Friday, February 7, 2025

DIO NEWS AMRAVATI 7.2.2025

 शुक्रवारपासून जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन

*लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

अमरावती, दि. 7 (जिमाका) : कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्यावतीने दि. 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान जिल्हास्तरीय कृषी विकास परिषद आणि प्रदर्शनीचे आयोजन सायन्स स्कोर मैदानात करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषीविषयक तंत्रज्ञान, बियाणे, खते, औषधे, औजारे यांची अद्ययावत माहिती व्हावी यासाठी प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे.

प्रदर्शनीचे उद्घाटन कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते होणार आहे. कृषी विकास परिषदेमध्ये पीक परिसंवाद, चर्चासत्र, विविध कृषी निविष्ठांचे स्टॉल, महिला बचतगट उत्पादीत वस्तूंचे प्रदर्शन, तसेच खाद्यपदार्थाचे स्टॉल, यासह सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. प्रदर्शनीला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांनी केले आहे.

000000

सामाजिक न्यायच्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

*15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत

अमरावती, दि. 7 (जिमाका) : सामाजिक न्याय विभागातर्फे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांना पुरस्कार देण्यात येतात. इच्छुक आणि पात्रता असणाऱ्या व्यक्ती आणि संस्थानी शनिवार, दि. 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्काराने व्यक्ती आणि संस्थांना गौरविण्यात येते. पुरस्कारासाठी करावयाचे अर्ज sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच पात्रतेचे निकष, अटी, शर्ती संदर्भातील माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाजकल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

000000

हमीभावाने तूर खरेदीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 7 (जिमाका) : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडतर्फे यावर्षीच्या हंगामामध्ये तूर खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीची प्रक्रिया दि 24 जानेवारीपासून सुरू झाली असून पुढील 30 दिवसांपर्यंत सुरु राहणार आहे.

नोंदणीसाठी यावर्षीच्या हंगामामधील पिकपेरा नोंद असलेला तलाठ्याची स्वाक्षरी आणि शिक्क्यानिशी ऑनलाईन सातबारा, आधारकार्डाची छायांकीत प्रत, बँकेच्या पासबुकाची प्रत, मोबाईल क्रमांकसोबत आणावे. बँक पासबुकवर शेतकऱ्याचे पूर्ण नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड स्पष्ट नमूद असावा लागणार आहे. जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक स्विकारण्यात येणार नाही. जिल्हा मार्केटिंग कायर्यालयामार्फत अचलपूर, चांदूर रेल्वे, दर्यापूर, खल्लार, धारणी, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, खरेदी विक्री संघामार्फत, तसेच अचलपूर येथे जयसिग विविध कार्यकारी सहकारी सोसायटी पथ्रोट व नेरपिंगळाई विविध कार्यकारी सहकारी सोसायटी नेरपिंगळाई, मोर्शी यांच्यातर्फे नोंदणी सुरु आहे. शेतकऱ्यांनी केंद्राच्या ठिकाणी हमी भावाने ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनी केले आहे.

000000

धर्मादायकडून किडनी ट्रान्सप्लांटसाठी मदत

*गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन

अमरावती, दि. 7 (जिमाका) : धर्मादाय आयुक्त कार्यालयातर्फे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रीयेसाठी मदत केली जाणार आहे. यासाठी गरजूंनी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. गरीब व्यक्ती औषधोपचारापासून वंचित राहू नये यासाठी धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती, धर्मादाय सह आयुक्त संभाजी ठाकरे यांनी गरजू, गरीब रुग्णांना गंभीर आजारावरील उपचारासाठी सुविधा प्राप्त करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मिशन किडनी ट्रान्सप्लांट अभियान राबविण्यात येणार आहे.

किडनी खराब झालेली असलेल्या गरीब रुग्णांकडे रक्ताच्या नात्यातील किडनी डोनर उपलब्ध आहे, परंतु पैशाअभावी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे शक्य नसल्यास त्यांना मदत करण्यात येणार आहे. यासाठी गरजू नागरीकांना धर्मादाय सह आयुक्त कार्यालय, मालटेकडी, टोपेनगर, म्हाडा भवन, अमरावती येथे नाव नोंदणी करावी लागणार आहे. नाव नोंदणी केल्यानंतर रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी त्यांना महात्मा ज्योतिराव फुले योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता, प्रधानमंत्री सहायता, तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. उपचाराची सुविधा अमरावती जिल्ह्यातील रुग्णालय किंवा राज्यातील नामांकीत धर्मादाय रुग्णालयामध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे. गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन धर्मादाय उप आयुक्त न. वा. जगताप यांनी केले आहे.

000000

थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

* अर्जासाठी 12 मार्चपर्यंत मुदत

अमरावती, दि. 7 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे थेट कर्ज योजना राबविण्यात येते. यासाठी पात्र मातंग समाजातील 12 पोटजातीच्या अर्जदारांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर थेट कर्ज योजनेसाठी अर्जदाराचे वय 18 पूर्ण असावे, तसेच 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. शहरी आणि ग्रामीण भागातील अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 लाखापेक्षा अधिक नसावी. तसेच अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. नियमाप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करावी. स्वत: अर्जदाराने कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत जिल्हा कार्यालयात मूळ कागदपत्रांसह सादर करावा. त्रयस्थ अथवा मध्यस्थांमार्फत कर्ज प्रकरणे स्वीकारण्यात येणार नाहीत.

थेट कर्ज प्रकरणासोबत अर्जदाराच्या बँकेचा सिबील क्रेडीट स्कोअर 500 असावा. जातीचा दाखला, आधारकार्ड, शैक्षणिक दाखला, रेशनकार्ड, पॅनकार्ड याची छायांकित प्रत, अनुदान किंवा कर्जाचा लाभ  घेतलेला नसल्याचे स्वयंघोषणापत्र, व्यवसायाच्या ठिकाणीची भाडेपावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा, यात नमुना आठ, वीज देयक व कर पावती, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र किंवा शॉप ॲक्ट परवाना, व्यवसायासंबंधीत तांत्रिक प्रमाणपत्र, व्यवसायाचे दरपत्रक, तीन पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला, अर्जदाराने आधारशी जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा लागणार आहे.

योजनेचे कर्ज प्रस्ताव महामंडळाने विहित केलेल्या नमुन्यातील अर्ज दि. 12 फेब्रुवारी ते 12 मार्च 2025 पर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मागे, अमरावती येथे सादर करावे, असे साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गभणे यांनी कळविले आहे.

000000





No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...