Monday, March 3, 2025

DIO NEWS AMRAVATI 03-03-2025

 

धारणीत आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत योजनांसाठी निशु:ल्क अर्ज मागविण्यास सुरुवात

अमरावती, दि 3 (जिमाका): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी यांच्या कार्यक्षेत्रात केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना 2024-25 अंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी विविध योजनांसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.

आदिवासी महिला-पुरुष बचत गटांसाठी दालमिल उभारणे, प्रिंटिंग प्रेस मशिन खरेदी करणे, तसेच वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी विविध व्यवसाय सुरू करणे (नळ फिटिंग, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल, सुतारकाम इत्यादी) आणि सुशिक्षित युवकांसाठी सेतू केंद्र सुरू करणे यांसारख्या योजनांसाठी 85 टक्के अनुदान दिले जाणार आहे.

धारणी, चिखलदरा, अंजनगाव आणि अचलपूर तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी अर्ज धारणी येथील प्रकल्प कार्यालयात उपलब्ध आहेत. नांदगाव खंडेश्वर, भातकूली, अमरावती, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे आणि दर्यापूर तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी अपर आयुक्त आदिवासी विकास, अमरावती येथे अर्ज उपलब्ध आहेत. तसेच, मोर्शी, वरुड, तिवसा आणि चांदूर बाजार तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी उप कार्यालय मोर्शी येथे अर्ज उपलब्ध आहेत.

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2025 आहे. अधिक माहितीसाठी 07226-224217 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प कार्यालयाकडून करण्यात आले आहे.लाभार्थी निवड करताना दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, अपंग, विधवा, परितक्त्या आणि निराधार महिलांना प्राधान्य दिले जाईल. अशी माहिती प्रकल्प अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी दिली.

0000

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना 'बालस्नेही पुरस्कार' प्रदान

अमरावती, दि. 03 (जिमाका): महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे 'बालस्नेही पुरस्कार 2024' अंतर्गत उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांना बाल हक्कांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आज मुंबई येथे गौरविण्यात आले.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, डॉ. पंकज भोयर, आमदार संजय केळकर, मनिषा कायंदे, प्रशांत नारनवरे, पोलिस अपर महासंचालक अश्वती दोरजे, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांच्या उपस्थितीत त्यांना गौरविण्यात आले.

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात बालकांच्या हक्कांसाठी अनेक प्रभावी योजना राबवण्यात आल्या आहेत. विशेषतः बालविवाह प्रतिबंध, बालकामगार निर्मूलन आणि शिक्षण हक्कांच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने पुरस्कारासाठी निवड केली.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, हा पुरस्कार संपूर्ण टीमच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ आहे. आम्ही भविष्यातही बालकांच्या कल्याणासाठी कार्यरत राहू, अशी प्रतिक्रिया पुरस्कार स्विकारल्यानंतर दिली. पुरस्काराबद्दल जिल्हा प्रशासन आणि नागरिकांनी जिल्हाधिकारी श्री. कटियार यांचे अभिनंदन केले आहे.

00000

 

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...