आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह क्र. 3 चे लोकार्पण
उर्वरित वसतिगृहांच्या इमारतीही सर्व सुविधायुक्त उभारणार
-          पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

*पावणेचार कोटींच्या निधीतून सुसज्ज वसतिगृह
*180 विद्यार्थिनींची निवास क्षमता
*दुस-या टप्प्यात 360 विद्यार्थिनींचे वसतिगृह उभारणार
अमरावती, दि. 18 : अमरावती जिल्ह्यात गत चार वर्षांत 22 हजार कोटींच्या कामांना चालना मिळाली. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमत:च इतका मोठा निधी प्राप्त होऊन विकासाला मोठी गती मिळाली. आदिवासी विद्यार्थिनींच्या शासकीय वसतिगृहाच्या इमारतीप्रमाणेच उर्वरित प्रस्तावित वसतिगृहांच्या इमारतीही सुसज्ज व सर्व सुविधांनी युक्त अशा उभारण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे केले.
एकात्मिक आदिवासी प्रकल्पातर्फे नवसारी येथे आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह क्र. 3 च्या नूतन इमारतीचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार आनंदराव अडसूळ, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तथा आमदार प्रभुदास भिलावेकर, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, विजयराज शिंदे, प्रकल्प अधिकारी राहूल कर्डिले आदी उपस्थित होते.  प्रारंभी श्री. पोटे पाटील यांनी थोर क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
            पालकमंत्री श्री. पोटे पाटील यावेळी म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून  समाजातील वंचित घटकांना न्याय व हक्क मिळवून देण्याचे कार्य केले. त्याला अनुसरून शासनाने तळागाळातील आणि वंचित समाजासाठी कल्याणकारी योजना आणल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गतिमान निर्णय घेत अनेक प्रकल्प व योजनांना चालना दिली.  त्यामुळे राज्यात मोठे निर्माणकार्य होत आहे.
ते पुढे म्हणाले की, वंचित समाजाच्या प्रगतीसाठी समाजातील विद्यार्थ्यांनीही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळवून अधिकारी व्हावे. स्वत:ची प्रगती घडवून आणत असताना समाजासाठीही योगदान द्यावे. आपल्या घटनादत्त अधिकारांचे संरक्षण करत समाजाचा विकास घडवून आणावा, असे आवाहन त्यांनी केले.   
शासनाने आदिवासी विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना अंमलात आणल्या आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे, असे श्री. अडसूळ यांनी सांगितले. विद्यार्थिनी वसतिगृहासाठी इमारत होणे आवश्यक होते. मुख्यमंत्र्यांच्या तत्काळ निर्णयाने व पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने हे काम मार्गी लागले. मुलांच्या वसतिगृहासाठी इमारत करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत, असे श्री. भिलावेकर यांनी सांगितले.
                                             


वसतिगृहाची सुसज्ज इमारत

वसतिगृहाची इमारत जी प्लस थ्री असून, विद्यार्थिनी निवास क्षमता 180 आहे. एकूण 3 कोटी 68 लाख रुपयांच्या निधीतून उभारलेल्या या इमारतीत किचन, डायनिंग, पँट्री भांडार, कार्यालय, अधिक्षक निवासस्थान व सिक रुम अशी रचना आहे. पहिल्या व तिस-या मजल्यावर 10 खोल्या व एक अभ्यासिका आहे. एका खोलीत सहा विद्यार्थिनी राहू शकतात. अंदाजपत्रकात काँक्रिट रस्ता, सुरक्षारक्षक केबिन, अभ्यागत कक्ष, स्वच्छतागृह, वाहनतळ आदी अंतर्भूत आहे. दुस-या टप्प्यात 360 विद्यार्थिनी क्षमतेच्या वसतिगृह इमारतीच्या बांधकामासाठी अप्पर आयुक्तांकडे प्रस्ताव देण्यात आला आहे, असे श्री. कर्डिले यांनी सांगितले.  गुल्लरघाट येथील मुख्याध्यापक जवाहर गाढवे यांनी सूत्रसंचालन केले.
00000
9 Attachments

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती