Thursday, March 13, 2025

DIO NEWS AMRAVATI 13-03-2025

 



सर्व कार्यालयांनी स्पर्धेत सहभागी व्हावे

-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

अमरावती, दि. 13 (जिमाका): राज्य शासनाने क्षेत्रीय स्तरावरील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी 100 दिवसांचा कृति आराखडा निश्चित केला आहे. या आराखड्यामध्ये दिलेल्या मापदंडानुसार गुणांकन करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हास्तरावरील सर्व कार्यालयांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे स्पर्धेबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातून महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, भातकुली उपविभागीय अधिकारी मिन्नू पीएम, धारणी उपविभागीय अधिकारी प्रियंवदा म्हाडदडकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव आदी जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

श्री. कटियार यांनी पहिल्या टप्प्यात केवळ चार विभागांसाठी असलेला कृति आराखडा संपूर्ण शासकीय यंत्रणेला लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व कार्यालयांनी यात भाग घ्यावा. कार्यालयाच्या समस्या इतर विभागाच्या मदतीने सोडविण्यास मदत होत असल्यास निश्चितच मदत घ्यावी. प्रामुख्याने परिसर स्वच्छता, अभ्यागतांसाठी असलेली व्यवस्था, नागरिकांच्या समस्या सोडविणे आदी मानके ही कार्यालयीनस्तरावरील असल्याने यावर भर द्यावा, असे आवाहन केले.

जिल्हास्तरावरील कोणत्याही कार्यालयांना मदतीची आवश्यकता भासल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. कार्यालयांना आलेल्या समस्या तातडीने सोडविली जाईल. स्पर्धेतील मानके पूर्ण करण्यासाठी अद्यापही पुरेसा कालावधी असल्याने कार्यालयांनी तयारी करून अहवाल सादर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

00000

 

रोजगार मेळाव्यात 68 उमेदवारांची प्राथमिक निवड

अमरावती, दि. 13 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर तसेच विद्याभारती महाविद्यालय यांच्यावतीने दि. 12 मार्च रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात 68 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

मेळाव्यात 210 उमेदवारांनी ऑनलाइन, ऑफलाईन सहभाग नोंदविला. यातील 162 उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन मुलाखती दिल्या. यापैकी 68 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, नितीन मेटागे, वैशाली पवार, अभिषेक ठाकरे, जितेंद्र गायकवाड उपस्थित होते. तसेच महिंद्रा आणि महिंद्रा, रेनबो कोटिंग प्रायव्हेट लिमीटेड बडनेरा, पीपीएस एनर्जी प्रायव्हेट लिमीटेड अमरावती, क्रेडीट एक्सेस ग्रामीण प्रायव्हेट लिमीटेड अमरावती, जाधव गियर प्रायव्हेट लिमीटेड अमरावतीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

0000

इंटरशिप योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

       अमरावती, दि. 13 (जिमाका): सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री इंटरशिप योजना सुरू केली आहे. यात तरूणांना मोठ्या कंपन्यांमध्ये इंटरशिपची संधी दिली जाणार आहे. सदर योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आली असून यासाठी दि. 31 मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे.

          जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना pminternship.mca.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. उमेदवारांना 12 महिन्यांसाठी इंटरशिप मिळणार आहे, तसेच दरमहा 5 हजार रूपये मिळणार आहेत. याशिवाय इंटरशिप पूर्ण झाल्यानंतर 6 हजार रूपये एकरकमी अनुदान दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण दिले जाणार आहे.

योजनेमध्ये तरूणांनी सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मस्जिद परिसर, डेपो रोड, अमरावती येथे भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

000000

 

 

वाहन चालक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

       अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती येथील प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयात कंत्राटी पद्धतीने एक वाहन चालक पद भरण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

          एक वाहन चालकाचे पद 11 महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने घेण्यात येणार आहे. प्रथम सहा महिन्यानंतर नियुक्त उमेदवाराची प्रगती पाहून मुदतवाढ देण्यात येणार आहे. यासाठी मासिक वेतन सर्व भत्यासह 15 हजार रूपये देण्यात येणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारास 38 वर्षे व उमेदवार मागासवर्गीय असल्यास 43 वर्षे पर्यंत वयोमर्यादा राहणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 27 मार्च 2025 पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय, अमरावती विभाग, अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय अधिकारी यांनी केले आहे.

000000

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी आता 11 महिने

अमरावती, दि. 13 (जिमाका): मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी आता 11 महिने करण्यात आला आहे. यापूर्वी सहा महिन्यांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आता पाच महिन्यांसाठी उमेदवार कार्यरत राहणार आहे.

युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळविण्याची क्षमता वाढविण्यासाठी ही योजना राबविण्यात आली. जिल्हयामध्ये विविध आस्थापनांमध्ये उमेदवारांनी कार्यप्रशिक्षण घेतले. त्यानंतर संबंधित उमेदवारांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. मात्र मुदतवाढ मिळाल्यामुळे विविध आस्थापनेमध्ये 6 महिने युवाकार्य प्रशिक्षण पूर्ण केले आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांनी पुढील 5 महिन्याच्या कार्यप्रशिक्षण कालावधीसाठी मूळ आस्थापनेवर त्वरीत रुजू व्हावे, तसेच संबंधित आस्थापना प्रमुखांनीही त्यांना रुजू करून घ्यावे, असे आवाहन सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

00000

सोमवारी महिला लोकशाही दिन

अमरावती, दि. 13 (जिमाका) : महिलांच्या तक्रारीसाठी महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. 17 मार्च रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. महिलांनी त्यांच्या तक्रारी विहित नमुन्यात व आवश्यक कागदपत्रासंह पाठविण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक निलेश खटके यांनी केले आहे.

00000

 राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचा दौरा

अमरावती, दि. 6 (जिमाका) : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचे  शनिवार, दि. 15 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता अमरावती येथील विश्रामगृह येथे आगमन व ओबीसी संघटनांशी चर्चा करतील. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता रहाटगाव येथील कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर रात्री आठ वाजता चंद्रपूरकडे प्रस्थान करतील.

00000

शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

अमरावती, दि. 13 (जिमाका) : शहरात शांतता  सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1)  (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 18 मार्च ते दि. 1 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे.

000000

 

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचा दौरा

अमरावती, दि. 6 (जिमाका) : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचे  शनिवार, दि. 15 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता अमरावती येथील विश्रामगृह येथे आगमन व ओबीसी संघटनांशी चर्चा करतील. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता रहाटगाव येथील कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर रात्री आठ वाजता चंद्रपूरकडे प्रस्थान करतील.

00000

शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

अमरावती, दि. 13 (जिमाका) : शहरात शांतता  सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्त यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1)  (3) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 18 मार्च ते दि. 1 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे.

000000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...