स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नियुक्ती आदेश वाटप कार्यक्रम सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्य करावे -अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

 



















स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नियुक्ती आदेश वाटप कार्यक्रम

 

सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्य करावे

-अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

 

     अमरावती, दि. 3 : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 75 हजार युवकांना रोजगार देण्याचा राज्य शासनाने संकल्प केला आहे. शासकीय नोकरीचे स्वप्न बाळगणाऱ्या व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांचे या उपक्रमाच्या माध्यमातून स्वप्न साकार होत आहे. या माध्यमातून सर्वसामान्यांच्या सेवेची संधी उमेदवारांना प्राप्त होत आहे. सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी संघटितपणे कार्य करुया, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी आज येथे केले.

 

       स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नियुक्ती आदेशाचा वाटप कार्यक्रम नियोजनभवनात झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंत्री श्री. राठोड यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात अमरावती विभागातील तीसजणांना, तसेच एकूण 109 उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले. राज्यात सर्व विभागीय ठिकाणी हा कार्यक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतील मुंबई येथील कार्यक्रमाचे थेट प्रसारणही करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छापर संदेशाची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.

 

      विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, प्रादेशिक वनसंरक्षक जी. के. अनारसे, महावितरणच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, पारेषण मुख्य अभियंता जयंत विखे, महावितरण अकोला परिक्षेत्राचे मुख्य अभियंता पवनकुमार कचोट, सहायक महाव्यवस्थापक सुर्यकांत फलटणकर, मनीष भोपळे, परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक निलेश बेलसरे, उपायुक्त संजय पवार,  निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके आदी उपस्थित होते.

 

     श्री. राठोड म्हणाले की, कोरोनाकाळात उद्योग, व्यवसाय बंद असल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. हे लक्षात घेऊन राज्य शासनाने भरती प्रक्रिया सुरु करुन युवकांसाठी सुवर्ण संधी निर्माण केली आहे. राज्याच्या हिताचे 700 निर्णय शासनाने घेतले. रिक्त पदांमुळे यंत्रणेवर ताण येतो. क्षेत्रीय स्तरावर काम करणारे कर्मचारी नसतील तर एकालाच अनेक प्रभार सांभाळावे लागतात. त्यामुळे कामे प्रलंबित राहतात. त्यामुळे सर्व विभागांत भरती प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.

 

विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, या उपक्रमाव्दारे तरुणांना मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. शुभारंभाच्या दिवशी राज्यात 2 हजार युवकांना एकाचवेळी नियुक्तीपत्रे दिली जात आहे.

 

          यावेळी महावितरणमध्ये नियुक्त 95, महापारेषणमध्ये एक व परिवहन महामंडळात नियुक्त 13 अशा एकूण 109 उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे मान्यवरांच्या हस्ते  वाटप  करण्यात आले. कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित होते.

 

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती