वलगाव येथील केंद्र पुरेशा सुविधांसह तत्काळ सुरू करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

 






कोरोना प्रतिबंधक उपाययोजना

वलगाव येथील केंद्र पुरेशा सुविधांसह तत्काळ सुरू करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

प्रतिबंधासाठी ‘कोविड ॲप्रोप्रिएट बिहेविअर’ पालनाबाबत आवाहन

आवश्यकतेनुसार खाटा, उपचार यंत्रणा सुसज्ज ठेवावी

-          जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 

अमरावती, दि. 11 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता सुसज्ज उपचार यंत्रणेसाठी आवश्यक खाटा, विलगीकरण क्षेत्रासाठी इमारती, औषधे आदी तजवीज तत्काळ करावी. वलगाव येथील विलगीकरण केंद्र सर्व सुविधांसह तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.

आवश्यकतेनुसार विलगीकरणासाठी शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था व इतर ठिकाणांची तजवीज करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेबाबत आरोग्य यंत्रणेची बैठक जिल्हाधिकारी श्री.  नवाल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, महापालिकेचे डॉ. विशाल काळे यासह कोरोनावर उपचार उपलब्ध असलेल्या विविध रूग्णालयांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

श्री. नवाल म्हणाले की, जिल्ह्यात रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेटमध्ये वाढ दिसून येत आहे. बाधितांचे मोठ्या प्रमाणावरील आकडे ही धोक्याची घंटा आहे. पुन्हा लॉकडाऊनची स्थिती उद्भवू नये यासाठी आताच सर्वंकष प्रयत्न झाले पाहिजेत. रुग्णांची वाढती संख्या पाहता खाटा, रेमडिसिविर व औषधे, ऑक्सिजनचा पुरेसा साठा ठेवावा. अनलॉकिंगच्या प्रक्रियेमध्ये काहीशी मोकळीक आली. रुग्णसंख्या कमी झाल्याने कमी झालेल्या सुविधा पुर्ववत सुरु कराव्यात. वलगावप्रमाणे आवश्यकतेनुसार व्हीएमव्ही संस्था व इतर ठिकाणीही विलगीकरण सुविधा पुरवली जाईल. अचलपूर येथेही खाटांची संख्या वाढवावी.

गृह विलगीकरणातील व्यक्तींशी नियमित संपर्क ठेवा

लक्षणे नसलेल्या व गृह विलगीकरणात असलेल्या व्यक्तींकडून अनेकदा नियम पाळले जात नाहीत. अशांकडून संक्रमणाचा धोका वाढतो. त्यामुळे त्यांच्यावर कडक दंडात्मक कार्यवाही व्हावी. या व्यक्तींशी संबंधित यंत्रणेने नियमित संपर्क ठेवावा. गृह विलगीकरणाचे नियम न पाळणा-यांकडून बंधपत्रही लिहून घेतले जात आहे. त्याचे काटेकोर पालन व्हावे. ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

जोखमीच्या क्षेत्रांत चाचण्या व सर्वेक्षण

केंद्रीय पथकाने नुकतीच येथे भेट दिली व जिल्ह्यात काही जोखमीची क्षेत्रे आढळून आल्याचे निरीक्षण नोंदविले. त्यांच्या सूचनेनुसार अशा परिसरात रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांचे प्रमाण वाढविणे व गृहभेटींतून सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यात अमरावती शहरातील राजापेठ, बेलपुरा, कॅम्प, दस्तूरनगर आदी परिसर व अचलपूर, नांदगाव खंडेश्वर, चांदूर बाजार, वरूड हा ग्रामीण परिसराचा त्यात समावेश आहे.

हवामानातील बदल, थंडीचे वाढलेले प्रमाण यामुळे रुग्णांची संख्या वाढल्याचे कारण सांगितले जाते. संसर्ग हा एकदुस-यापुरता मर्यादित न राहता अख्खे कुटुंब संक्रमित झाल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे या काळात लागण होण्याचे प्रमाण, विषाणूच्या संसर्गक्षमतेत वाढ आदी शास्त्रीय कारणे जाणून घेण्यासाठी त्याचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेला पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल दोन- तीन दिवसांत प्राप्त होईल.  

मास्क, सोशल डिस्टन्स व स्वच्छतेचे नियम न पाळणा-यांवर दंडात्मक कार्यवाहीसाठी पथके गठित करण्यात आली आहेत. त्यातून गत दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर दंडवसुली झाली आहे. त्याचप्रमाणे, मास्क नसलेल्यांना प्रवेश न देण्याबाबत शासकीय कार्यालये, निमशासकीय संस्था, मंडळे, एस. टी. व इतर महामंडळे व सर्व विभागांना सूचित करण्यात येईल. रिक्षाचालकांकडूनही पालन होत नसल्यास स्वतंत्र ड्राईव्ह घेण्यात येईल. नागरिकांनी दक्षता त्रिसूत्री पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. बैठकीनंतर जिल्हाधिका-यांनी पत्रकार बांधवांशीही संवाद साधला.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती