रब्बी हंगामातील पिकांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करावे

 रब्बी हंगामातील पिकांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत

पाणी अर्ज सादर करावे

अमरावती, दि. 28 (जिमाका) : रब्बी हंगाम सन 2022-23 मध्ये बागायतदार शेतकऱ्यांनी सिंचनाचा लाभ घेण्यासाठी पाणी मागणी अर्ज संबंधित शाखा अधिकारी यांच्या कार्यालयात अथवा कालवा निरीक्षक अथवा मोजणीदार यांच्याकडे 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत सादर करण्याचे आवाहन अमरावती मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता सु.पां. आडे यांनी केले आहे. 

अमरावती मध्यम प्रकल्प विभागातील उपलब्ध पाणी पुरवठ्यानुसार रब्बी हंगामासाठी पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार शेतकऱ्यांनी आपले पाणी मागणी अर्ज नमुना 7 दोन प्रतीमध्ये विहित कालावधीमध्ये सादर करावा. पाणी मागणी अर्जाचे कोरे नमुने संबंधित उपविभाग शाखा कार्यालय व उपशाखा कार्यालयातून मोफत पुरविण्यात येत आहेत. 

शासनाच्या धोरणानुसार धरणातील उपलब्ध पाणी हे उन्हाळा हंगामाअखेर पुरवावे लागणार असल्याने प्रथम पिण्याच्या पाण्याची गरज भागवून उर्वरित पाण्यात शेती पिकासाठी व औद्योगिक कारखाने यांना पुरविण्याचे नियोजन आहे. उभ्या पिकांना पाणी घेतांना शेतकऱ्यांनी काटकसरीने पाणी घ्यावे व सुक्ष्म सिंचनावर भर द्यावा, असे अमरावती मध्यम प्रकल्प विभागामार्फत कळविण्यात आले आहे. 

पाणी मागणी अर्ज करण्यासंबंधी सूचना*

पाणी मागणी अर्ज करणारा स्वत: शेताचा मालक असावा. कुळ अगर वहीवाटदार असलेल्या शेतीसाठी मागणी अर्जासोबत मालकाचे संमतीपत्र जोडावे. अर्जामध्ये मागणी क्षेत्र पिकवार स्पष्ट नमूद करावे. अर्जावर खातेपुस्तिकेवरुन गाव, सर्वे क्रमांक, पोटहिस्से पिकाचे नाव आणि मागणीक्षेत्र अचूक नोंदवावे. अर्जात पाणीपट्टी, थकबाकीसंबंधी अचूक माहिती द्यावी. अर्जाची पूर्तता कालवा निरीक्षकाकडून तपासून दोन प्रतीत सादर करावे. पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यातून रब्बी हंगामामध्ये 31 मार्च 2023 पर्यंत पाणीपुरवठा करण्यात येईल. प्रकल्पामध्ये पाणीसाठा उपलब्ध असल्यास इच्छुक शेतकऱ्यांना 15 एप्रिल 2023 पर्यंत त्यांच्या मागणी अर्जानुसार पाणीपुरवठा करण्यात येईल. 

प्रथम पाणी दिल्यानंतर सिंचन केलेल्या पीक क्षेत्राची मोजणी सिंचन शाखेच्या मोजणीदाराकडून करण्यात येईल. शेतकऱ्याच्या शेतातील पाटचारी/शेतचारी सुस्थितीत नसल्यास अशा शेतकऱ्यांचा पाणी अर्ज मंजूर करण्यात येणार नाही. अर्ज मंजूर होताच कालवा निरीक्षकाकडून पाणीपुरवठा संबंधीची माहिती ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावण्यात येईल. कडधान्ये, डाळी, तेलबिया, रब्बी भुसार पिके यांच्यासाठी प्राधान्यक्रमाने पाणीसाठ्याच्या उपलब्धतेनुसार पाणी पुरवठा करण्यात येईल. रब्बी हंगामासाठी अमरावती मध्यम प्रकल्प विभागांतर्गत मध्यम प्रकल्प, लघू प्रकल्प, उपसा सिंचन योजना इत्यादी पाठबंधारे प्रकल्पांच्या समादेश क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती