातील शेतकरी कापणीनंतरच्या (पोस्ट हारवेस्ट) विमा क्लेमसाठी पात्र ठरू शकतात तर 120 मिमिच्या आत सरासरी पाऊस पडला असेल तर अश्यांच्या बाबत स्थानिकीकरण क्षेत्र (लोकलाईज्ड एरिया) विमा क्लेमसाठी पात्र ठरु शकतात, असेही डॉ. बोंडे यांनी यावेळी सांगितले.
            कोणत्याही शेतकऱ्यांनी हतबल होऊ नये, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. पाहणी दरम्यान येसुर्णा येथील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी धीर दिला. सदर शेतकऱ्याकडे पावणे तीन एकर जमीन असून सोयाबीन पेरले होते. त्याच्या संपूर्ण शेतीतील सोयाबीन पीक वाया गेले असून त्यानी विमा काढला असल्यामुळे नुमसान भरपाईपोटी त्याला शेतीक्षेत्रफळानुसार नुकसान भरपाई मिळवून दिली जाणार असल्याचे डॉ. बोंडे यांनी सांगितले
            कृषी विभागाने व महसूल विभागाने सक्रीयपणे काम करुन तातडीने पंचनामे करुन बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी कृषी विभागाच्या अधिनस्त काम करणारे कृषी सहायक, कृषी मित्र तसेच सर्व ग्राम पंचायत सदस्यांनी गावागावात मार्गदर्शन व जनजागृती करावी. कृषी विभागानी शेतकऱ्यांचे पीकविमा व नुकसान भरपाईचे अर्ज संबधित विमा कंपनीला पाठवावे. गावागावात दवंडी देऊन तसेच व्हॉटस्ॲप मॅसेज तसेच प्रसारमाध्यमांतून आवाहन करुन नुकसान भरपाई संदर्भातील संपूर्ण प्रक्रिये संदर्भात जनजागृती करावी. पीक विम्याची मदत मिळण्यासाठी शासकीय यंत्रणेने समन्वयाने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...