गोवर रुबेला आजाराच्या प्रतिबंधासाठी एमएमआर लस


·        9  महिने ते 15 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील
           सर्व बालकांसाठी गोवर रुबेला लसीकरण मोहिम
·        आरोग्य खात्याच्या तिसऱ्या महायज्ञात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन
·        27 नोव्हेंबर पासून विशेष अभियान राबविणार

    अमरावती, दि.6 : गोवर आणि रुबेला या लहान मुलांना होणाऱ्या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देश  पातळीवर नियोजनबद्ध रितीने कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. गोवर हा सर्वांना माहिती असलेला संसर्गजन्य आजार असून मुलांमध्ये मृत्यु तसेच अपंगत्व आणणारा आजार आहे. रुबेला या आजारामुळे जन्मत: व्यंग असलेली बालके जन्माला  येतात. गोवर हा व्हायरसमुळे होणारा आजार असून संसर्गातून होते. ज्या मुलांना लस मिळाली नसेल अशा रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 90 टक्के पेक्षा जास्त बालकांना हा आजार संसर्गातून होतो.
रुबेला ज्याला जर्मन मिझल सुद्धा म्हटल्या जाते हा सौम्य स्वरुपाचा आजार असला तरी गर्भवती मातेस हा आजार झाल्यास तिला व तिच्या बालकांमध्ये गंभीर स्वरुपाची गुंतागूंत याच्यामुळे होऊ शकते. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणातून भारतात दरवर्षी सुमारे 25 लाख बालकांना गोवरचा आजार होऊन 90 हजार बालके या आजारामुळे दगावण्याचे नोंदविले आहे. परंतू या दोन्ही आजारावर एमएमआर लसीमुळे प्रतिबंध करता येतो. या रोगांवर मात करण्यासाठी गोवर रुबेला लसीकरण मोहिम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. या  मोहिमेत  9 महिने पूर्ण व 15 वर्षांपेक्षा कमी  वयोगटातील सर्व बालकांना गोवर रुबेला लसीचा एक डोस देण्यात येईल.
गोवर प्रमाणे रुबेला हा आजार सुद्धा लसीद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो. ज्यामध्ये रुबेलाची लस किंवा गोवर मम्पस रुबेला लस (MMR) चा वापर केला जातो. प्रगतीशील राष्ट्रांमध्ये पालकांना आपल्या पाल्यांकरीता या लसीकरणाच्या सेवा बरेचदा मिळत नाहीत. त्यामुळे या बालकांना या आजांरापासून संरक्षण देता येत नाही. गरीबी, आरोग्यसेवांचा व माहितीचा अभाव या सर्व गोष्टीमुळे अशा कुटुंबाला सर्व सेवांपासून मुकावे लागते आणि म्हणून ही सर्व बालके आजारांना बळी पडतात.

            गोवर हा माहित असलेल्या आजारापैकी सर्वात जास्त संसर्गजन्य आजार असून मुलांमध्ये मृत्यु तसेच अपंगत्व आणणारा आजार आहे. रुबेला या आजारामुळे जन्मत: व्यंग असलेली बालके जन्माला  येतात. गोवर हा व्हायरसमुळे होणारा आजार असून संसर्गातून होते. ज्या मुलांना लस मिळाली नसेल अशा रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 90 टक्के पेक्षा जास्त बालकांना हा आजार संसर्गातून होतो. गोवर आजाराच्या लक्षणामध्ये ताप, खोकला आणि अंगावर लालसर ठिपके दिसून येतात. गोवरामुळे प्रतिकारक शक्ती कमी होते आणि त्यामुळे निमोनिया, आंधळेपणा, डायरिया आणि मेंदूज्वरासारखे आजार उद्भवतात. 5 वर्षाच्या आतील बालकांमध्ये या गुंतागुंतीचे प्रमाण खूप जास्त असते. या आजारातून बालक दुरुस्त झाले तरी काही प्रमाणात त्यांच्यात अपंगत्व राहते. गोवर रुबेलाचे लसीमुळे यामध्ये बरीच सुधारण झाली असली तरी भारतात दरवर्षी जवळपास 25 लक्ष बालकांना गोवरचा आजार होतो 90 हजार बालके दगावतात. याचाच अर्थ दररोज सरासरी 246 बालके गोवरामुळे मरण पावतात आणि महत्त्वाचे म्हणजे हा आजार आण गोवरच्या लसीचे 2 डोज देऊन पूर्णपणे थांबवू शकतो.
            रुबेला ज्याला जर्मन मिझल सुद्धा म्हटल्या जाते हा सौम्य स्वरुपाचा आजार असला तरी गर्भवती मातेस हा आजार झाल्यास तिला व तिच्या बालकांमध्ये गंभीर स्वरुपाची गुंतागूंत याच्यामुळे होऊ शकते. गर्भवती मातेस पहिल्या तिमाहित हा आजार झाल्यास बालकामध्ये कंजेनायटल रुबेला सिंड्रोम हा भयंकर आजार होण्याची दाट शक्यता असते. या आजारात बालकामध्ये वेगवेगळ्या जन्मत:च व्यंग असतात. त्यामध्ये प्रामुख्याने ह्रदयाचे आजार तसेच बहिरेपणा आणि आंधळेपणा येऊ शकतो. दरवर्षी 1 लाखांपेक्षा जास्त कंजेनायटल रुबेला सिंड्रोम (सी.आर.एस.) लस आजाराची बालके जन्माला येतात. जन्मत:च व्यंग घेऊन असलेल्या या बालकांमुळे संपूर्ण कुटुंब मानसिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या  कमजोर होऊन जाते. गोवर प्रमाणे रुबेला हा आजार सुद्धा लसीद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो. ज्यामध्ये रुबेलाची लस किंवा गोवर मम्पस रुबेला लस (MMR) चा वापर केला जातो. प्रगतीशील राष्ट्रांमध्ये पालकांना आपल्या पाल्यांकरीता या लसीकरणाच्या सेवा बरेचदा मिळत नाहीत. त्यामुळे या बालकांना या आजांरापासून संरक्षण देता येत नाही. गरीबी, आरोग्यसेवांचा व माहितीचा अभाव या सर्व गोष्टीमुळे अशा कुटुंबाला सर्व सेवांपासून मुकावे लागते आणि म्हणून ही सर्व बालके आजारांना बळी पडतात.
            गोवर व रुबेलाचे प्रगत राष्ट्रांमधून सन 2002 सालीच उच्चाटन झाले आहे. परंतू अशा आजाराचा रुग्ण त्या देशात जातो आणि  त्या ठिकाणी लस न मिळालेला बालक अशा रुग्णांच्या संपर्कात येते तेव्हा त्याला हा असा आजार होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे नियमित लसीकरण अतिशय आवश्यक आहे. गोवर, रुबेला आणि  कंजेनायटल रुबेला सिंड्रोम (सी.आर.एस.) हे आपण थांबवू शकतो. त्याकरीता नियमित लसीकरण अतिशय महत्वाचे आहे. परंतू त्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. नियमित लसीकरणाच्या माध्यमातून आपण हे प्रमाण बरच कमी करु शकलो आहे.
एमआर कॅम्पेन
            लसीमुळे रोखल्या जाऊ शकणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळण्यासाठी तसेच लोकांचे स्वास्थ सुधारण्यासाठी भारत सरकारने एमआर कॅम्पेन सुरु केले आहे. या मोहिमेमध्ये  भारतातील 9 महिने ते 15 वर्षाखालील  40 कोटींपेक्षा जास्त बालकांना द्यायची आहे. सन 2017 मध्ये सुरु झालेली ही मोहिम 2 वर्षे राबवायची आहे. या मोहिमेमध्ये 9 महिने ते 15 वर्षाखालील वयोगटातील प्रत्येक बालकाला एमआर लसीचा 1 डोस द्यावयाचा आहे. या मोहिमेमध्ये शासनाचे विविध विभागासोबत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था सहकार्य करीत आहे. यामध्ये लायन्स, रोटरी, आ.एम.ए., आय.ए.पी. अशा अनेक अशासकीय सेवाभावी संस्था आहेत.
मोहिम
            गोवर लसीप्रमाणे एमएमआर लसीचे 2 डोस दिले जातात. गोवर रुबेला या लसीचा अंतर्भाव नोव्हेंबर 2018 पासून शासकीय लसीकरण कार्यक्रमात करण्यात येईल. परंतू या पूर्वी गोवर रुबेला लसीची मोहिम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येईल. या  मोहिमेत  9 महिने पूर्ण व 15 वर्षांपेक्षा कमी  वयोगटातील सर्व बालकांना गोवर रुबेला लसीचा 1 डोस देण्यात येईल. ही लस इंजेक्शन द्वारे उजव्या दंडात (सब क्युट्यानियस) देण्यात येईल. बालकांना ह्या लसीचा डोस दिलेले असतील तरीही मोहिमेतील या  जादाचा डोस देणे आवश्यक आहे. जादाचा डोस दिल्याने बालकाला कोणतेही नुकसान होत नाही.
ही मोहिम दि.27 नोव्हेंबर पासून राबविण्यास सुरुवात केली जाणार आहे. ही मोहिम सुमारे 5 आठवडे चालेल. सुरुवातीचे 2 आठवडे प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना डोस देण्यात येईल. त्यानंतर 2 आठवडे शाळेत न जाणाऱ्या विद्यार्थ्यांना डोस देण्यात येईल. पाचव्या आठवडयात राहिलेल्या सर्व मुलांना डोस देण्यात येईल.
            या लसीचा कोणताही दुष्पपरिणाम नाही. अगदी नगण्य स्वरुपात एखाद्या मुलांना किरकोळ दुष्परिणाम होऊ शकतो. त्यावर तातडीने इलाज केल्यास कोणताही धोका नाही. ही लस घेतल्यावर मुलांना गोवर व रुबेला या दोन्ही रोगांपासून बचाव होईल.        तरी या मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन आपल्या 9 महिने पूर्ण व 15 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना एमआर लसीचा डोस देऊन त्यांना गोवर व रुबेला आजारांपासून मुक्त करावे.
            सोबतच आरोग्य खात्याने प्रारंभ केलेल्या या तिसऱ्या महायज्ञात सहभागी होऊन गोवर रुबेला या आजाराची आहूती देऊन संपूर्ण भारताला रोगमुक्त करुन निरोगी व सशक्त भारताचे स्वप्न साकार करण्याचे आवाहन आरोग्य खात्यासोबतच जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, रोटरी इंटरनॅशनल, आय.एम.ए., आय.ए.पी. इत्यादीकडून करण्यात येत आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती