Thursday, November 3, 2022

विभागीय ग्रंथालयात दिवाळी अंकांचे प्रदर्शन सुरू













 विभागीय ग्रंथालयात दिवाळी अंकांचे प्रदर्शन सुरू

विचारसमृद्धीसाठी तरूणांनी वाचनाकडे वळावे

-  उपायुक्त संजय पवार

 

अमरावती, दि. 3 : वाचनातून आकलनशक्ती वृद्धिंगत होऊन विचारांना स्थैर्य मिळते. त्यामुळे केवळ स्मार्ट फोनवर वेळ न घालवता पुस्तकांचे वाचनही तरूण पिढीने नियमितपणे करावे, असे प्रतिपादन विभागीय उपायुक्त संजय पवार यांनी आज येथे केले.

 

विभागीय ग्रंथालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. सहायक आयुक्त श्यामकांत म्हस्के कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तहसीलदार संतोष काकडे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, विभागीय ग्रंथपाल अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सूरज मडावी आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन उद्या दि. 4 ऑक्टोबरपर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.

 

ग्रंथालयाला भेट देणे हे आपल्यासाठी कायम आनंददायी असल्याचे सांगून उपायुक्त श्री. पवार म्हणाले की, वाचनाचा ठेवा माणसाला लहानपणापासून शेवटपर्यंत साथ देतो. पुस्तकांचा परिणाम सकारात्मक असतो. स्मार्ट फोनच्या युगातही वाचनाची परंपरा टिकून राहणे आवश्यक आहे. विचारांची बैठक घडविण्यासाठी वाचन आवश्यक असते. 

 

 सहायक आयुक्त श्री. म्हस्के म्हणाले की, स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी मूलभूत संकल्पना समजावून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पाठ्यपुस्तकांसारखी अभ्यास साधने उपयुक्त असतात. विविध क्षेत्रांतील मोठ्या व्यक्तींची चरित्रे, आत्मचरित्रे वाचल्याने त्यांच्या जीवनसंघर्षाचे, कार्याचे आकलन होते व प्रेरणा मिळते. संवेदनशील मन घडविण्याची ताकद पुस्तकांत असते.

 

प्रदर्शनात राज्यातील महत्वाच्या 200 दिवाळी अंकांचा समावेश असल्याचे श्री. मडावी यांनी सांगितले. प्रदर्शनाला अमरावतीकर रसिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन श्री. ढोणे यांनी केले.

 

०००

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...