क्षयरोगमुक्त जिल्हा करण्यासाठी लोकाभिमुख
चळवळ राबवावी
-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
अमरावती,
दि. 28 (जिमाका) : संपूर्ण जिल्हा लवकरच क्षयरोगमुक्त
करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही
पुढाकार घ्यावा. जनजागृतीसाठी समाजमाध्यमांचा सुयोग्य वापर करावा. 'टीबीमुक्त ग्रामपंचायत' ही लोकाभिमुख मोहीम चळवळ म्हणून राबवावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी केले.
जिल्हाधिकारी
कार्यालयातील नियोजन भवन येथे आज पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली
टीबीमुक्त ग्रामपंचायत उपक्रमांतर्गत 'रौप्य महोत्सव गौरव सोहळा -2024'चे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
आमदार
सर्वश्री प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे,
राजेश वानखडे, प्रवीण पोटे - पाटील, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी
अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. सुरेश असोले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री
श्री. बावनकुळे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च 2023 रोजी वाराणसी
येथे 'क्षयरोगमुक्त भारत' करण्याची घोषणा केली. त्याअनुषंगाने सर्व देश टीबीमुक्त होण्यासाठी
विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा टीबीमुक्त होण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य
विभाग आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तम प्रयत्न करीत आहेत. टीबीमुक्त
ग्रामपंचायतींचा रौप्य महोत्सव गौरव सोहळ्यात संबंधित ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यात
आले आहे. अन्य ग्रामपंचायतींनेही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन टीबीमुक्त ग्रामपंचायत
व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे. टीबीमुक्त झालेल्या रुग्णांच्या मुलाखती समाज
माध्यमांवर प्रसारित कराव्यात. जेणेकरून अन्य रुग्णांनाही यातून आशेचा किरण मिळेल.
यातून ते योग्य औषध उपचार करण्यासाठी प्राधान्य देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी
व्यक्त केला.
यावेळी
वासनी खु. सरपंच - अवंतिका वाटाणे, हयापूर -अवधूत
हिगांटे, खिरगव्हाण - सुजाता सरदार,
आंचलवाडी- वैशाली काळमेघ, हरताळा - नूतन काळे, सायत - अन्नपूर्णा मानकर, सावंगी संगम
- पंकज शिंदे, कोरडा - सोनाजी सावळकर, कळमगव्हाण नलिनी वानखडे,
रामगाव -छाया घरडे, टोंगलाबाद - वैशाली पांझाडे,
अडगाव बु. - मंगला खडसे, बोर्डा - अतुल राऊत,
डेहणी - शीतल राठोड, दिवानखेड -बाळासाहेब उईके,
बेसखेडा- दुर्गा यावले, इसापुर - मनोज धोटे
यांना प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानित करण्यात आले.
डॉ. सुरेश असोले यांनी प्रास्ताविक केले. श्रीकृष्ण पखाले यांनी सूत्रसंचालन
केले. डॉ. रमेश बनसोड यांनी आभार मानले.
0000
अमरावती उपविभागीय कार्यालयाचे संकेतस्थळ सुरू
अमरावती, दि. 28 (जिमाका): मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमांतर्गत सुलभ, लोकाभिमुख व गतिमान प्रशासनाचा एक भाग म्हणून सर्वसामान्य जनतेशी संवाद साधण्याच्या उद्देशाने उपविभागीय अधिकारी, अमरावती यांनी त्यांच्या कार्यालयाचे www.sdoamravati.com हे संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे करण्यात आले.
जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे आदी यावेळी उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी संकेतस्थळाची आवश्यकता आणि त्याची वैशिष्ट्ये विशद केली. संकेतस्थळामध्ये अमरावती उपविभागाचा इतिहास, अमरावती विभागातील सर्व गावांचे नकाशे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे सामान्य शेतकऱ्याला त्याच्या शेताच्या नकाशासाठी कोठेही फिरण्याची आवश्यकता नाही. तो संकेतस्थळावरून नकाशा डाउनलोड करून आपले काम करू शकतो.
या संकेतस्थळामध्ये प्रशासकीय सेटअपमध्ये अधिकारी ते कर्मचारी अशी सर्वांची नावे आणि त्यांच्याकडे नेमून दिलेली कामे यांची माहिती उपलब्ध असल्यामुळे सामान्य नागरिकांना त्यांच्या कामासाठी नेमके कोणाकडे जावे याची अडचण येणार नाही. संकेतस्थळावर रोजगार हमी योजना, अन्न व नागरी पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार योजना, माहितीचा अधिकार कायदा, लोकसेवा हक्क कायदा यांसारख्या योजना आणि कायद्यांविषयी माहिती, संबंधित शासन निर्णय आणि योजनांचा लाभ घेण्यासाठीच्या अटी व अर्ज उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांना आवश्यक असणारे अर्जाचे नमुने संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतील आणि त्यांना अर्जासाठी कोठेही जाण्याची आवश्यकता भासणार नाही. संकेतस्थळाच्या मीडिया गॅलरीमध्ये कार्यालयामार्फत आयोजित विविध शिबिरे आणि कार्यक्रमांचे फोटो अपलोड करण्यात आले आहेत. तसेच, संकेतस्थळावर कार्यालयाचा हेल्पलाईन क्रमांक आणि ई-मेलही दिलेला आहे.
या संकेतस्थळावर प्रवेश करण्यासाठी QR कोडची निर्मिती करण्यात आल्यामुळे नागरिक सहजपणे संकेतस्थळावर पोहोचू शकतात. हा QR कोड सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आला आहे.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. राज्यात उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे हे दुसरे संकेतस्थळ आहे. ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.
0000000
आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे मेळघाटातील 65 डम्बा दिलेल्या नवजात बालकाला नवजीवन
अमरावती, दि. 28 (जिमाका): मेळघाट भागातील सिमोरी येथील 22 दिवसांच्या एका नवजात बालकाला आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे जीवनदान मिळाले आहे. या बालकाच्या आईने त्याच्या पोटावर तब्बल 65 डम्बा (विळयाचे चटके) दिले होते. फुलवंती राजू धिकार बालकाच्या आईचे नाव असून, सिमोरी, तालुका चिखलदरा, जिल्हा अमरावती येथील रहिवासी आहे.
घडलेल्या घटनेनुसार,22 फेब्रुवारी 2025 रोजी आई फुलवतीने तिच्या बाळाच्या पोटावर गरम विळयाच्या 65 चटके दिले होते. 24 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 11.30 वाजता अत्यंत गंभीर अवस्थेत जिल्हा स्त्री रुग्णालय, अमरावती येथील एसएनसीयू (नवजात शिशु अतिदक्षता विभाग) मध्ये दाखल करण्यात आले. जिल्हा स्त्री रुग्णालयात केलेल्या तपासणीमध्ये बाळाला जन्मजात हृदयविकार असल्याचे निदान झाले. यामुळे बाळाची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली होती. डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारांसाठी नागपूर येथे संदर्भीत करणे आवश्यक असल्याचे सांगितले होते.
परंतु, बाळाचे आई-वडील त्याला नागपूरला पाठवण्यास तयार नव्हते. या कठीण परिस्थितीत, जिल्हा प्रशासनाने यात तातडीने हस्तक्षेप केला. मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारिसे, मेळघाट विभागातील आरोग्य अधिकारी डॉ. तिलोत्तमा वानखडे, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण साळुंके, एसएनसीयू इन्चार्ज डॉ. प्रीती इंगळे, डॉ. अमोल फाले आणि मेळघाटमधील समुपदेशक अलका झामरकर, प्रकाश खडके तसेच सिमोरी गावातील आशा कार्यकर्ती या सर्वांनी एकत्रितपणे जिल्हा स्त्री रुग्णालयात फुलवती आणि तिच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यांनी अथक प्रयत्न करून आई-वडिलांना समजावून बाळाच्या उपचारासाठी नागपूरला नेण्याची गरज सांगितली. या प्रयत्नांना यश आले आणि रुग्णाचे नातेवाईक नागपूरला जाण्यासाठी तयार झाले.
त्यानुसार, 27 फेब्रुवारी 2025 रोजी बाळाला पुढील उपचारासाठी नेल्सन हॉस्पिटल, नागपूर येथे दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्यावर डॉक्टरांनी बाळावर हृदय शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि 7 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
डॉक्टरांनी केलेले सततचे प्रयत्न आणि उपचार यामुळे 25 मार्च 2025 रोजी आईने बाळाला स्तनपान करण्यास सुरुवात केली. नेल्सन हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाळाची प्रकृती स्थिर आहे आणि त्याला उद्या, दि. 29 मार्च 2025 रोजी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
या नवजात बालकाचे प्राण वाचवण्यासाठी डॉ. विनोद पवार, डॉ. प्रीती इंगळे, डॉ. अरुण साळुंके, डॉ. अमोल फाले आणि एसएनसीयू मधील सर्व डॉक्टर्स, सिस्टर्स आणि वॉर्ड बॉय यांनी अत्यंत समर्पित भावनेने कार्य केले. डॉ. विनोद पवार यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मेळघाटातील या बालकाचे उपचार राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (RBSK) नेल्सन हॉस्पिटल नागपूर येथे मोफत करण्यात आले. या संपूर्ण चमूने एकत्र येऊन केलेल्या प्रयत्नांमुळे बाळाला नवजीवन मिळाले आहे.
000000
जनसंवाद कार्यक्रमात 700 च्यावर निवेदने सादर
नागरिकाच्या विविध समस्या तात्काळ निकाली काढण्याचे
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश
अमरावती, दि. 28 (जिमाका) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमात विविध क्षेत्रातील स्थानिक समस्याबाबत नागरिकांनी 700च्या वर निवेदने सादर केली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या, त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांचे समाधान केले.
पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी आज नियोजन भवन येथे नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेण्यासाठी जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधला. जनसंवाद कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पालकमंत्री यांना निवेदन देण्यासाठी नागरिकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. पालकमंत्री यांनी तक्रारी, निवेदने आणि समस्या घेऊन आलेल्या नागरिकांशी व्यक्तीशः संवाद साधला त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांच्या तक्रारीवर येत्या आठ दिवसात कार्यवाही करण्यात येणार असून त्यासंबंधीची पोहोच पालकमंत्री कार्यालयातून येत्या आठ दिवसात देण्यात येणार आहे.
वीज बिल, मालकी पट्टे, रस्ते, नोकरी, कृषी, शेतकरी आत्महत्या, घरकुल, रस्ते, पाणी, क्रीडा या विषयावर सुमारे चार तास पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी सुमारे सातशेच्या वर तक्रारी पालकमंत्री यांनी स्वतः स्वीकारल्या. पालकमंत्री यांनी नागरिकांशी चर्चा केली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
अनेक लोक वैयक्तिक समस्यांची निवेदने घेऊन जनसवांद कार्यक्रमात आले होते. श्री. बावनकुळे यांनी नागरिकांच्या संबंधित निवेदनावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
00000
शासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करावी
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
अमरावती, दि. 28(जिमाका) : जनतेला सेवा देणारे पोलिस हे एक महत्वाचे विभाग आहे. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांशी संवाद ठेऊन शासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले
पोलिस आयुक्त कार्यालयात आज पोलिस विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रविण तायडे, प्रविण पोटे, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास पानसरे, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलिस अधिक्षक विशाल आनंद आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, येत्या काळात सण उत्सवाचे वातावरण असणार आहे. त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व यंत्रणांनी सजग राहावे. प्रामुख्याने समाज माध्यमांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. पोलिसांनीही व्हॉटसॲप ग्रुप तसेच काही संशयित नागरिकांच्या हालचालीवर लक्ष ठेवावे. यासाठी सायबर कक्ष सक्षम ठेवावा. यातून समाज माध्यमांवरील हालचालींबाबत दक्ष रहावे. यातून अलर्ट राहता येईल. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही तसेच कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करावा.
पोलिस दलाचे आधुनिकीकरण करताना पुढील दशकाचा विचार करावा. त्यानुसार पद किंवा पायाभूत सुविधांचा प्रस्ताव तयार करावा. येत्या काळात 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुले गुन्हेगारी टोळ्यांच्या निशाण्यावर असल्याने मुलांमधील गुन्हेगारी बिंबवणारे व्हीडीओ किंवा कारवायांवर लक्ष ठेवण्यात यावे. पोलिसांना गुन्हे उकलसाठी मदत व्हावी, पोलिस मित्र किंवा शासनातर्फे नेमण्यात येणाऱ्या विशेष कार्यकारी अधिकारी यांची मदत घ्यावी. त्यामुळे पोलिसांना समाजामध्ये घडणाऱ्या अनुचित प्रकाराची माहिती गतीने मिळण्यास मदत होईल, असे सांगितले.
वैदर्भी मॉलचे उद्घाटन
पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी आज वैदर्भी या बचतगट उत्पादीत वस्तूंच्या मॉलचे उद्घाटन केले. सुरवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांनी कोनशिलेचे अनावरण केले. तसेच मॉलचे फित कापून उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी मॉलमधील बचतगटांनी उत्पादीत केलेल्या खाद्यपदार्थांची पाहणी केली.
000000
दुय्यम सहनिबंधक कार्यालयाला महसूल मंत्र्यांची अचानक भेट
अमरावती, दि. 28(जिमाका) : विभागीय आयुक्त कार्यालयातून निघालेले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपला ताफा अचानक जुन्या तहसील कार्यालयातील सह दुय्यम निबंधक कार्यालयाकडे वळविला. थेट खरेदी-विक्रीच्या टेबलवर बसून आलेल्या नागरिकांना खरेदीसाठी किती अतिरिक्त पैसे दिले याची विचारणा केली. यावेळी त्यांनी खरेदीसाठी अतिरिक्त पैसे मोजू नये, असे आवाहन केले.
अमरावती येथील सह दुय्यम निबंधक वर्ग दोन अमरावती ग्रामीण कार्यालयात शेती, जमीन, घरे खरेदी-विक्री करण्यासाठी शासकीय नियमानुसार असलेल्या 2 टक्के शुल्काशिवाय अतिरिक्त पैसे घेतात, तसेच दलाल सक्रीय असल्याची तक्रार पालकमंत्री यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी केली होती. या तक्रारीची तातडीने दखल घेत पालकमंत्र्यांनी स्वत: कार्यालयात जाऊन खरेदी-विक्रीसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्याकडून खरेदीसाठी नोंदणी आणि मुद्रांकाशिवाय किती रक्कमेची मागणी करण्यात आल्याची विचारणा केली.
नागरिकांनीही पाच हजार रूपये देण्यात आल्याचे सांगितले. यावरून पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. उपस्थित अधिकाऱ्यांना कार्यालयातील अतिरिक्त शुल्क आकारण्यावर नियंत्रण करण्याच्या सूचना दिल्या. कर्मचाऱ्यांनी विहित केल्यापेक्षा अतिरिक्त पैसे स्विकारल्यास कठोर कार्यवाही करण्याचा इशारा दिला. नागरिकांच्या तक्रारी पाहता येत्या काळात सर्व नोंदणी कार्यालयात आकस्मात भेटी देण्यात येतील. गैरप्रकार आढळल्यास तातडीने कार्यवाही करण्यात येईल. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
000000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpg)
.jpg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment