विनामास्क व बेशिस्त बुलेटस्वाराचा वाहन परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

 


विनामास्क व बेशिस्त बुलेटस्वाराचा वाहन परवाना रद्द करण्याचे आदेश

जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

वाहन ताब्यात घेण्यासह २ हजारांचा दंड

 

अमरावती, दि. २४ : मास्क न घातलेल्या व यंत्रणेकडून थांबण्याची सूचना करूनही बेपर्वाईने वाहन चालवत भरधाव वेगात पळून जाणाऱ्या एका बेशिस्त व बेजबाबदार युवकाचे वाहन ताब्यात घेण्यासह दोन हजार दंड व वाहन परवाना रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.

सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी काल मंगळवारी सायंकाळनंतर शहरातील बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी विविध ठिकाणांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान

गाडगेनगराजवळ एक मास्क न घातलेला बुलेटस्वार आपल्या साथीदारासह वेगात जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यावरून जिल्हाधिकारी पथकातील कर्मचाऱ्याने संबंधित बुलेटस्वाराला थांबण्याची सूचना केली. मात्र, सदर बुलेटस्वाराने वेगात वाहन चालवत उड्डाण पुलावरून इर्विन चौकमार्गे खापर्डे बगिच्याकडे पोबारा केला. दरम्यान, पथकाने त्याचा पाठलाग करत त्याच्या वाहनाचा नंबर नोंदवून घेतला व त्याबाबत कारवाईसाठी शहर वाहतूक पोलीस व आरटीओ कार्यालयाला सूचित केले.

वाहन क्रमांक एमएच २७- बीपी०१०० असा बुलेटचा नंबर आहे. त्यावरून वाहनचालकाचा तपास करण्यात आला. मोहम्मद उरुज मोहम्मद आसिफ असे त्याचे नाव असून, वय १९ वर्षे आहे. तो लालखडी रस्त्यावरील गौसनगर परिसरातील रहिवाशी आहे. मास्क न घालणे, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग करणे, बेपर्वाईने वाहन चालविल्याबद्दल या बुलेटस्वाराला

वाहतूक शाखेकडून दोन हजार रुपये दंड करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, वाहन ताब्यात घेण्यात येऊन त्याचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्याचे निर्देश आरटीओ कार्यालयाला देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांसमवेत रवी दंडे, अमोल नेवारे आदींचा पथकात समावेश होता.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती