दिव्यांगमित्र पोर्टलचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 




दिव्यांगमित्र पोर्टलचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

दिव्यांग बांधवांना अधिकाधिक सुविधा मिळवून देण्यासाठी पोर्टल उपयुक्त ठरेल

-          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 9 :  दिव्यांग बांधवांच्या सुविधांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असलेल्या राखीव निधीचा पुरेपूर विनीयोग होणे आवश्यक आहे. दिव्यांगांना अधिकाधिक सुविधा मिळवून देण्यासाठी व प्रक्रियेत पारदर्शकता व सुस्पष्टता राहण्यासाठी दिव्यांगमित्र पोर्टलचा उपयोग होईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

जिल्हा परिषदेतर्फे दिव्यांगमित्र या पोर्टलचे लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, आमदार बळवंतराव वानखडे, किशोर बोरकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे आदी यावेळी उपस्थित होते.

दिव्यांग बांधवांना विविध सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी दिव्यांगमित्र या पोर्टलचा फायदा होणार आहे. त्यानुषंगाने सर्व नोंदणी प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण करावी. व्यक्ती, त्यांना आवश्यक सुविधा आदी तपशील सुस्पष्टपणे ऑनलाईन असावा. पुनर्वसन केंद्राच्या इमारतीचे कामही पूर्ण करण्यात येईल. तिथे ग्रंथालय, अभ्यासिका आदी सुविधा पुरवल्या जातील. त्यासाठी आवश्यक निधी मिळवून देण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थांकडे राखीव निधीतून दिव्यांगांना अधिकाधिक सुविधा मिळवून द्याव्यात. कुठलाही निधी अखर्चित राहता कामा नये, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यांच्या निधीतून दर पाच वर्षांनी दिव्यांगांचा मेळाव्याचीही तरतूद यावेळी करण्यात आली.

दिव्यांगमित्र पोर्टलवर 40 टक्क्यांहून अधिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींची नोंद करण्यात येते. त्यानुसार 16 हजार व्यक्तींची नोंदणी झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. येडगे यांनी सांगितले. दिव्यांगांना लागणा-या उपकरणांची पूर्तता व तसेच इतरही योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी या डाटाबेसचा वापर होईल, असे श्री. येडगे म्हणाले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती