पाणीटंचाईबाबत प्रस्तावित उपायांची अंमलबजावणी वेळेत करा - पालकमंत्री यशोमती ठाकूर

 






भातकुली तालुक्यातील टंचाईबाबत पालकमंत्र्यांकडून आढावा

पाणीटंचाईबाबत प्रस्तावित उपायांची अंमलबजावणी वेळेत करा

- पालकमंत्री यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 9 : पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांची अंमलबजावणी  वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

            भातकुली तालुक्यातील टंचाई आराखड्याबाबत बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भातकुली पंचायत समिती कार्यालयात आज झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. पंचायत समिती सभापती कल्पना चक्रे, उपसभापती अरविंद आकोलकर, जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ मोहोड, गणेश सोळंके, मयुरी कावरे, प्रदीप थोरात, जया तेलखेडे, उषा बोंडे, करुणा कोलटके, तहसीलदार श्रीमती नीता लबडे व गटविकास अधिकारी सुरेश थोरात आदी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, पाण्याची टंचाई निर्माण होणाऱ्या गावांमध्ये पेयजलाचा नियमित पुरवठा होण्यासाठी आवश्यक तजवीज करावी. यासाठी आराखड्यात नमूद प्रत्येक उपाययोजनेची विहित वेळेत अंमलबजावणी करावी. कुठेही अडचण उद्भवता कामा नये. सर्व ठिकाणी पाणीपुरवठा नियमित व्हावा.

            यावेळी पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.

 

 

यावेळी श्रीमती ठाकूर यांनी भातकुली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बोरखडीपर्यंत शहानुर नळ योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्याची  व्यवस्था करण्यात यावी. मारकी व वातोंडा हिमतपुर येथील शिकस्त झालेल्या पाण्याच्या टाकीची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी .येत्या उन्हाळ्यात गावातील नागरिकांना   पाणीटंचाई भासू नये यासाठी  जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पूरक पाणीव्यवस्थेसाठी    टाकीचे बांधकाम करण्याबाबतचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावे, असे त्यांनी सांगितले.

धामोरी, वायगाव, वाठोडा शुकलेश्वर, खारतळेगाव,पूर्णनगर, साऊर, रामा, सोनारखेड, आष्टी, अनचलवाडी,वातोंडा, निरुळ, वाकी या गावांमध्ये आवश्यकतेनुसार हातपंप उभारण्यासाठी प्रस्ताव द्यावे असे श्रीमती ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

भातकुली येथील भूषण तुकाराम झुंबडे या विद्यार्थ्यांने अभियांत्रिकी पूर्व परीक्षेत 98 टक्के गुण  प्राप्त केल्याबद्दल पालकमंत्री श्रीमती  ठाकूर यांनी त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती