महात्मा गांधीजींच्या अमरावती भेटीला 85 वर्षे पूर्ण पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांना ‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ ग्रंथाची सन्मानपूर्वक भेट




अमरावती, दि. 17 : अमरावतीचे भूषण असलेल्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या जगप्रसिद्ध संस्थेला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दि. 16 नोव्हेंबर 1933 रोजी भेट दिली होती. या घटनेला काल 85 वर्षे पूर्ण झाली. हे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित ‘महाराष्ट्र आणि गांधीजी’ हा ग्रंथ संस्थेचे सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांना सन्मानपूर्वक भेट देण्यात आला. 
माहिती उपसंचालक राधाकृष्ण मुळी यांच्या हस्ते हा ग्रंथ श्री. वैद्य यांना देण्यात आला. जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि महाराष्ट्र यांच्यातील अनुबंधाचा वेध घेणा-या ‘महाराष्ट्र आणि गांधीजी’ या ग्रंथाची प्रत आवर्जून भेट दिल्याबद्दल श्री. वैद्य यांनी यावेळी आनंद व्यक्त केला.  
महात्मा गांधी यांनी दि. 16 नोव्हेंबर 1933 ला मंडळाला भेट दिली होती. त्यावेळी मंडळातील विद्यार्थ्यांचे शारीरिक खेळ व नगर संरक्षक दलातील हरिजन पलटणीच्या कवायतींचे आयोजन मंडळाने केले होते. यादिवशी शहरात गांधीजींच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मोठी गर्दी उसळली होती.  मंडळाच्या स्वयंसेवकांनी या गर्दीचे नियंत्रण केले होते, अशी माहिती श्री. वैद्य यांनी यावेळी दिली.
मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती श्री. वैद्य यांनी यावेळी दिली.
 महाराष्ट्र आणि महात्मा गांधी या ग्रंथात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, अण्णा हजारे, डॉ. अभय बंग, डॉ. विकास आमटे यांच्यासह अनेक मान्यवरांचे लेख समाविष्ट आहेत. हा ग्रंथ जिल्हा माहिती कार्यालयात उपलब्ध आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती