तीनशे अतिरिक्त खाटांचे नियोजन जिल्हाधिकारी शैलेश नवाल



कोरोना प्रतिबंधक उपाययोजना

तीनशे अतिरिक्त खाटांचे नियोजन

जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 

अमरावती, दि. 24 : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णालयांची यंत्रणा सुसज्ज करण्यात येत आहे. उपचारांसाठी अतिरिक्त 300 खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार इतरही सोयी- सुविधा आवश्यकता लक्षात घेऊन तजवीज करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.

जिल्हाधिका-यांनी आज कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत आरोग्य यंत्रणा व संबंधित विभागाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. विशाल काळे, डॉ. जयश्री नांदुरकर आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. नवाल म्हणाले की, संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न सर्वांनी समन्वयाने करावे. सध्या 1600 खाटांव्यतिरिक्त 300 अतिरिक्त खाटा वाढविण्यात येतील. चाचण्यांचे  प्रमाण वाढवावे. ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा ठेवावा.  दरम्यान लसीकरणाचेही काम गतीने  पूर्ण होणे आवश्यक आहे.  कोरोना विषाणूचे संक्रमण रोखायचे असेल तर दक्षता त्रिसूत्रीचा जीवनशैलीत समावेश व्हावा. सामाजिक वर्तनात बदल होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व कार्यालये, आस्थापना, मेडिकल दुकाने, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, संस्था, संघटना आदींनी ‘नो मास्क, नो एन्ट्री’ सारखे उपक्रम राबवावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

          आरोग्य विम्याचा लाभ मिळावा म्हणून चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांकडून कोरोना निगेटिव्ह रुग्ण पॉझिटिव्‍ह दाखविण्यात येत असल्याची तक्रार होत आहे. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासन व आरोग्य विभागाला सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीतून सत्य समोर येईलच. मात्र, त्यामुळे ‘कोरोना नाहीच’ असे म्हणणे वस्तुस्थिती नाकारण्यासारखे होईल. कोरोना चाचणीचा संपूर्ण डेटा हा ऑनलाईन नोंदविला जातो. कोणालाही या संदर्भात खातरजमा करावयाची झाल्यास त्यांना आरोग्य विभागाकडून संपूर्ण सहाय्य करण्यात येईल. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत आहे. मोठ्या संख्येने रुग्ण रुग्णालयात भरती होत आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींना देखील संसर्ग झाल्याने उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळे साथीवर नियंत्रणासाठी अधिक कडक पावले उचलण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.

            जिल्ह्यात खासगीरित्या होणाऱ्या ॲन्टीजेन टेस्ट पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात कोरोना संशयीत किंवा लक्षणे दिसणाऱ्या सर्वांच्याच आरटीपीसीआर चाचणी केली जात असून, त्याच्या संपूर्ण नोंदी आरोग्य विभागाच्या पोर्टलवर सुरक्षित राहतात. त्यामुळे त्यात कोणी छेडछाड करू शकत नाही. कोरोना चाचण्यांचे दर शासनाने निर्धारित करुन दिले आहे. सर्व रुग्णालयांनी त्यानुसार रुग्णांकडून शुल्क आकारणी करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

00000

  

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती