Wednesday, February 12, 2025

DIO NEWS AMRAVATI 12.2.2025

 


बालगृह, वन स्टॉपचे काम तातडीने पूर्ण करावेत

- जिल्हाधिकारी सौरभ कटियार
अमरावती, दि. 12 : सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील बालगृहाचे बांधकाम आणि वन स्टॉप सखी सेंटरच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिल्या.
जिल्हा महिला व बाल विकासच्या विविध योजनांशी संबंधित आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, विभागीय महिला व बालविकास अधिकारी विलास मसराळे, महिला व बालविकास अधिकारी उमेश टेकाळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बाल विकास विभागाची त्रैमसिक आढावा बैठक घेण्यात आली. यात बालगृह बांधकाम, वन स्टॉप सेंटर, कार्यस्थळी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम 2013, वन स्टॉप सेंटर-2, पिंक रिक्षा योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अनाथ प्रमाणपत्र, बालविवाह प्रतिबंध, ग्राम बाल संरक्षण समिती, बाल कल्याण समिती, अपराधी परिविक्षा अधिनियम, पुनर्वसन आणि सर्वसमावेशक सल्लागार समितीचा आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी यांनी विविध विषयांवर चर्चा करून निर्देश दिले. यामुळे जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विषयक उपक्रमांच्या अंमलबजावणीला अधिक गती मिळणार आहे.
00000



संत रविदास महाराजांना अभिवादन
अमरावती, दि. 12 :- संत रविदास महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी अभिवादन केले.
यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी विजय जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा खनिकर्म अधिकारी इब्राहीम शेख, अधिक्षक निलेश खटके यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पुष्पार्पण करुन संत रविदास महाराज यांना अभिवादन केले.
00000
दहावी, बारावीच्या परिक्षा केंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश लागू
अमरावती, दि. 12 (जिमाका): दहावी आणि बारावीच्या परिक्षा सुरळीत पार पाडाव्यात आणि परिक्षा केंद्रावरील गैरप्रकार टाळण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहितेचे कलम 163 लागू करण्यात आले आहे. त्यानुसार परिक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहे.
बारावीची परिक्षा दि. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 आणि दहावीची परिक्षा दि. 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान होणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच परीक्षा परिसरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 लागू करण्यात आले आहे.
सर्व परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार टाळण्यासाठी आणि परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सदर कालावधीत जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात व्यक्तींच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके बंद ठेवण्यात येणार आहेत.
सदर आदेश जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रास लागू करण्यात आले असून दि. 18 मार्च 2025 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहतील. यासाठी विद्यार्थ्यांसह पालक, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...