जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस






जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

'फ्रंटलाइन वर्कर्स'ने पुढाकार घेऊन लस घ्यावी
- जिल्हाधिकारी शैलेश नवाल


       अमरावती, दि. 6 : शासकीय, तसेच खासगी वैद्यकीय क्षेत्रातील 'फ्रंटलाइन वर्कर्स'ने पुढाकार घेऊन कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी व लसीकरण मोहिम पुढच्या टप्प्यात जाऊन सर्वांना लसीकरण होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे केले. येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील लसीकरण केंद्रात जाऊन जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी स्वतः लस घेतली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. ए. टी. देशमुख, डॉ. पद्माकर सोमवंशी, डॉ. जयश्री नांदूरकर, डॉ. काळे आदी उपस्थित होते.


       जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, मास्क वापर व दक्षतेबाबत जोरदार मोहीम हाती घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी महापालिका व आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार जनजागृतीसाठी सोमवारपासून मोहीम राबविण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी आज सकाळी पीडीएमसीला भेट देऊन पाहणी केली व स्वतःहून नोंदणी कक्षात जाऊन नोंदणी करून संपूर्ण प्रक्रियेतून जात लस घेतली. जिल्हाधिकारी महोदयांना कोविशील्ड लस देण्यात आल्याचे डॉ. नांदूरकर यांनी सांगितले.

                   जिल्हा प्रशासन व महापालिकेकडून आवाहन

 

      अमरावती महानगरपालिका क्षेत्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता माननीय जिल्हाधिकारी तथा माननीय आयुक्त महानगरपालिका यांचेमार्फत कोरोना नियंत्रण व प्रतिबंधक उपाय योजनाकरता सुचना जारी करण्यात आल्या आहेत. होम आयसोलेशन मधील रुग्णांना तसेच खाजगी दवाखाने शासकीय रुग्णालय यांनी लक्षणे असलेली व लक्षणे नसलेली रुग्ण गृह विलगीकरणामध्ये ठेवत असताना रुग्णांचे मोबाईल क्रमांक तसेच रुग्णांचे पत्ता व रुग्णांचे नोंदणी करणे अत्यावश्यक असून त्यांना घराबाहेर न निघणे, मास्क वापरणे, नियमितपणे डॉक्टरांच्या संपर्कात राहणे इत्यादी गोष्टींच्या सूचना देण्यात याव्यात होम आयसोलेशन मधील रुग्णांचे नोंदणी WWW.HOMEISOLATIONAMT.COM या वेबसाईटवर करावे सदर वेबसाईट मोबाईल द्वारे नियंत्रित करता येते, होम  आयसोल्युशनमधील रुग्ण, गृह विलगीकरणाचे नियम कळत नसल्यास रुग्णांविरुद्ध रोग प्रसार व नियंत्रण कायदा अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल , तसेच रुग्णांनी स्वतः मार्फत इतरांना कोणाची लागण होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, सर्व नागरिक तथा रुग्णांनी कोरोनाबाबत दक्षता बाळगावी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


वैद्यकीय अधिकारी यांना सूचना


        सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी पूर्ण रुग्णांची नोंदणी करणे आवश्यक आहे जेणेकरून रुग्ण कुठे आहे याची माहिती होईल. 7030922851,7030922851 मोबाईल क्रमांकांवर नोंदणी करू शकता. रूग्णांचे मोबाईल नंबर घेणे आवश्यक आहे जेणेकरून रुग्णांशी व्हिडिओ कॉल फोन कॉल करणे शक्य होईल, असे आवाहनही करण्यात आले आहे.

00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती