Thursday, November 1, 2018

कृषी विकास परिषदेच्या यशस्वितेसाठी समन्वयाने काम करावे
-         आमदार डॉ. अनिल बोंडे
अमरावती, दि. 1 : वरुड येथे नियोजित राष्ट्रीय कृषी विकास परिषदेच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी येथे दिले.
            वरुड येथे दि. 4 ते 7 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय कृषी विकास परिषद होणार आहे. त्याच्या पूर्वतयारीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
            डॉ. बोंडे म्हणाले की, परिषदेत विविध विभागांची महत्वपूर्ण योजनांची माहिती देणारी दालने असतील. परिषदेतून शेतकरी बांधवांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी देशभरातील नामवंत कृषी मार्गदर्शकांना निमंत्रित करण्यात येईल. आवश्यक तिथे प्रात्यक्षिकांतून मार्गदर्शन करण्यात येईल. नामवंत कंपन्या, प्रयोगशील शेतकरी शास्त्रज्ञ आदींचा सहभाग परिषदेत असेल.
            ते पुढे म्हणाले की, पशुसंवर्धन हा महत्वाचा पूरक व्यवसाय असल्याने पशुसंवर्धन विभागाने प्रभावीपणे दालनाची मांडणी करावी. पशुप्रदर्शनाचा अंतर्भाव असावा. मोर्शी तालुक्यात बहुवार्षिक चारा पीकांची यशस्वी लागवड झाली आहे. त्याचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात येईल. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासह एनआरसीसी, कॉटन रिसर्च इन्स्टिट्यूट, कृषी विज्ञान केंद्र, मेडा व शासनाची विविध महामंडळे यांचाही सहभाग मिळविण्यात येईल.
           संत्रा पीक जिल्ह्यातील महत्वाचे फळपीक आहे. हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने नवीन संशोधन व प्रयोगांची माहिती देणारी दालने असावीत. विविध बँकांकडून शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध उपक्रम व सुविधांबाबत कक्षाचा समावेश परिषदेत असेल. तसे पत्र अग्रणी बँकेने बँकांना द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.   
उपविभागीय कृषी अधिकारी श्री. देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री. रहाटे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एल. के. झा, खादी ग्रामोद्योग विकास महामंडळाचे प्रदीप चेचरे, सहकार अधिकारी श्री. पतंगे, कृषी उद्योग विकास महामंडळाचे सत्यजीत ठोसरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...