Thursday, November 1, 2018

‘जलयुक्त’मुळे पिंपरी निपाणी परिसरात भूजलपातळी उंचावली जलसंधारणात पिंपरी निपाणी गावाचा पॅटर्न निर्माण




अमरावती, दि. 1 : पारंपरिक सिमेंट बंधा-यांऐवजी जलयुक्त शिवार योजनेत रिचार्ज शाफ्ट व ट्रेंचच्या माध्यमातून पाणी मुरवल्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपरी निपाणी व लगतच्या परिसराची भूजलपातळी उंचावली असून, कृषी उत्पादकतेतही भर पडली आहे.
        जागतिक बँकेच्या सहकार्याने पाणीपुरवठा विभाग व भूजल सर्वेक्षण विभागातर्फे पिंपरी निपाणी व परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात भूशास्त्रीय अभ्यास करून तेथे जलयुक्त शिवार मोहिमेच्या माध्यमातून अनेक कामे राबवण्यात आली. त्याचा फायदा भूस्तरात पाणी मुरण्यास झाला आणि परिसरातील भूजलपातळीत वाढ झाली.
जलयुक्त शिवार योजनेत जलसंधारणाच्या विविध प्रकारच्या कामांचा समावेश असल्याने परिसराची भौगोलिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन तशी कामे राबविण्यात येतात. शिवाय, लोकसहभागाचे मोठे बळ योजनेला मिळाले. त्यातून जिल्हाभर झालेली अनेक कामे शेतीसाठी लाभकारक ठरत आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत पर्जन्यमान कमी असले तरी जलयुक्त शिवारच्या कामांमुळे एकूण जिल्ह्याच्या भूजलपातळीतील सरासरी तूट पाऊस कमी होऊनही 0.59 टक्क्यांनी भरून निघाली आहे. पूर्वी ही तूट वजा 1.86 टक्के होती. आता तिचे प्रमाण वजा 1. 27 एवढे आहे, असे भूजल सर्वेक्षणचे वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड यांनी सांगितले. पारंपरिक कामांऐवजी भौगोलिक स्थितीचा विचार करुन रिचार्ज शाफ्ट, ट्रेंच,ढाळीचे बांध अशी वैविध्यपूर्ण कामांचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश आहे.       
पिंपरी येथील कामांबाबत माहिती देताना श्री. कराड म्हणाले की, पिंपरी निपाणी येथे आम्ही खोलीकरणाऐवजी ट्रेंच करण्यावर भर दिला. याठिकाणी पूर्वी चार सिमेंट बंधारे होते. तेथील सगळे पाणी बेंबळा नदीकडे जात होते. पाणी पुरेशा प्रमाणात मुरत नव्हते. त्यामुळे तेथील भौगोलिक स्थितीचा विचार करून आम्ही 50 मीटर लांब, सात मीटर रुंद व अडीच मीटर खोलीचे ट्रेंच केले. त्यानंतर पुन्हा 15 मीटरचे अंतर सोडून पुन्हा ट्रेंच असे पाच ट्रेंच केले. त्यावरच्या बाजूला गॅबियन बंधारे घेतले. ट्रेंचमध्ये रिचार्ज शाफ्ट घेतले. त्याची परिणती पाणी गावाच्या परिसरातील भूस्तरात मुरण्यात झाली.
 ते पुढे म्हणाले की, जमिनीत वर 2 फुट मातीचा स्तर,  त्याखाली 20 फुटांपर्यंत कच्चा मुरुम, त्यानंतर खडक आणि साधारणत35 फुटांखाली पक्का दगड आहे. या पक्क्या दगडामुळे पाणी मुरण्यास अडथळा ठरत होता. त्यामुळे ज्या ठिकाणी विहीरींची खोली 40 फुटांहून अधिक आहे, तिथे पाणी पोचून विहीर भरायला ऑक्टोबर उजाडायचा. जलयुक्त शिवार योजनेत रिचार्ज शाफ्टची मोठी कामे झाल्याने भूस्तरात अधिक खोलीपर्यंत पाणी मुरायला मदत झाली.
 रिचार्ज शाफ्टसाठी आम्ही साधारणत: 100 फूट बोअर केले. भोवती खड्ड्यात माती, टोळगोटे असा फिल्टर मीडिया तयार केला. त्यामुळे पक्क्या दगडामुळे येणारा अडथळा दूर झाला व पाणी खालच्या स्तरात पोहोचले. अधिक खोलीच्या विहिरींनाही मान्सूनच्या पहिल्या महिन्यातच पाणी आले, असेही ते म्हणाले.
 पिंपरी निपाणीचे सरपंच विशाल रिठे जलयुक्तच्या या यशाबद्दल म्हणाले की, गतवर्षी नोव्हेंबरमध्ये टंचाई जाणवत होती. त्यावेळी विहिरी अधिग्रहणाचा प्रस्ताव आम्ही टाकला होता. शिवाय, टँकरही लावावा लागला. यंदा मात्र जलयुक्तमधून गावक-यांनी श्रमदानातून अनेक कामे केली. त्यामुळे पहिल्याच पावसात पाणी यायला सुरुवात झाली. एका ट्रेंचच्या परिघात 15 लाख लीटर पाणी साधारणत साठले. त्यामुळे पेयजलाचा प्रश्न तर सुटलाच शिवाय यंदा गावातील सुमारे ३०० एकरावर रब्बीचे पीकही घेतले जात आहे.   आता आम्ही गावकरी कंटूर बांध, ढाळीचे बांध यासह शेततळ्यांची कामे करणार आहोत.
माथा ते पायथा अशी संकल्पना जलसंधारणात असल्याने टाकळी गिलबा या गावालाही मोठा लाभ झाला. विहीरीवर सिंचन असणा-या शेतक-यांना तर याचा लाभ झालाच. मात्र, विहीरी नसलेल्या शेतक-यांनाही लाभ झाला. कारण, पाणी जमिनीत मुरल्याने भूस्तरातील पाण्याचा अंश टिकून राहिला. परिसरातील कृषी उत्पादकताही वाढल्याने शेतकरी समाधानी आहेत, असेही श्री. रिठे  यांनी सांगितले.  

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...